Sunday, March 16, 2025
27 C
Mumbai
Homeमहाराष्ट्रEco Glamping : महाराष्ट्र इको ग्लॅम्पिंग महोत्सव 31 मार्चपर्यंत - पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

Eco Glamping : महाराष्ट्र इको ग्लॅम्पिंग महोत्सव 31 मार्चपर्यंत – पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

Subscribe

– प्रेमानंद बच्छाव

मुंबई : पर्यटन विभागाच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील गंगापूर येथे 15 जानेवारीपासून सुरू झालेला महाराष्ट्र इको ग्लॅम्पिंग महोत्सव 31 मार्च 2025 पर्यंत चालणार असल्याची माहिती पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी गुरुवारी येथे दिली. 2027 मध्ये नाशिक शहर आणि त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. देशपातळीवरचा हा धार्मिक सोहळा असल्यामुळे मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी येणार आहेत. त्यामुळे सर्व यंत्रणांकडून सूक्ष्म नियोजन असणे गरजेचे असल्याने कुंभमेळ्याच्या आयोजनच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने ग्लॅम्पिंग महोत्सव आयोजित करण्यात आल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले. (maharashtra eco glamping festival in nashik an initiative of department of tourism to prepare for kumbh mela)

हेही वाचा : Ajit Pawar : महायुतीच्या चांगल्या बातम्या द्या, एके-47 हातात घेत अजित पवारांची मिश्किल टिप्पणी 

नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे 2027 मध्ये ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात देशभरातील धार्मिक परंपरेचे दर्शन घडणार आहे. या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये हा महोत्सव प्रायोगिक तत्त्वावरील कुंभमेळ्याची तयारी आहे. आगामी कुंभमेळा लक्षात घेता नाशिक-त्र्यंबकेश्वर ‘रीलिजिअस हब’ म्हणून विकसित व्हावे असा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मानस आहे. त्‍यादृष्टीने तीर्थक्षेत्र पर्यटनाद्वारे नाशिक आधुनिक शहर व्हावे यासाठी पर्यटन संचालनालयाकडून अधिकाधिक प्रयत्न करण्यात येणार असल्याचे देसाई यांनी सांगितले. या महोत्सवात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कलांचा अनुभव आणि स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. तसेच विविध कार्यशाळांमधून राज्याचा समृद्ध वारसा समजून घेण्याची संधी मिळणार आहे. गोदावरी नदीच्या बॅकवॉटरच्या आवारात विविध साहसी उपक्रमांचा अनुभव घेता येईल. अगदी शेती करण्यापासून ते चुलीवरच्या जेवणाचाही आस्वाद घेता येईल तसेच नाशिकची खासियत असलेल्या वाईनच्या उत्पादनाचा प्रवासही उलगडण्यात येणार आहे. पर्यटकांना या महोत्सवात एकाच वेळी आरामदायी, आलिशान निवास व्यवस्थेसह निसर्गरम्य दृश्य, खळाळणारे पाणी आणि सूर्योदयाचाही आनंद लुटता येईल. या महोत्सवात आरामदायी पर्यटनासह शाश्वत पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शंभूराज देसाई यांनी दिली.

ग्लॅम्पिंग महोत्सवाची वैशिष्ट्ये

पर्यटकांसाठी विविध श्रेणीच्या तंबू निवास व्यवस्थेची उभारणी, स्थानिक संस्कृतीचे दर्शन, पॅराग्लायडिंग, पॅरामोटरिंग, जलक्रीडा, ट्रेकींग, रॉक क्लायबिंग, घोडेस्वारी आदी विविध साहसी उपक्रम राबवण्यात येत आहेत. स्थानिक बचतगटांचे हस्त कलाकृतींचे प्रदर्शन आणि विक्री दालन असून स्थानिक खाद्यसंस्कृती तसेच खाद्यमहोत्सव दालनही आहे. नाशिक परिसरातील विविध प्रेक्षणीय स्थळे, पुरातन मंदिरांचे दर्शन इ. कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यटकांसाठी विविध श्रेणींतील निवास व्यवस्था उपलब्ध आहे. ट्रेकिंग, रॉक क्लाइंबिंग, रिव्हर राफ्टींग यांसारख्या साहसी उपक्रमांचा अनुभवही पर्यटकांना घेता येईल. भागधारक, ट्रॅव्हल एजन्सीचे प्रतिनिधी, टूर ऑपरेटर आणि सोशल मीडिया प्रभावक यांच्यासाठी परिचय सहलीचे आयोजन केले जाईल. त्याचप्रमाणे पर्यटन क्षेत्राशी निगडित भागधारक, व्यावसायिक आणि ट्रॅव्हल एजंट आदींचा सहभाग असलेला परिसंवाद कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे.