मुंबई : राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर महायुती सरकारला आता मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले आहेत. भाजपसह शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची यादी दिल्लीतून भाजप श्रेष्ठींकडून निश्चित केली जाणार असल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या गटात धाकधूक असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीत पोहोचले आहेत. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अजूनही मुंबईत असून ते दिल्लीला जाण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. (maharashtra cabinet expansion likely by december 14 devendra fadnavis and ajit pawar on delhi visit eknath shinde in mumbai)
तिन्ही घटक पक्षांतील खातेवाटपाचे आणि मंत्र्यांच्या संख्येचे सूत्र अंतिम झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल. राज्य विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाला 16 डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. अधिवेशनापूर्वी म्हणजे 12 किंवा 14 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार अपेक्षित आहे. एका भाजपा नेत्याने देखील 14 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळ विस्तार होण्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयाने एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची औपचारिक भेट घेतील.
दरम्यान, सरकार स्थापन होण्यापूर्वी शिवसेना सातत्याने गृहमंत्रालयाची मागणी करत होती. मात्र, तेव्हाही भाजपा हे पद सोडणार नाही, अशीच चर्चा होती. गृहमंत्रालय सोडून अन्य मंत्रालयांबाबत चर्चा होऊ शकते, असे तेव्हा सांगितले जात होते. आता भाजप नेत्याने वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेला गृहमंत्रालय मिळणार नाही. आणि महसूल विभाग मिळण्याची देखील शक्यता नाही.
महायुतीत भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी असे तीन पक्ष असल्याने चर्चेला वेळ लागतो आहे. तरीही 14 डिसेंबरपर्यंत यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर या नेत्याने सांगितले की, शिवसेनेला नगरविकास मंत्रालय मिळू शकते मात्र, महसूल विभाग मिळण्याची शक्यता नाही.
राज्य मंत्रिमंडळात एकूण 43 मंत्री असू शकतात. भाजपाचे 21 ते 22 मंत्री, शिंदेंना 10 ते 12 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 9 ते 10 मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे.
जून 2022 प्रमाणे महायुतीत खातेवाटप होणार नाही. कारण विधानसभेतील 2019 चे संख्याबळ आणि आताचे संख्याबळ यात फरक आहे. त्यामुळे आमदारांच्या संख्येनुसार महायुतीमधील प्रत्येक पक्षाच्या कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांची संख्या निश्चित होणार आहे. सत्तावाटपाच्या सूत्राला अंतिम स्वरूप मिळाल्यानंतर भाजप, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या मंत्र्यांची यादी मान्यतेसाठी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सादर केली जाईल. दिल्लीतून हिरवा कंदील मिळाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळातील काही जागा रिक्त ठेवून विस्तार मार्गी लावला जाणार आहे.
Edited by : Ashwini A. Bhatavdekar