नागपूर – महाराष्ट्र विधानसभा निवडणूक शेवटच्या टप्प्यात आहे. राज्यात विविध पक्षांच्या नेत्यांनी सभांचा धडाका सुरु केला आहे. एका दिवशी चार-चार सभा नेत्यांच्या होत आहेत. तसेच रोड शो केले जात आहेत. विदर्भातील जागांवर सर्वच राजकीय पक्षांचा डोळा आहे. लोकसभेत काँग्रेसला सर्वाधिक जागा विदर्भातून मिळाल्या आहेत, त्यामुळे त्यांना आता विधानसभेत येथून सर्वाधिक जागा मिळण्याची आशा आहे. तर भारतीय जनता पक्षाने विदर्भातून सर्वाधिक जागा निवडून आणण्याचा चंग बांधला आहे. त्यासाठीच भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आज विदर्भात चार सभांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र अमित शहा विदर्भातील सर्व सभा रद्द करुन तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत.
भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे प्रचार शेवटचा टप्प्यात असताना अखेरच्या रविवारी महाराष्ट्रातून तातडीने दिल्लीला रवाना झाले. शहांच्या आज विदर्भात चार सभांचे आयोजन होते. या चारही सभाने ते असणार नाही, अशी माहिती आहे.
आजच्या (रविवार) चार सभांसाठी अमित शहा काल (शनिवार) संध्याकाळीच नागपुरात दाखल झाले. त्यांचा नागपूरातील रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये मुक्काम होता. तर आज सकाळी 11 वाजता ते गडचिरोलीला रवाना होणार होते. मात्र आता हा दौरा रद्द झाल्याची माहिती आहे. अमित शह हे त्यांच्या नियोजित चारही सभा रद्द करून तातडीने नागपुरातून दिल्लीसाठी रवाना झाले. आज गडचिरोली, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यातील काटोलसह सावनेर अशा चार मतदारसंघात त्यांच्या सभा होणार होत्या. या सर्व सभा रद्द करून अमित शाह दिल्लीसाठी रवाना झाले आहे. मात्र त्यांच्या दिल्लीला रवाना होण्याचे कारण समजलेले नाही.
नागपूरमध्ये भाजप नेते आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणूक लढवत आहेत. ते आज पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. तर अमित शहा यांच्या नियोजित असलेल्या चारही सभांना आज स्मृती इराणी हजेरी लावतील अशी माहिती समोर येत आहे.
हेही वाचा : NCP Sharad Pawar : शरद पवारांच्या खासदारांचा महाविकास आघाडीच्या विजयाचा दावा; विजयी आमदारांचा आकडाच सांगितला
Edited by – Unmesh Khandale