घरBudget 2024Maharashtra Budget Session : सभागृहात कामकाज सुरू असतानाच मुख्यमंत्री शिंदेसमोर आमदारांचा गराडा

Maharashtra Budget Session : सभागृहात कामकाज सुरू असतानाच मुख्यमंत्री शिंदेसमोर आमदारांचा गराडा

Subscribe

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची चाहूल लागल्याने निवडणूक जाहीर होण्यापूर्वी मतदारसंघातील कामे मार्गी लागावीत म्हणून सध्या सर्वपक्षीय आमदारांची लगबग सुरू आहे. या लगबगीचा प्रत्यय आज गुरुवारी (ता. 29 फेब्रुवारी) विधानसभा सभागृहात आला. आज सभागृहात सन 2024-25 या वर्षाच्या अंतरिम अर्थसंकल्पावर चर्चा सुरू असताना मंत्र्यांसह सर्वपक्षीय 12 ते 15 आमदारांनी पत्रावर शेरा आणि सही मिळावी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गराडा घातला होता. सभागृह सुरू असताना आजूबाजूला जमलेली गर्दी पाहून शेवटी शिंदे हे सभागृहातून निघून गेले. (Maharashtra Budget Session: MLAs gather in front of CM Eknath Shinde while working in the House)

हेही वाचा… Maharashtra Budget Session : “…सरकारचे याकडे दुर्लक्ष”, प्राजक्त तनपुरे संतापले

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बनावट सही, शिक्क्याचे आणि अभिप्रायाचे प्रकरण सध्या चर्चेत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालय अधिक सावध झाले आहे. अशातच आमदारांकडून मुख्यमंत्र्यांवर पत्रांचा भडीमार सुरू आहे. राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनानिमित्ताने मुख्यमंत्र्यांचे वेळापत्रक कमालीचे व्यग्र आहे. बैठका आणि चर्चा सत्रांमुळे मुख्यमंत्र्यांना गाठून त्यांची सही मिळविणे आमदारांना कठीण जात आहे. त्यामुळे शिंदे सभागृहात आल्यानंतर पत्रावर त्यांची सही घेण्यासाठी आमदारांची झुंबड उडते. आता लोकसभा निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता असल्याने आपल्या कामाचा खोळंबा होऊ नये म्हणून आमदार कामाला लागले आहेत.

काँग्रेसचे आमदार लहू कानडे आज अर्थसंकल्पावर बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहात पोहोचले. शिंदे आपल्या जागेवर स्थानापन्न होताच अपक्ष आमदार गीता जैन यांनी मुख्यमंत्र्यांच्या दिशेने धाव घेतली. विधानसभा अध्यक्षांकडे पाठ करून त्या बराच वेळ शिंदे यांच्याशी बोलत होत्या. मुख्यमंत्री जैन यांच्याशी बोलत असल्याने मुख्यमंत्र्यांच्या मागच्या रांगेत बसलेल्या आमदारांची चुळबुळ वाढली होती. त्यानंतर सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई आणि त्यापाठोपाठ संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील शिंदे यांच्या जवळ आले आणि काहीतरी बोलले.

- Advertisement -

मराठवाड्यातील भाजपाच्या एका आमदाराने चार ते पाच पत्र मुख्यमंत्री शिंदे यांच्या समोर ठेवली. या पत्रावर सही करण्यापूर्वी शिंदे यांनी संबंधित आमदाराला खासगी सचिवांकडून अभिप्राय लिहून घेण्याची सूचना केली. या आमदार महोदयांनी सभागृहातील शिपाईच्या मार्फत अधिकारी गॅलरीत बसलेले खासगी सचिव बालाजी खतगांवकर यांच्याकडे पत्र देण्याऐवजी स्वतः नेऊन दिली. विशेष म्हणजे अधिकारी शिपाई मार्फत पत्र पाठवा, असे खुणावत होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचे अभिप्राय घेण्यासाठी आमदारांची गर्दी वाढत गेली. कामगार मंत्री सुरेश खाडे यांनीही आपली दोन-चार पत्रे पुढे केली. सभागृहात सदस्य बोलत असताना आमदार मुख्यमंत्र्यांसमोर गराडा घालत असल्याचे पाहायला मिळाले. तसेच काही आमदार गप्पा मारत होते. सभागृहाची शिस्त मोडणारे हे चित्र पाहून शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहाच्या बाहेर पडणे पसंत केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -