नाशिक – महाराष्ट्र विधानसभा निवडणूक शेवटच्या टप्प्यात आहे. राज्यात विविध पक्षांच्या नेत्यांनी सभांचा धडाका सुरु केला आहे. एका दिवशी चार-चार सभा नेत्यांच्या होत आहेत. तसेच रोड शो केले जात आहेत. त्यातच आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे देखील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात उतरले आहेत. मनोज जरांगे यांनी समाजाला भावनिक आवाहन केलं आहे. माझं शरीर मला साथ देत नाही. मी कधी जाईल माहीत नाही, मी तुमच्यात किती दिवस राहील, माहीत नाही. मी फार दिवसांचा पाहुणा नाही. माझ्या समाजाचा लढा अपूर्ण राहील की काय, असे भावनिक असे वक्तव्य मनोज जरांगे यांनी केले. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथील सभेत ते बोलत होते.
मी तुमच्यात किती दिवस माहीत नाही
विधानसभा निवडणूक शेवटच्या टप्प्यात आहे. 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रातील विधानसभेच्या 288 जागांसाठी एकाच दिवशी मतदान होणार आहे. आज प्रचाराचा शेवटचा रविवार आहे. सर्वच पक्षांचे नेत्यांनी प्रचारसभांचा धडाका उडवून दिला आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे हे देखली या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार होते, मात्र ऐनवेळी त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली. मात्र त्यांचा महाराष्ट्र दौरा सुरु आहे. लासलगाव येथे समाजाच्या कार्यकर्त्यांशी ते संवाद साधत होते. यावेळी त्यांनी, “मी थोड्या दिवसाचा पाहुणा आहे. माझं शरीर मला साथ देत नाही. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसायचं नाही. मी कधी जाईल माहित नाही, मी तुमच्यात किती दिवस राहील माहीत नाही. मला दर आठ-दहा दिवसांना सलाईन लावावे लागत आहे. शरीरात खूप वेदना होतात.” असे वक्तव्य केले.
मनोज जरांगे हे गेल्या 14-15 महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत. विधानसभा निवडणूक जाहीर होईपर्यंत त्यांनी पाच ते सहा वेळा उपोषण केले आहे. या उपोषणामुळे त्यांची तब्यत आता त्यांना साथ देत नाही, शरीर थकलं आहे, असं ते म्हणाले. शरीरात खूप वेदना होतात. शरीराची नुसती आग होते. माझी हाडही दुखायला लागली आहेत. शरीर साथ देत नाही. आता फक्त माझ्या माय-बाप समाजाची ताकद वाढवा. मराठ्यांची उंची वाढवा. त्यांची शान वाढवा, आणि त्यांना बळ द्या, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले.
येवला विधानसभा निवडणूक चुरशीची
मनोज जरांगे यांनी त्यांच्या उपोषणाच्या सुरुवातीपासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि राज्यातील मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात जोरदार हल्लाबोल केलेला आहे. आता त्यांच्या मतदारसंघात येऊन त्यांनी मराठ्यांची शान वाढवा म्हटले आहे, यामुळे येवला मतदारसंघाची निवडणूक अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : NCP Sharad Pawar : शरद पवारांच्या खासदारांचा महाविकास आघाडीच्या विजयाचा दावा; विजयी आमदारांचा आकडाच सांगितला
Edited by – Unmesh Khandale