Maharashtra Assembly Winter Session 2021: मुंबई उपनगरासाठी आर. आर बोर्डाची स्थापना करणार – जितेंद्र आव्हाड 

UPSC officer now get a house in mumbai said jitendra awhad

मुंबई शहरानुसारच उपनगरामध्ये अनेक इमारती या जुन्या झाल्या असून मोडकळीस आलेल्या आहेत. या इमारतींच्या दुरूस्ती आणि पुनर्रचनेसाठी राज्याचा गृहविभाग प्रयत्नशील आहे. त्यासाठीच मुंबई शहरा प्रमाणेच उपनगरासाठी रिपेअर एण्ड रिकंस्ट्रक्शन बोर्डाची निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विधान परिषदेत दिली. परिषदेचे सदस्य भाई जगताप यांनी मुंबईतील गृहनिर्माण संस्थांच्या निमित्ताने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जितेंद्र आव्हाड बोलत होते.

मुंबई शहरासाठी आयलँड सिटीसाठी सध्या रिपेअर आणि रिकंस्ट्रक्शन बोर्ड आहे. या बोर्डाच्या माध्यमातून मोडकळीला आलेल्या इमारतींच्या दुरूस्ती आणि पुर्नरचनेची कामे होतात. पण मुंबई उपनगरासाठी मात्र कोणत्याही बोर्डाची रचना सध्या नाही. त्यामुळेच उपनगरामध्येही मोठ्या प्रमाणात जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींच्या अनुषंगाने या बोर्डाची स्थापना करण्यात येईल असेही ते म्हणाले. त्यामुळे अशा मोडकळीस आलेल्या इमारतींना मोठ्या प्रमाणात दुरूस्तीसाठी वाव मिळेल.

एसआरए प्रकल्पांना संजीवनी योजना

देशात नोटाबंदी लागू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर पुनर्विकास प्रकल्प पुर्ततेवर परिणाम झाला. नोटबंदीनंतर ५२३ एसआरए प्रकल्प रखडले. त्यामुळेच या प्रकल्पाला गती देण्याचा मानस गृहनिर्माण विभागाचा असल्याचे आव्हाड यांनी सांगितले. अशा प्रकल्पांसाठी संजीवनी योजना सरकार आणणार आहे. अशा प्रकल्पांसाठी काय आर्थिक तरतुद करता येईल तसेच यासाठी नियम आणि नियमावली लागू करता येईल यासाठीचा प्रयत्न असेल असेही ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीने ही संजीवनी योजना मंजूर करण्यात येईल असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले. येत्या जानेवारीत ही योजना सुरू करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


हेही वाचा : Video | जेव्हा खुद्द राज ठाकरेच मनसे कार्यकर्त्याच्या खांद्याला मलम चोळतात