घरBudget 2024Maharashtra Budget Session : "कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?" जयंत पाटलांचा सरकारला...

Maharashtra Budget Session : “कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?” जयंत पाटलांचा सरकारला प्रश्न

Subscribe

मुंबई : अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्प मंगळवारी (ता. 27 फेब्रुवारी) सादर केला. या अर्थसंल्पावर विधानसभेत चर्चा करण्यात येत असून विरोधकांकडून सरकारवर सडकून टीका केली जात आहे. शेतकऱ्यांसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आल्याची माहिती सत्ताधारी पक्षाकडून देण्यात येत आहे. परंतु शेतकऱ्यांच्या कापसाला, कांद्याला, सोयाबीनला व अन्य पीकांना भाव नसल्याने त्यांच्यासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, असे सांगत विरोधकांकडून सरकारवर ताशेरे ओढण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी आज (ता. 29 फेब्रुवारी) विधानसभेत शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सरकारला सुनावले आहे. (Maharashtra Budget Session: Jayant Patil question to state government on issue of budget)

हेही वाचा… Maharashtra Budget Session : “आपल्याला काय…”, अर्थसंकल्पावर बोलताना जयंत पाटलांनी सरकारला सुनावले

- Advertisement -

यंदाचा अर्थसंकल्प हा तुटीचा अर्थसंकल्प असल्याचे सांगत जयंत पाटील म्हणाले की, तूट वाढवणाऱ्या प्रोव्हीजन्स या अर्थसंकल्पात आहेत का? महाराष्ट्राचे कर्ज आता आपण 8 लाख कोटी रुपयांपर्यंत नेऊन पोहोचवले आहात ते फेडणार कसे? 1 ट्रिलीयन डॉलर जर इकोनॉमी करायची असेल तर ग्रोथ रेट 14 टक्के असायला हवा. अर्थसंकल्पात अनेक घोषणा आहेत, मागच्या किती योजना राबवल्या गेल्या त्याचा उल्लेख या अर्थसंकल्पीय भाषणात यायला हवा होता. दुष्काळ वाढतोय, कांद्याला भाव नाही, दुधाला रास्त भाव नाही, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही, त्यामुळे ते सरकारवर प्रचंड नाराज आहेत. हायवे बांधण्यापलीकडे सरकारचे सामान्य माणसाकडे लक्ष नाही, असा घणाघात त्यांच्याकडून करण्यात आला.

तर, शेतकऱ्यांपुढे जगायचे कसे? हा प्रश्न आहे. कापसाला, सोयाबीनला भाव नाही, सरकारने खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी केंद्राकडे मागणी देखील केलेली नाही. शेतकरी आत्महत्यामुक्त राज्य करणार असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते, पण आज रोज 8 शेतकरी आत्महत्या करत आहेत. एनसीआरबीच्या रिपोर्टनुसार शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र नंबर एकवर आला आहे. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? हे म्हणायची वेळ आता आली आहे, असा प्रश्न जयंत पाटील यांनी सरकारसमोर उपस्थित केला आहे.

- Advertisement -

तसेच, शासन आपल्या दारीवर प्रचंड खर्च होत आहे, पण शेतकरी सावकाराच्या दारी जात आहे. शेतकऱ्यांचा सन्मान म्हणून आपण त्याला दिवसाला 17 रुपये देतो, त्याला शेतीमालाची आधारभूत किंमत वाढवण्याची गरज आहे. पीक विमा शेतकऱ्यांना अजून मिळालेला नाही, त्यात अनेक अटी व शर्ती असल्यामुळे एकही रुपया मिळत नाही. एक रुपयात विमा काढून सरकार हजारो कोटी कंपन्यांच्या घशात घालत आहे. सरकार नोकर भरती करत नाही, केले तर पेपर फुटतो. पारदर्शकपणे काम सुरू आहे असे एकही उदाहरण दिसत नाही. रोजगारासाठी तरुणांची भटकंती वाढलेली आहे, तरुण आत्महत्या करत आहेत. एनसीआरबीच्या रिपोर्टनुसार गेल्या दोन वर्षांत सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असेही जयंत पाटील यांनी सरकारला सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -