(Maharashtra CM) मुंबई : इतिहासाची पुनरावृत्ती होत असते, असे म्हटले जाते. भाजपा आणि शिवसेनेबाबत आता तसेच घडत आहे. 2019मध्ये मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना आणि भाजपामध्ये बिनसले होते. आताही महायुतीमध्ये हेच पद कळीचा मुद्दा ठरला आहे. मुख्यमंत्रिपदाबाबत एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार आग्रही आहेत. तर दुसरीकडे, भाजपा त्याच्याशी सहमत नसल्याने त्यांनी एकनाथ शिंदे यांना दोन पर्याय दिले आहेत. (Two options for Shinde from BJP regarding the post of Chief Minister)
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने 288पैकी 230 जागा जिंकल्या. त्यात भाजपाने इतिहासातील सर्वोच्च 132 जागांचा आकडा गाठला. शिवसेना आणि भाजपा युतीमध्ये ज्याच्या सर्वाधिक जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र लागू होते. मात्र, 2019च्या निवडणुकीनंतर कमी जागा असतानाही तत्कलीन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही राहिले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तसा आपल्याला शब्द दिला होता, असे त्यांनी सांगितले. मात्र, भाजपाने त्याचा इन्कार केल्याने युती तुटली आणि उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससमवेत आघाडी करून सत्ता स्थापन केली.
हेही वाचा – Maharashtra Politics : मुख्यमंत्रिपदी फडणवीसच! दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडून शिक्कामोर्तब
आता पाच वर्षांनंतरही तसाच पेच निर्माण झाला आहे. शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपदावर पुन्हा विराजमान होण्यासाठी आग्रही आहेत. त्यांचे समर्थक आमदारांचेही तेच म्हणणे आहे. यासंदर्भात त्यांनी बिहारचा दाखला दिला आहे. जनता दल युनायटेडचे कमी आमदार असतानाही त्या पक्षाचे प्रमुख नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपद दिल्याचा युक्तिवाद शिंदे समर्थकांचा आहे. मात्र, भाजपाने हा युक्तिवाद फेटाळून लावला आहे. त्या निवडणुकीपूर्वीच नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपद देण्याचे ठरले होते, पण महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांना तसा शब्द देण्यात आला नव्हता, असे भाजपाने स्पष्ट केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
एकनाथ शिंदे समर्थकांकडून आता दुसरा युक्तिवाद करण्यात येत आहे. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने विधानसभा निवडणूक लढविली आहे. आता एवढे यश मिळाल्यानंतर त्यांना लगेच या पदावरून बाजूला करणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे त्यांना किमान एक वर्ष मुख्यमंत्रिपद द्यावे, असे शिंदे गटाचे म्हणणे आहे. मात्र भाजपाने याच्याशी सहमती दर्शवलेली नसल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
याउलट भाजपाने एकनाथ शिंदे यांच्यासमोर दोन पर्याय ठेवले असल्याचे सांगण्यात येते. त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात एखाद्या खात्याची जबाबदारी देऊन त्यांचा मुलगा डॉ. श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्री करायचे किंवा एकनाथ शिंदे यांनी फडणवीस यांच्याप्रमाणे यावेळी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे, अशी ऑफर भाजपाने दिल्याचेही सूत्रांनी सांगितले. मात्र, शिंदे तूर्तास केंद्रातही जाण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे समजते. (Maharashtra CM : Two options for Shinde from BJP regarding the post of Chief Minister)