‘जर मर्द असाल तर, मर्दासारखं…’ केंद्रीय यंत्रणांच्या कारवायांवरून उद्धव ठाकरेंचे भाजपला थेट आव्हान

maharashtra budget session cm uddhav thackeray challenged to bjp over allegations against thackeray family

केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधीमंडळात भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन कुटुंबियांना त्रास देण्याचा अत्यंत नीच प्रकार सध्या घडतोय. जर मर्द असाल तर मर्दासारखं अंगावर या, मग बघून घेतो असं थेट आव्हान मुख्यमंत्र्यांनी भाजपला दिले आहे. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने कारवाई केली. यासोबत महाविकास आघाडीच्या नेत्यांवरही ईडीकडून कारवाई सुरु आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी भाजपला हे खुले आव्हान दिले आहे.

अधिवेशनच्या शेवटच्या दिवशी आज मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून एकमेकांच्या कुटुंबियांना त्रास देण्याची अत्यंत विकृत पद्धत सुरु आहे. आम्ही तुमच्यासोबत असतो तर तुम्ही आमच्या कुटुंबियांना बदनाम केले असते का? ही अत्यंत नीच आणि निंदनीय पद्धत, विकृत अशी गोष्ट सुरु आहे. जर मर्द असाल तर मर्दासारखे अंगावर या, मग बघून घेतो. सत्तेचा, संस्थांचा दुरुपयोग करून या गोष्टी केल्या जातायत. शिखंडीच्या मागे राहून धाडी टाकायच्या याला मर्दपणा म्हणत नाहीत. अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

तर मला तुरुंगात टाका…

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, कुटुंबावर आरोप करायचे, धाडी टाकायच्या, हे काय चाललंय? तुम्हाला सत्ता हवी आहे म्हणून कुटुंबाला तणावाखाली ठेवत आहात. माझ्या कुटुंबाला बदनाम करून त्यांच्यावर धाडी टाकत आहात ना? चला सगळ्यांसमोर सांगतो. मीच तुमच्यासोबत येतो पण सत्तेसाठी नाही येणार तर तुम्ही मलाच तुरुंगात टाका, असं खुले आव्हान मुख्यमंत्र्यांनी भाजपला दिले.

बाळासाहेबांनी तुमच्या नेत्यांना वाचवले

आम्ही तुमच्या कुटुंबियांची बदनामी केली नाही. बाळासाहेबांनी तुमच्या नेत्यांना वाचवले ते त्यांच्याकडे गेल्यानंतर तुम्ही काय उत्तर देणार? इंदिरा गांधींनी थेट आणीबाणीची घोषणा केली होती. आज अघोषित आणीबाणी सुरु आहे. अस देखील मुख्यमंत्री म्हणाले.

पहाटेचा प्रयोग यशस्वी झाला असता तर…

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावरील ईडीच्या कारवाईवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, आम्ही सगळे भ्रष्टाचारी आणि दाऊदची माणसं आहोत असं विरोधक म्हणतायत. पण पहाटेचा प्रयोग यशस्वी झाला असता तर नवाब मलिक आणि अनिल देशमुख तुमच्या मांडीला मांडी लावून बसले असते. मग ते भ्रष्टाचारी ठरले असते का? किंवा आम्ही जर तुमच्यासोबत असतो तर तुम्ही आमच्या कुटुंबियांना त्रास दिला असता का?

मला अडचणीत आणायचे असल्यास थेट माझ्या अंगावर या. कुटुंबाची बदनामी का करता? आम्ही कधी तुमच्या कुटुंबाची बदनामी केली आहे का? कधी तुमच्या कुटुंबाच्या भानगडी बाहेर काढल्या आहेत का?’ असे अनेक सवालही मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

नितीन गडकरी म्हणाले होते की, भाजपमध्ये आल्यानंतर वाल्याचा वाल्मिकी होतो. आता भाजपने ह्युमन लॉंड्रिग सुरु केलं आहे. पण हे सगळं कुणाला माहिती नाही असं काही समजू नका. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे.” अस देखील मुख्यमंत्री म्हणाले आहेत.


Maharashtra Budget Session 2022 : राज्याचं पावसाळी अधिवेशन १८ जुलै रोजी होणार