Tuesday, May 11, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी महाराष्ट्रात १६ जिल्ह्यांत ऑक्सिजन तुटवडा, मुख्य सचिव सीताराम कुंटेंचे केंद्राला पत्र

महाराष्ट्रात १६ जिल्ह्यांत ऑक्सिजन तुटवडा, मुख्य सचिव सीताराम कुंटेंचे केंद्राला पत्र

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या दुसऱ्या महामारीत वाढत्या संसर्गासोबतच महाराष्ट्राची कोरोना रूग्णांची संख्याही वाढत आहे. परिणामी महाराष्ट्राला आणखी ऑक्सिजनची गरज भासत आहे. राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या रूग्णसंख्येत आणि ऑक्सिजनच्या मागणीत सातत्याने वाढ होते आहे. म्हणूनच महाराष्ट्राने वाढती ऑक्सिजनची गरज पाहता राज्याला जवळच्या आणि सोयीच्या ठिकाणाहून मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा करावा अशी मागणी केंद्राकडे केली आहे. महाराष्ट्राचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. त्यासोबतच आम्ही नजीकच्या काळात ऑक्सिजन ऑडिट करू आणि प्रत्येक जिल्ह्याची मागणीही स्पष्ट करू असा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे. महाराष्ट्रात सध्या ऑक्सिजनची मागणी वाढत असून आम्हाला आणखी २०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा करा, अशी मागणी करण्यात आली आहे.

राज्याला सध्या २०० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज असून महाराष्ट्राच्या नजीकच्या ठिकाणाहून या मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा करावा, अशी विनंती पत्रात करण्यात आली आहे. राज्याला आरआयएनएल, वायझॅग, जिंदाल स्टिल प्लॅन्ट, अंगुल, ओरिसा यासाठिकाणाहून करण्यात आलेले ऑक्सिजनचे नियोजन हे केवळ कागदोपत्रीच राहिले आहे, याचीही आठवण त्यांनी करून दिली. सध्या महाराष्ट्राला गुजरातच्या जामनगर येथून १२५ मेट्रिक टन इतका दिवसापोटीचा ऑक्सिजन मिळत आहे. हा ऑक्सिजन पुरवठा २०० मेट्रिक टन प्रतिदिन करण्याची मागणी पत्रात करण्यात आली आहे. तर भिलाई येथून मिळणारा १३० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा २३० मेट्रिक टन करण्याची मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्राला भौगौलिकदृष्ट्या नजीक असणाऱ्या भागांमधून महाराष्ट्राला ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी वेळेची बचत करणारा आहे. त्यामुळे ऑक्सिजन टॅंकरची गरजही मर्यादित असेल. त्याचा फायदा हा दैनंदिन ऑक्सिजनचे नियोजन करण्यासाठी आणि ऑक्सिजन पूर्तता करण्यासाठी होऊ शकतो.

- Advertisement -

भारत सरकार सिंगापूर, दुबई यासारख्या देशातून ISO टॅंकर मागवत आहे असे कळते. त्यातील किमान १० टॅंकर्स महाराष्ट्राला उपलब्ध करून द्यावेत. जेणेकरून ओडीशातील अंगुल येथून रोरो सेवेच्या माध्यमातून लिक्विड ऑक्सिजन आणणे सोपे होईल, असेही मुख्य सचिवांनी पत्रात म्हटले आहे.

कोणत्या १६ जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजनची मागणी ?

राज्यात सध्या ६ लाख ६३ हजार ७५८ सक्रीय रुग्ण आहेत. त्यातील ७८ हजार ८८४ रुग्ण ऑक्सिजनवर असूनची २४ हजार ७८७ रुग्णअतिदक्षता विभागात दाखल आहेत. त्याचबरोबर राज्यातील पालघर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नंदूरबार, बीड, परभणी, हिंगोली, अमरावती, बुलडाणा, वर्धा, गडचिरोली आणि चंद्रपूर या १६ जिल्ह्यांमध्ये सातत्याने सक्रीय रुग्ण वाढत असल्याने ऑक्सिजनच्या मागणीतही वाढ होत आहे. प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन ऑडीट केले जात असल्याचे मुख्य सचिवांनी या पत्रात म्हटले आहे.

- Advertisement -

 


 

- Advertisement -