Maharashtra Bandh : महाराष्ट्र बंद पूर्णपणे फसलेला आहे, जो काही बंद तो भीतीने – चंद्रकांत पाटील

निसर्गाला महाविकास आघाडी सरकार मान्य नाही

Maharashtra Bandh chandrakant patil slams state government on maharashtra bandh
Maharashtra Bandh : महाराष्ट्र बंद पुर्णपणे फसलेला आहे, जो काही बंद तो भीतीने - चंद्रकांत पाटील

लखीमपुर खीरी येथील आंदोलनकारी शेतकऱ्यांच्या हत्येप्रकरणी महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. परंतु महाराष्ट्र बंद हा फसलेला आहे. आज जो काही बंद आहे तो केवळ भीतीने असल्याचा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. लखीमपुर खीरी प्रकरण दुर्दैवी आहे. त्याची चौकशी सुरु आहे. परंतु महाराष्ट्र बंदची हाक देणं हे न कळणारे असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाणीव असेल तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना महाराष्ट्र बंदवरुन राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. लखीमपुरमध्ये घडलेल्या घटनेपासून भाजपच्या विरोधकांनी हा विषय प्रचंड लावून धरला आहे. घडलेली घटना दुर्दैवी आहे. परंतु त्या घटनेची कारवाई होऊ शकते. त्या घटनेचा भाजप, केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेशमधील सरकारशी काय संबंध आहे. हे माहिती नाही. केंद्रीय मंत्र्यांच्या मुलावर शेतकऱ्यांवर गाडी चढवल्याचा आरोप आहे. त्याची चौकशी होईल, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. परंतु महाराष्ट्र बंदची हाक देणं हे न कळणारे असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. आजचा महाराष्ट्र बंद हा पुर्णपणे फसलेला आहे. जो काही बंद आहे तो भीतीने पाळण्यात आला असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

कोल्हापुरमधील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिवसेनेला आवाहन केलं की शिवसेना स्टाईलने बंद करा. म्हणजे यांच्यामध्ये काहीच ताकद नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना वारंवार सांगत आहे की, हे तुमच्या जीवावर मोठे होत आहेत. यांच्याकडे लोकं नाहीत बंद करायला तेवढा धाकही नाही. शिवसेनेकडून बंद म्हटल्यावर लोकं घाबरतात असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

व्यापाऱ्यांना काही माहिती नाही

महाराष्ट्र बंद हा मनापासून झालाय का ते पाहा, व्यापाऱ्यांच्या मुलाखती घेऊन विचारा हा बंद कशामुळे करण्यात आला आहे. ते म्हणतील मला माहिती नाही. पुण्यातील नेते व्यापारी संघटनेच्या अध्यक्षांना जाऊन विनंती करतात की तुम्ही बंद करा. दुपारी ५ वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवा असा हल्लाबोल चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर केला आहे.

निसर्गाला महाविकास आघाडी सरकार मान्य नाही

चंद्रकांत पाटील यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. राज्य सरकार आल्यापासून नैसर्गिक आपत्ती होत आहेत. निसर्गालाही राज्य सरकार मान्य नाही. दोन मोठी वादळं सरकार आल्यापासून झाली आहेत. निसर्गाला यांचे सरकार मान्य नाही. सरकार आल्यापासून कोरोना, दोन वादळे आली. महाराष्ट्रात आपत्तीच आपत्ती येत आहे. माणसांना न्याय नाही. मदत नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन हाक नाही? एखाद्या राज्यात सत्तेत असलेल्यांनीच बंदची हाक देणं ही पहिलीच घटना असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी कोणाची

महाविकास आघाडी सत्तेत आहे. कायदा सुव्यवस्था यांची जबाबदारी आहे. परंतु यांचेच कार्यकर्ते रस्त्यावर दंडुके घेऊन फिरत आहेत आणि सांगत आहेत की, दुकाने बंद करा हे सरकारमधील पक्षांचे काम आहे का? मग जर शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाणीव असेल तर वादळ झाली त्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अजून मिळाली नाही. कर्जमाफी आर्धी झाली आर्धी राहिली आहे त्याबाबत हे सरकार का काम करत नाही असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारला केला आहे.


हेही वाचा : Maharashtra Bandh : केंद्रीय मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी – नाना पटोले