Assembly Speaker Election : विधानसभा अध्यक्षांची निवडणूक पहिल्या आठवड्यात ? मुख्यमंत्री – कॉंग्रेस शिष्टमंडळाची आज बैठक

maharashtra assembly
विधानसभा

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदासाठीची निवडणूक ही अर्थसंकल्पीय अधिवेशनच्या पहिल्याच आठवड्यात होईल, असे संकेत महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत. आज गुरूवारी सायंकाळी ५ वाजता कॉंग्रेसच्या नेत्यांचे शिष्टमंडळ हे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण तसेच महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेदेखील या शिष्टमंडळाचा भाग आहेत. याआधीही अनेकदा कॉंग्रेसकडून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक व्हावी अशी मागणी लावून धरण्यात आली आहे. नाना पटोले यांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर हे पद रिक्त झाले होते.

याआधीच्या हिवाळी अधिवेशनातच महाविकास आघाडी सरकारने अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याबाबतचे पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लिहिले होते. पण राज्यपालांनी या निवडणुकीसाठी परवानगी दिली नाही. त्यामुळेच आधीच्या अधिवेशनात निवडणूक प्रक्रिया रखडली. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसाठी महाराष्ट्राच्या विधानसभेने नियम बदलला होता. गुप्त मतदानाएवजी आवाजी मतदानाने ही निवडणूक घेण्याचा ठराव महाराष्ट्राच्या विधानसभेने संमत केला. पण राज्यपालांनी ही पद्धत घटनाबाह्य असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळेच ही निवडणूक प्रक्रिया रखडली. आता पुन्हा एकदा या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने कंबर कसली आहे.

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्च ते २५ मार्च दरम्यान होणार आहे. या अधिवेशनात राज्याचा सन २०२२-२३ या वर्षाचा अर्थसंकल्प ११ मार्च रोजी मांडला जाईल, अशी माहिती संसदीय कामकाजमंत्री अनिल परब यांनी मंगळवारी झालेल्या संसदीय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर दिली.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे ठिकाण तसेच कालावधी निश्चित करण्यासाठी कामकाज सल्लागार समितीची बैठक नुकतीच विधानभवनात झाली. या बैठकीत अधिवेशनाचा २२ दिवसांचा कालावधी ठरविण्यात आला. प्रलंबीत बिले आणि मागण्यांवर पाच दिवस चर्चा होणार असल्याची माहिती अनिल परब यांनी दिली आहे.

अधिवेशन मुंबईतच

दोन्ही सभागृहातील सदस्य संख्या पाहता नागपुरात बैठक व्यवस्था नसल्याने मुंबईत हे अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात विदर्भावर अन्याय होणार नाही. आज संसदीय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत याबाबत अंतिम निर्णय घेण्यात आला असल्याचे अनिल परब म्हणाले.

कोरोना चाचणी अनिवार्य

कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर हे अधिवेशन होणार असले तरी अधिवेशनात प्रवेशासाठी कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे प्रवेशासाठी कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.