घरBudget 2024Maharashtra Budget Session : "आपल्याला काय...", अर्थसंकल्पावर बोलताना जयंत पाटलांनी सरकारला सुनावले

Maharashtra Budget Session : “आपल्याला काय…”, अर्थसंकल्पावर बोलताना जयंत पाटलांनी सरकारला सुनावले

Subscribe

मुंबई : अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्प मंगळवारी (ता. 27 फेब्रुवारी) सादर केला. अर्थसंकल्प सादर करताना आणि शेवटी अजितदादांनी कुसुमाग्रजांच्या कवितांच्या ओळी वाचून दाखवून विरोधकांना चिमटा काढला. ज्यामुळे विरोधी पक्षातील काही प्रमुख नेतेही अर्थसंकल्पावर चर्चा करताना त्यावर कवितेतून टीका करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी अंतरिम अर्थसंकल्पाबाबत विधानसभेत आपले मत व्यक्त केले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विधानसभेत अर्थसंकल्पावर चर्चा करण्यात आली. याचवेळी जयंत पाटील यांनी यंदाच्या अर्थसंकल्पावर सडकून टीका केली. (Maharashtra Budget Session : Jayant Patil criticism of government while talking about the budget)

हेही वाचा… Maharashtra Budget Session : कुसुमाग्रजांच्या कवितेवरून विजय वडेट्टीवारांचा अजित पवारांना चिमटा

- Advertisement -

विधानसभेत जयंत पाटील म्हणाले की, पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून अनेक मागण्या करण्यात आल्या. मात्र यामुळे वित्तीय तूट वाढली आहे. लवकरच राज्याच्या डोक्यावरील कर्ज एक लाख कोटी रुपये होणार आहे. हे कर्ज कसे फेडणार, असा प्रश्न यावेळी त्यांच्याकडून उपस्थित करण्यात आला. तर यावेळचा अंतरिम अर्थसंकल्प हा गेल्या वर्षाच्या अर्थसंकल्पापेक्षा एक लाख कोटी रुपयांपेक्षा वाढीव रकमेचा होता. राज्य सरकारने मागचा अर्थसंकल्प हा 17 हजार कोटी रुपयांच्या तुटीचा मांडला. तुटीचा अर्थसंकल्प मांडल्यावर जून महिन्यात या अर्थसंकल्पात पुरवणी मागण्यांची 44 हजार कोटींची भर घातली. त्यानंतर डिसेंबर महिन्यातही 55 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या करण्यात आल्या. त्यानंतर आता काल-परवा 8 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या करण्यात आल्या. अर्थसंकल्प मांडताना तो तुटीचा होता. तरीदेखील राज्य सरकारने एक लाख कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या, असा हल्लाबोल यावेळी पाटील यांच्याकडून करण्यात आला.

तर, आम्ही सत्तेत असताना अजित पवारांनी 2022 सालचा अर्थसंकल्प मांडला होता. त्यावेळी तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी आमच्यावर टीका केली. आता 40 आमदार सत्तेत सामील झाले आहेत. सत्तेत येताना या आमदारांनी काही अटी टाकल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी पुरवणी मागण्यांचे शेपूट वाढत गेले. या मागण्यांमुळे तूट वाढ वाढणार होती. या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठीची तरतूद या नव्या अर्थसंकल्पात आहे का? 94 हजार कोटींची वित्तीय तूट 99 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. वित्तीय तूट ही 99 हजार 288 कोटी रुपये आहे. म्हणजे ही तूट एक लाख कोटींच्या वरच आहे. थोडी तडजोड करून दुरूस्ती केलेली दिसत आहे, असा खोचक टोला जयंत पाटील यांनी सरकारला लगावला आहे.

- Advertisement -

आपण बाटाच्या दुकानात गेल्यावर बुटाची किंमत ही 999 रुपयांच्या स्वरुपात असते. मला दुकानात गेल्यावर प्रश्न पडतो की हा बूट 990 रुपयांना का नाही. तो 999 रुपयांनाच का असतो. लोकांना वाटते की तो बुट 1000 रुपयांना नाही, तो 999 रुपयांना आहे, तोच घेऊया. अगदी तशाच पद्धतीने वित्तीय तुटीचा आकडा दाखवण्यात आला, अशी स्पष्ट भूमिका जयंत पाटील यांच्याकडून मांडण्यात आली. अर्थसंकल्पावरील आपले मत व्यक्त केल्यानंतर जयंत पाटील यांनी कवितेच्या माध्यमातून सरकारवर टीकास्त्र डागले. “आपल्याला काय… फक्त बोलून निघून जाण्याची घाई”, असे म्हणत त्यांनी सरकारला टोला लगावला आहे.

या अर्थसंकल्पाचे यथार्थ वर्णन करत जयंत पाटील म्हणाले की, “हाताला काम नाही… सुशिक्षितांना रोजगार नाही, दुष्काळ, अतिवृष्टीच्या चक्रात ग्रासलाय शेतकरी, पोटा पाण्यासाठी वणवण सारी… आपल्याला काय, फक्त बोलून निघून जाण्याची घाई, आरोग्य यंत्रणा ढिसाळ झाली, रुग्णांच्या जिवाला किंमतच नाही… मायेच्या अश्रुंची थट्टा झाली, गरिबांना कोण वाली? आपल्याला काय, फक्त बोलून निघून जाण्याची घाई, इथे दिवसा ढवळ्या महिला सुरक्षित नाहीत, किड्या-मुंग्यांसारखे त्यांचे जगणे वाईट… धर्माधर्मातील तिढा सुटेना काही, आगीत तेल ओतायला आहेत काही भाई… आपल्याला काय, फक्त बोलून निघून जाण्याची घाई, वाढत चालली घोटाळ्यांची मांदियाळी, दिल्लीच्या वरदहस्ताने भाजली जाते पोळी, साम-दाम-दंड-भेद हीच विचारांची झोळी, चिरडून टाकूया आंदोलकांच्या टोळ्या… आपल्याला काय, फक्त बोलून निघून जाण्याची घाई,” असे म्हणत जयंत पाटलांनी सडकून टीका केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -