नाशिकमधील कृषी विज्ञान संकुलात तीन नवीन महाविद्यालये, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

कृषी विज्ञान संकुलांतर्गत कृषी शिक्षणाबरोबरच कृषी पूरक उद्योग विकास, प्रक्रिया केंद्र, शेतकरी प्रशिक्षण केंद्र व सुविधा केंद्र, आदर्श रोपवाटिका संकुल, सर्व कृषी निविष्ठांचे संशोधन आणि निर्माण केंद्र असे विविध कृषी विषयक उपक्रम विकसित करण्याचे नियोजन आहे. या संकुलामुळे नाशिक जिल्ह्यात एकाच ठिकाणी कृषी शिक्षणाच्या विविध संधी उपलब्ध होतील. 

mantralay

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत मौजे काष्टी, ता. मालेगाव जि. नाशिक येथे कृषी विज्ञान संकुलात कृषी महाविद्यालय, उद्यानविद्या महाविद्यालय, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय ही तीन महाविद्यालये (start three new colleges in Krishi Vigyan Sankul in Nashik) सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्यास सोमवारी झालेल्या राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

४९० कोटींचा खर्च

कृषी महाविद्यालय (, College of Agriculture) आणि उद्यान विद्या महाविद्यालयाची (College of Horticulture) प्रवेश क्षमता  प्रत्येकी ६० असून अभ्यासक्रमाचा कालावधी ४ वर्षांचा आहे तसेच कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाची (College of Agricultural Engineering and Technology) प्रवेश क्षमता ४० विद्यार्थ्यांची असून अभ्यासक्रमाचा कालावधी ४ वर्षांचा आहे.  या महाविद्यालयांच्या निर्मितीकरिता अंदाजे ४९० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय सुरु

मौजे काष्टी येथे कृषी विज्ञान संकुल निर्मितीस तसेच कृषी महाविद्यालय, उद्यान विद्या विद्यालय, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय आणि कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय ही पाच महाविद्यालये सुरु करण्यास दिनांक २६ ऑगस्ट २०२० रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत तत्वत: मान्यता देण्यात आली होती. २०२०-२१ पासून कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, २०२१-२२ पासून अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय सुरु झाले आहे. उर्वरित तीन महाविद्यालये येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्यास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

एकाच ठिकाणी कृषी शिक्षणाच्या संधी

कृषी विज्ञान संकुलांतर्गत कृषी शिक्षणाबरोबरच कृषी पूरक उद्योग विकास, प्रक्रिया केंद्र, शेतकरी प्रशिक्षण केंद्र व सुविधा केंद्र, आदर्श रोपवाटिका संकुल, सर्व कृषी निविष्ठांचे संशोधन आणि निर्माण केंद्र असे विविध कृषी विषयक उपक्रम विकसित करण्याचे नियोजन आहे. या संकुलामुळे नाशिक जिल्ह्यात एकाच ठिकाणी कृषी शिक्षणाच्या विविध संधी उपलब्ध होतील.  कृषी पदवीधारकांच्या माध्यमातून विविध ठिकाणी कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करणे, ग्रामपातळीवरील विस्तार, ग्रामसेवक, कृषी मदतनीस, तज्ज्ञ प्रशिक्षक, कृषी संशोधक, आधुनिक शेतकरी यांना सहाय्य करून देशाच्या कृषी क्षेत्रात मोलाचे योगदान देणे, कृषी आधारित स्टार्टअप्स सुरु करणे यासारख्या बाबी साध्य करणे यामुळे शक्य होईल.

कृषी सिंचन योजनेचा विस्तार

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेचा विस्तार करून त्यामध्ये वैयक्तिक शेततळ्याचा समावेश करण्याचा निर्णय  मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यापूर्वी “मागेल त्याला शेततळे” योजनेत शेतकऱ्यांना देण्यात येत असलेल्या ५० हजार रुपयांच्या अनुदानात ५० टक्के वाढ करून या योजनेत शेतकऱ्यांना विविध आकारमानाच्या वैयक्तिक शेततळ्यासाठी शासनाने निश्चित केलेला खर्चाच्या मापदंडा एवढे किंवा ७५ हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढे अनुदान देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे

शेततळ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, पिकांच्या शाश्वत उत्पादनाची व हमखास आर्थिक उत्पन्नाची खात्री मिळावी यादृष्टीने वित्तमंत्र्यांनी  सन २०२२-२३ च्या अर्थसंकल्पीय भाषणात ही घोषणा केली होती. त्यास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली.