(Maharashtra Election 2024) मुंबई : महाराष्ट्र विधानसभेसाठी काल, बुधवारी मतदान झाले. निवडणूक आयोगाने रात्री साडेअकरा वाजता दिलेल्या आकडेवारीनुसार सुमारे 65.02 टक्के मतदानाची नोंद झाली. विशेष म्हणजे, शेवटच्या तासाभरात मतदानाचा टक्का वाढला. 2019प्रमाणे यावेळीही कोल्हापूरमध्ये सर्वाधिक मतदान झाले. (About 65.02 percent Voter Turnout in the state)
राज्यात बुधवारी सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळी 9 वाजेपर्यंत 6.61 टक्के, 11 वाजता 18.14 टक्के, दुपारी 1 वाजेपर्येत 32.18 टक्के, 3 वाजता 45.53 आणि सायंकाळी 5 वाजता 58.22 टक्के मतदान नोंदवले गेले होते. त्यामुळे यावेळी 2019प्रमाणे 62 टक्क्यांच्या आसपास मतदानाची नोंद होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. मात्र, मतदारांनी शेवटच्या टप्प्यात दाखवलेल्या उत्साहामुळे मतदानाची टक्केवारी 65 टक्क्यांच्या पुढे गेली.
Voter Turnout – 65.02% in #Maharashtra and 68.45% in #Jharkhand as of 11:30
PM; surpasses voting in 2019 elections in both the states.Read the detailed PN here on this link : https://t.co/oqDpG1wIT5 #MaharashtraElection2024 #JharkhandElections2024 #ECI #Elections2024
— Election Commission of India (@ECISVEEP) November 20, 2024
टक्केवारीचा विचार करता कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक 76.25 टक्के मतदान झाले. या जिल्ह्यात 10 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापाठोपाठ तीन मतदारसंघ असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात 73.68 टक्के मतदान झाले. 2019मध्ये या दोन्ही जिल्ह्यांमध्ये अनुक्रमे 74.45 टक्के आणि 70.34 टक्के मतदान नोंदवले गेले होते. तिसऱ्या क्रमांकावर पाच मतदारसंघा असलेल्या जालना जिल्हा असून तिथे 72.30 टक्के मतदान झाले. गेल्यावेळी 67.34 टक्के मतदान झाले होते.
हेही वाचा – Maharashtra Election 2024 : लोकशाहीवर दबाव आणण्याचा हा प्रकार, ठाकरे गटाचा भाजपावर हल्लाबोल
मात्र, त्या तुलनेत मुंबई आणि उपनगराची कामगिरी निराशाजनक राहिली. मुंबई शहरातील 10 मतदारसंघ मिळून 52.07 टक्के तर, मुंबई उपनगरातील 26 मतदारसंघांमध्ये 55.77 टक्के मतदान झाले. तथापि, 2019च्या तुलनेत यावेळी चांगली नोंद झाली, ही जमेची बाजू आहे. गेल्यावेळी तिथे अुक्रमे 48.22 टक्के आणि 51.28 टक्के मतदान झाले होते.
या दोन जिल्ह्यांत मतदान कमी
यावेळी मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात मतदारांनी उत्साह दाखवल्याने मतदानाने 65 टक्क्यांचा टप्पा ओलांडला. 36पैकी 34 जिल्ह्यांनी 2019च्या तुलनेत जास्त मतदानाची नोंद केली असली तरी, दोन जिल्ह्यांत मात्र मतदानात घसरण झाल्याचे पाहायला मिळते. यावेळी रायगडमध्ये 65.97 टक्के तर, नांदेडमध्ये 64.92 टक्के मतदान झाले. परंतु, 2019मध्ये या दोन जिल्ह्यांत अनुक्रमे 66.03 टक्के 67.77 टक्के मतदानाची नोंद झाली होती. (Maharashtra Election 2024: About 65.02 percent Voter Turnout in the state)
हेही वाचा – Maharashtra Election 2024 : एकनाथ शिंदेंवर गुन्हा दाखल करा; काँग्रेसने केली आयोगाकडे मागणी