Sunday, March 16, 2025
27 C
Mumbai
Homeमहाराष्ट्रCabinet Meeting : मंत्रिमंडळ बैठकीत शिंदे गटाच्या नाराजीचे पडसाद, नेमकं काय घडलं?

Cabinet Meeting : मंत्रिमंडळ बैठकीत शिंदे गटाच्या नाराजीचे पडसाद, नेमकं काय घडलं?

Subscribe

– प्रेमानंद बच्छाव

मुंबई : एसटीच्या अध्यक्षपदी सनदी अधिकार्‍याची झालेली नेमणूक, उद्योग खात्यात संबंधित मंत्र्यांना अंधारात ठेवून होणारे निर्णय यावरून शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांमध्ये असलेल्या नाराजीचे तीव्र पडसाद मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटले. बैठकीच्या विषय पत्रिकेवरील विषय संपल्यानंतर सर्व सचिवांना बैठकीबाहेर काढण्यात आले. त्यानंतर जवळपास 15 मिनिटे बंद दाराआड मंत्रिमंडळ बैठकीत गरमागरम चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. मंत्रिमंडळातील समावेश आणि खातेवाटपावरून शिवसेना शिंदे गटात नाराजी होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक शासकीय बैठकांना गैरहजर राहून या नाराजीचे जाहीर प्रदर्शन केले होते. त्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या खात्यात होणार्‍या हस्तक्षेपाबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणावर एकनाथ शिंदेंची नियुक्ती न झाल्याबाबतही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत या सगळ्याचे पडसाद उमटल्याचे सूत्रांनी सांगितले. (Maharashtra cabinet meeting and shivsena ministers in marathi)

हेही वाचा : Lakhpati Didi : लाडकी बहिणींनंतर आता लखपती दीदी, मुख्यमंत्री फडणवीसांची नवी योजना 

आमच्या खात्यामध्ये होणार्‍या हस्तक्षेपाबाबत शिंदे गटाच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केल्याचे समजते. विशेषतः उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विभागाचे प्रधान सचिव आणि एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याबाबत आपली नाराजी व्यक्त केल्याचे सांगण्यात आले. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून सुरू असलेला तिढाही अद्याप संपलेला नाही. या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदावर शिंदे गटाने दावा केलेला आहे. त्याबाबतही बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीकडे पाठ

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात जिल्हा वार्षिक योजना सन 2025-26 साठी सर्वसाधारण राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत रायगड आणि नाशिक जिल्हा नियोजन समितीबाबत चर्चा करण्यात आली. या दोन्ही जिल्ह्यात सध्या पालकमंत्री नसल्याने अजित पवार यांच्या कार्यालयाकडून बैठकीला उपस्थित राहण्यासाठी संबंधित जिल्ह्यातील मंत्र्यांना निमंत्रण देण्यात आले होते. मात्र शिंदे गटाच्या भरत गोगावले आणि दादा भुसे यांनी अनुक्रमे रायगड, नाशिक जिल्ह्याच्या बैठकीकडे आज पाठ फिरवली होती.