Maharashtra band : काकांचे दुःख सतावत असल्यामुळे महाराष्ट्र बंदचा कांगावा, पडळकरांची राज्य सरकारवर टीका

शेतकऱ्यांना पंचनाम्यांच्या खाबूगिरीत अडकवून ठेवलं आहे.

maharashtra band gopichand padalkar slams thackeray government
Maharashtra band : काकांचे दुःख सतावत असल्यामुळे महाराष्ट्र बंदचा कांगावा, पडळकरांची राज्य सरकारवर टीका

महाराष्ट्र बंदवरुन ठाकरे सरकारवर भाजपकडून जोरदार टीका करण्यात आली आहे. लखीमपुर खीरी प्रकरणाच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद केला आहे. परंतु भ्रष्टाचाऱ्यांचे फास आवळत असल्यामुळे पित्त खवळले असून महाराष्ट्र बंदचा देखावा करण्यात येत असल्याची टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या आंदोलनावरुन पडळकरांनी टीका केली असून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्याबाबत बोला असे आव्हान केले आहे. लखीमपुर खीरीमध्ये शेतकऱ्यांच्या हत्येच्या घटनेविरुद्ध निषेध करण्यासाठी महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. मात्र महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्नांकडे ठाकरे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.

भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी महाराष्ट्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. पडळकर यांनी म्हटलं आहे की, लखीमपुरच्या घटनेबद्दल आम्हाला संपुर्ण सहानुभूती आणि सहवेदना आहे. म्हणून याचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरु आहे. आमचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे क्षमतापुर्ण नेते आहेत. ते निश्चितपणे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये कठोर कारवाई करतील परंतु जनाब संजय राऊत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्याबाबत बोला जो ओल्या दुष्काळामुळे आत्महत्येच्या उंबरठ्यावर आला आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करतो म्हणणारे मदत करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले नाहीत असा घणाघात पडळकरांनी केला आहे.

महाराष्ट्र बंदचा कांगावा म्हणजे स्वतः..

शेतकऱ्यांना पंचनाम्यांच्या खाबूगिरीत अडकवून ठेवलं आहे. आजचा महाराष्ट्र बंदचा कांगावा म्हणजे स्वतःच्या घरी आग लागले असताना शेजारच्या गावातील धुरासाठी बोंबा मारण्यासारखे असल्याची खोचक टीका पडळकरांनी केली आहे.

काकांचे दुःख सतावत आहे

तुमचे खरं दुःख हे काकाजींच्यासाठी सतावत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राच्या सहकाराला लागलेली किड साफ करायचे ठरवले आहे. ज्यांनी शेतकऱ्यांचे पैसे खाल्ले कारखाने कवडीमोल दराने गिळंकृत केले अशा सर्वांचे फास आवळत आहेत. यामुळे पित्त खवळले असून महाराष्ट्र बंदचा देखावा केला असल्याचे पडळकर यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा :  Maharashtra Band : हा बंद म्हणजे सरकार स्पॉन्सर्ड दहशतवाद – फडणवीस