Maharashtra Band : बेस्ट बसेसची तोडफोड, अत्यावश्यक सेवांवर परिणाम

maharashtra band

लखीमपुर खेरी येथे घडलेल्या हिंसेमुळे महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षांनी बंदची हाक दिली आहे. परिणामी मुंबईतील अत्यावश्यक सेवांवर त्याचा परिणाम झाल्याचा पहायला मिळाले आहे. महाराष्ट्र बंदचा परिणाम हा विविध ठिकाणी पहायला मिळाला आहे. अत्यावश्यक आणि विना अत्यावश्यक अशा दोन्ही प्रकारच्या मुंबईसाठीच्या सेवा या बंदमुळे बाधित झाल्या आहेत. तर काही ठिकाणी बसेसचे नुकसान झाल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यातच शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यात रॅली काढल्याचीही माहिती आहे. आजच्या महाराष्ट्र बंदला पाठिंबा देत फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनने राजकीय पक्षांच्या आवाहनामुळे आज ४ वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. (Maharashtra band best busses damaged essential services affected in Mumbai, thane )

महाराष्ट्र बंदला पाठिंबा म्हणून आहार या हॉटेल मालक संघटनेनेही ४ वाजेपर्यंत हॉटेल बंद ठेवण्याचे जाहीर केले आहे. तर मुंबईच्या डबेवाल्यांनीही महाराष्ट्र बंदला पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्र बंदचा परिणाम म्हणून अनेक ठिकाणी फुटपाथवरील फळ आणि भाजी विक्रेत्यांनाही या संपाला पाठिंबा दिला आहे. परिणामी अनके ठिकाणी शुकशुकाट असेच वातावरण पहायला मिळत आहे. मुंबईसह ठाण्यात अनेक ठिकाणी दुकाने बंद असल्याचाही परिणाम दिसून येत आहे.

बेस्ट बसेसची तोडफोड

बेस्टच्या धारावी, मानखुर्द, शिवाजी नगर, चारकोप, ओशिवरा, देवनार, इनऑर्बिट मालाड या परिसरातील बसेसची तोडफोड झाल्याची माहिती आहे. महाराष्ट्र बंदला प्रतिसाद म्हणून ही तोडफोड झाल्याचे कळते. एकुण सात ठिकाणी बेस्ट बसेसचे नुकसान झाल्याची माहिती बेस्ट जनता संपर्क विभागाचे मनोज वऱ्हाडे यांनी दिली आहे. काल मध्यरात्रीपासून आज सकाळी पहाटेच्या दरम्यान बेस्ट च्या ८ बसगाड्या आणि भाडेतत्वावरील एका बसगाडीची तोडफोड करण्यात आली आहे. धारावी, मानखुर्द, शिवाजी नगर, चारकोप, ओशिवरा, देवनार, इनॉर्बिट मॉल अशा विविध भागात या तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. बेस्टच्या व्यवस्थापनाने पोलीस संरक्षण मागवले असून परिस्थितीचा आढावा घेऊन सर्व आगारातून बसगाड्या चालवण्यात येणार आहेत.

 

चाकरमान्यांचे हाल

 

बंदमुळे चाकरमान्यांचे मात्र हाल पहायला मिळत आहेत. अनेक ठिकाणी बंदचा फटका म्हणून रस्त्यावर रिक्षा आणि टॅक्सीची संख्या कमी आहे. तसेच बेस्ट बसेसची तोडफोड झाल्याने बेस्ट बसेसही रस्त्यावर जास्त प्रमाणात आलेल्या नाहीत. लोकल प्रवासासाठी मर्यादा असल्याने चाकरमान्यांचे आज हाल झाले.

महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर सोमवारी एकही ठाणे महानगरपालिकेची टीएमटी बस रस्त्यावर उतरली नाही. यामुळे परिवहन सेवा आज १०० टक्के (पूर्णतः) बंद असल्याने,त्याचा फटका हा कामगार वर्ग असलेल्या प्रवाशांना निश्चित बसल्याचे पाहण्यास मिळत होते. त्यातच रिक्षाही ८० ते ९० टक्के बंद होत्या. पण,ठाण्यात रिक्षा तुरळक प्रमाणात धावताना दिसत होत्या. टीएमटी बंद असल्याने ज्या रिक्षा रस्त्यावर धावत होत्या, त्या रिक्षावाल्यांनी या नामीसंधीचा पुरेपूर फायदा उचलण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत होते. प्रवाशांकडून जादा पैसे उकलले जात होते. तसेच सीट पकडण्यासाठी प्रवाशांची एक गर्दी पाहण्यास मिळत होती. याचदरम्यान सेना आणि राष्ट्रवादी हे एकत्र रस्त्यावर उतरले आहेत.

रस्त्यावर उतरले सेना आणि राष्ट्रवादी

ठाणे बाजारपेठेतील सुरु असलेली दुकान बंद करण्यासाठी दोन्ही पक्ष एकत्र, ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के आणि राष्ट्रवादी चे माजी खासदार व ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे बंद करण्यासाठी एकत्र रस्त्यावर आले. दंगल नियंत्रण पथक आणि मोठा पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.

ठाण्यात रिक्षाचालकांना मारहाण

ठाण्यातील बंदला प्रतिसाद मिळत नसल्याने शिवसैनिकांनी रिक्षाचालकांना मारहाण करून बंद करण्याचा प्रयन्त केला. ठाण्याचे शिवसेनेचे महत्वाचे पदाधिकारी देखील या मारहाणीत सहभागी असल्याचे पाहायला मिळाले. केवळ रिक्षाच सुरु असल्याने बंद पूर्णपणे यशस्वी कारण्यासाठी शिवसैनिकही यावेळी आक्रमक झाले. जांभळी नाका परिसरात रिक्षाचालकांना मारहाण करण्याचा हा प्रकार घडला आहे.

व्यापाऱ्यांनीही दुकाने केली बंद …

आताच आमची दुकाने कुठे उघडली आहेत. त्यामुळे या बंदमध्ये आम्ही सहभागी होणार नाही अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली होती. ठाण्यात मात्र बाजारपेठ आणि अन्य महत्वाच्या ठिकाणी सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. राष्ट्रवादीच्या वतीने दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. बंदच्या आदल्या दिवशीही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्यासाठी आवाहन करत होते. त्याला व्यापाऱ्यांनीही प्रतिसाद दिला आहे