घरताज्या घडामोडीमावळमध्ये नेत्याच्या मुलाने गोळीबार केला नव्हता, जितेंद्र आव्हाडांचे फडणवीसांना प्रत्युत्तर

मावळमध्ये नेत्याच्या मुलाने गोळीबार केला नव्हता, जितेंद्र आव्हाडांचे फडणवीसांना प्रत्युत्तर

Subscribe

महाराष्ट्रात लखीमपुर खीरी येथील शेतकऱ्यांच्या हत्येप्रकरणाचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका करताना मावळमधील शेतकऱ्यांवर झालेल्या गोळीबारावरुन प्रश्न करत निशाणा साधला आहे. फडणवीसांचा टिकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मावळमधील घटनेत आंदोलनकारी शेतकऱ्यांवर कोणत्या नेत्याच्या मुलाने गोळीबार केला नाही तर पोलिसांनी गोळीबार केला आहे. लखीमपुरमध्ये देशाच्या गृहराज्यमंत्र्यांच्या मुलाने गरीब शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून चिरडले असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये फडणवीसांवर जोरदार हल्ला चढवला आहे. भाजपच्या लेखी शेतकऱ्यांची किंमत काय हेच दिसून आलं असल्याची टीका आव्हाड यांनी केली आहे. लखीमपुरमधील अमानवी कृत्याचे दुःख होणं हे माणुसकीचे दर्शन आहे. सत्तेचा माज आता घटनेतून दिसत आहे. गोरगरीब शेतकरी उभे असताना त्यांच्या मागून जीप आणायची आणि त्यांच्या अंगावर घालायची ९ जण चिरडून मारुन टाकायची. त्यांच्याबद्दल जर वाईट वाटणार नसेल तर ती महाराष्ट्राची संस्कृती नाही. त्यामुळे शेतकरी कुठला असो तो या देशाचा शेतकरी आहे. या देशासाठी अन्न पिकवतो. उत्तर प्रदेशमध्ये ज्या भागात ही घटना घडली त्या भागात गहू होतो. घरात पोळ्या बनतात त्या तिथूनच आलेल्या गव्हाणे होतात. खाताना बऱ्या वाटतात तर शेतकऱ्यांना चिरडतानाचे दुःख हे दाखवावे की नाही. तुमच्या लेखी शेतकऱ्यांची किंमत काय हेच दिसून येते असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

मावळची दुर्घटनेत गोळीबार गरजेचा होता

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर देताना म्हटलं आहे की, मावळची दुर्घटना घडली त्याची चौकशी झाली. त्या चौकशीत तो गोळीबार कसा गरजेचा होता हे न्यायाधीशांनी मान्य केलं आहे. त्यावेळी भाजपला संधी दिली होती ते विरोधी पक्षात होते. मावळला पोलिसांनी गोळीबार केला होता. पोलिसांच्या हातातून बंदूक घेऊन कोणा नेत्याच्या मुलाने गोळीबार केला नव्हता. लखीमपुरला केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या मुलाने शेतकऱ्यांवर गाडी घातली. मावळचा गोळीबार हा पोलिसांचा होता असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

तर त्यांच्यातील माणुसकी दिसली असती

दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. ते विरोधी पक्षात आहेत. सत्ताधाऱ्यांनी बंद केलं आहे. यामुळे ते बोलणारच त्याच्यात काही मोठं नाही. त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. ते विरोधक आहेत परंतु ती घटना वाईट आहे एवढं जरी बोले असते तरी त्यांच्यातील माणुसकी आणि जिवंतपणा दिसला असता असे आव्हाड यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

फडणवीसांचा मावळ घटनेवरुन राज्य सरकारवर निशाणा

या सरकारमध्ये तीच लोकं आहेत ज्या लोकांनी मावळला पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता. या गोळीबार करणाऱ्या सरकारला नैतिकता आहे का आंदोलन करण्याची असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ईस्टर्न एक्सप्रेसवेवर महाविकास आघाडी सरकारमधील १० कार्यकर्ते मार्ग रोखून धरतात. त्या रस्त्यावर टायर जाळून जाळपोळ करतात पोलीस प्रशासन तेथे उपस्थित आहेत. पंरतु पोलीस कारवाई करत नाही. एकूणच हे सरकार पुरस्कृत दहशतवाद सुरु असल्याचे दिसत आहे. असा घणाघात फडणवीस यांनी केला आहे.

काय आहे प्रकरण

राज्यात २०११ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असताना पुण्यातील मावळमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. ९ ऑगस्ट २०११ रोजी शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनामध्ये पोलिसांनी गोळीबार केला होता. शेतकऱ्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाईपलाईन योजनेला जोरदार विरोध करत आंदोलन केलं होते. आंदोलनाला हिंसक वळण आल्यामुळे दगडफेक करण्यात आला यामुळे पोलिसांनी गर्दी पांगवताना गोळबार केला. या गोळीबारात ३ शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला यामध्ये एका महिलेचा समावेश होता. तर एकूण १४ शेतकरी जखमी झाले होते.


हेही वाचा :  Maharashtra Band : हा बंद म्हणजे सरकार स्पॉन्सर्ड दहशतवाद – फडणवीस


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -