घरमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांचे पुन्हा गुवाहाटी व्हाया शिर्डी, मिरगाव; नवसाला पावणार्‍या कामाख्या देवीचे सहकुटुंब दर्शन...

मुख्यमंत्र्यांचे पुन्हा गुवाहाटी व्हाया शिर्डी, मिरगाव; नवसाला पावणार्‍या कामाख्या देवीचे सहकुटुंब दर्शन घेणार

Subscribe

मुंबई : शोधलं तर देवही सापडतो, अशी एक जुनी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे, तर देव दगडात नको माणसात शोधा, अशी शिकवण देणार्‍या महान संतांची परंपराही आपल्याला लाभली आहे. कुणाचा विश्वास असो वा नसो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकामागोमाग एक करीत असलेल्या देवदर्शनाच्या दौर्‍यांकडे पाहता या म्हणींची आठवण आल्यावाचून राहत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी पुन्हा एकदा कामाख्या देवीचे दर्शन घेण्यासाठी गुवाहाटीत दाखल होत आहेत. यासाठी शिंदे गटातील आमदार आणि खासदार मुंबई विमानतळावर दाखल झाले असून थोड्याच वेळात ते गुवाहाटीच्या दिशेनं रवाना होणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी गुवाहाटीत जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे.

शिवसेनेला सुरूंग लावल्यानंतर कामाख्या देवीचे दर्शन घेऊनच एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या साथीने जून महिन्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केले होते, परंतु शिंदे गटातील आमदारांची अंतर्गत धुसफूस, मंत्रीपदावरून वाढलेली नाराजी आणि भाजप नेत्यांचे असहकाराचे धोरण यामुळे मुख्यमंत्र्यांना आता भविष्याची चिंता सतावू लागल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळेच 29नोव्हेंबर रोजी होणार्‍या सर्वोच्च न्यायालयातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हाया शिर्डी आणि मिरगाव पुन्हा एकदा कामाख्या देवीपुढे नतमस्तक होत आहेत.

- Advertisement -

पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार शनिवारी 26 नोव्हेंबरला शिंदे गट गुवाहाटीसाठी रवाना होईल. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील मंत्री, आमदार, खासदार, त्यांचे कुटुंबीय आणि काही सनदी अधिकारी अशा एकूण 180 जणांचा समावेश आहे. त्यासाठी एअर इंडियाच्या विशेष विमानाचीही सोय करण्यात आली आहे. त्यानंतर 27 नोव्हेंबरला सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदार, खासदार आणि त्यांचे कुटुंबीय प्रसिद्ध कामाख्या देवीचे दर्शन घेतील.

नवसाला पावणारी देवी म्हणून गुवाहाटीतील कामाख्या देवीचा देशभरात नावलौकिक आहे. खासकरून महाराष्ट्रात या देवीला मानणारे खूप जण आहेत. यामध्ये मोठे उद्योजक, विकासक, सनदी अधिकारी, न्यायमूर्ती आणि राजकारण्यांचा भरणा अधिक आहे. प्रसिद्ध पत्रकार अर्णब गोस्वामी यांची ही कुलदैवता असून अर्णब वादात अडकल्यावर त्यांच्या कुटुंबीयांनी याच देवीपुढे नवस केल्याचे म्हटले जाते.

- Advertisement -

एखाद्या देवी-देवाला नवस करणे, मनोकामना करणे, इच्छा पूर्ण झाल्यावर नवस फेडणे, ज्योतिष बघणे, ग्रहतारे-अंकशास्त्रावर विश्वास ठेवून निर्णय घेणे हे राजकारण्यांसाठी काही नवीन नाही. याआधी महाराष्ट्रातील 2 मुख्यमंत्र्यांनीदेखील होमहवन केल्याची बरीच चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली होती, पण दुर्दैवाने त्यांचे सरकार पडले. अडीअडचणीत सापडल्यावर देव आठवतो, असे म्हणतात. कदाचित यानुसार मुख्यमंत्रीदेखील सत्तापेचाचे विघ्न दूर करण्यासाठी देवदर्शन करीत असावेत, असेही म्हटले जात आहे.

शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सिन्नरमधील मिरगावात पोहचून ईशान्येश्वर मंदिरात शंकराची पूजा केली. त्यानंतर अंकशास्त्र बघण्यासाठी प्रसिद्ध असलेले ज्योतिषी कॅप्टन खरात यांना भेटून मुख्यमंत्र्यांनी ज्योतिष बघितल्याची राज्यभर चर्चा झाली. त्यावर आपण जे काही करतो ते उघडपणाने करतो, असे उत्तर मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले, परंतु विरोधकांकडून होणारी टीका काही कमी झालेली नाही. ज्योतिष बघणे हे डळमळीत झालेल्या आत्मविश्वासाचे लक्षण असल्याचा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी लगावला होता. त्यापाठोपाठ काही ठिकाणी आपण बकरे कापतो, काही ठिकाणी कोंबडी कापतो, तसे तिथे रेडा कापला जातो म्हणतात. आता हे कुणाचा बळी द्यायला चालले आहेत ते माहिती नाही, पण जर दर्शनासाठी चालले असतील तर आपण एकमेकांना शुभेच्छाच देतो, असे म्हणत विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या दौर्‍याला शुभेच्छा दिल्या आहेत.

6 आमदारांची दौऱ्याला गैरहजेरी

शिंदे सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्याने अनेक आमदार नाराज आहे. शिंदे गटात सध्या शिवसेनेचे 40 आणि अपक्ष व इतर 10 असे 50 आमदार आहेत. मात्र हे सर्वच आमदार आज कामाख्याच्या दर्शनाला जाणार नसल्याचे समजते. यातील 6 नाराज आमदारांची गैरहजेरी लावल्याचे दिसतेय. शिंदे गटातील काही आमदार मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने नाराज आहेत. त्यामुळे हे 6 आमदार कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार नसल्याचे समजते.


महाराष्ट्रात थंडीचा जोर ओसरला, हवामान विभागाचा ‘या’ राज्यांना इशारा

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -