Homeमहाराष्ट्रMaharashtra CM : पुढची 5 वर्षे महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक ठरणार; बावनकुळे भाषणात काय...

Maharashtra CM : पुढची 5 वर्षे महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक ठरणार; बावनकुळे भाषणात काय म्हणाले?

Subscribe

मुंबई : भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली असून या बैठकीत विधीमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. बैठक सुरू झाल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वागतपर निवेदन केले. यावेळी त्यांनी भाजपचे निरीक्षक विजय रुपानी आणि निर्मला सिथारमण यांचे स्वागत केले आणि त्यांचे आभार मानले. तसेच, यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेचेदेखील आभार मानले. यावेळी स्वागत करताना त्यांनी सर्व प्रमुख नेत्यांची नावे घेत आभार मानले. पण त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेतल्याने माफी मागत त्यांनी त्यांचेही आभार व्यक्त केले. (Maharashtra CM Chandrashekhar Bawankule speech in BJP Core Meeting)

हेही वाचा : Mahayuti News : महायुती राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करणार, एकनाथ शिंदे अन् अजितदादा उपस्थित राहणार का? 

भाजपच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी केंद्रीय पक्ष निरीक्षक विजय रुपानी, निर्मला सीतारामण यांची उपस्थिती होती. मंचावर चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह विनोद तावडे, आशिष शेलार, प्रवीण दरेकर यांच्यासह कोअर कमिटीमधील सदस्यांची उपस्थिती होती. समोर भाजप आणि अपक्ष आमदारांची उपस्थिती होती. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वांचे स्वागत केले पण देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेतले नाही. त्यानंतर आपली चूक सुधारत ते म्हणाले की, “आपल्या सर्वांचं नेते, देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव मी विसरलो होतो. ते खाली बसले आहेत,त्यामुळे विसरलो. मी माफी मागतो,” असे म्हणाले.

“यंदाच्या निवडणुकीत भाजपसह महायुतीला ऐतिहासिक विजय मिळाला. या महाविजायासाठी अनेकांनी मेहनत केली आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात डबल इंजिन सरकार हे महाराष्ट्राला पुढे घेऊन जाऊ शकतो, आपले राज्य हे देशातील सर्वोत्तम राज्य होऊ शकते, हे मतदारांपर्यंत पोहोचवण्याचे काम आपण सर्वांनी मिळून केले आहे. आपले महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत महायुतीतील सर्वच नेत्यांनी ही निवडणूक लढवली. आपण या १४ कोटी जनतेचे आभार मानले पाहिजे, कारण त्यांनी आपल्यावर मोठा विश्वास टाकला,” असे म्हणत त्यांनी उपस्थित कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते आणि मित्र पक्षातील सर्वच नेत्यांचे आभार मानले.

“भाजपने 149 जागा लढवल्या, यातील 132 जागा यावेळी निवडून आल्या. आतापर्यंत भाजपच्या प्रवासातील हा सर्वात मोठे ऐतिहासिक यश आहे. शिवसेनेच्या 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 41 जागा निवडून आल्या. आपल्याला 7 अपक्ष आमदारांचा पाठींबा मिळाला. महायुतीचा विधीमंडळाचा 237 आमदारांचा गट असणार असून फक्त भाजपचेच 137 आमदारांचा गट असणार आहे.” अशी माहिती बावनकुळे यांनी दिली. “आपल्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी पुढची 5 वर्ष ही ऐतिहासिक असणार आहेत. महाराष्ट्राला देशातील क्रमांक एक चे राज्य करणारा हा जनादेश आहे. आता संपूर्ण देशाचे आणि महाराष्ट्राचे लक्ष आपल्याकडे लागले आहे.” असे म्हणत त्यांनी सर्वांचे आभार मानले.


Edited by Abhijeet Jadhav