वसई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या 288 जागांसाठी बुधवारी (20 नोव्हेंबर) मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी या मतदानाला गालबोट लागल्याची घटना समोर आली आहे. निवडणूक कर्तव्यावर जात असताना एका आशासेविकेचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ही घटना नागले गावातील रेल्वे रुळ ओलांडताना घडली असल्याची माहिती मिळाली आहे. (Maharashtra Election 2024 asha sevika died in train accident)
हेही वाचा : Maharashtra Exit Poll 2024 : राज्यात महायुती की मविआ? एक्झिट पोलने सांगितला जनतेचा मूड
मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक कर्तव्यावर जात असलेल्या आशासेविकेचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला. सुमन संतोष यादव असे अशासेविकेचे नाव असून त्या 39 वर्षांच्या होत्या. सुमन यादव या वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात मागील 5 वर्षांपासून आशासेविका म्हणून काम करत होत्या. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांची ड्युटी बुधवारी नागले गावातील जिल्हा परिषद शाळा, खोली क्रमांक 1 येथे होती. सकाळी सुमारे 6.30 वाजता त्या नागले गावातील रेल्वे रुळ ओलांडत असताना त्या धावत्या रेल्वेखाली आल्या. यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुमन यादव यांच्या आकस्मिक निधनाने पालिका कर्मचाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे.
दरम्यान, राज्यात 288 विधानसभेच्या जागासाठी बुधवारी मतदान काही घटना वगळता शांततेत पार पडले. समोर आलेल्या माहितीनुसार, यंदाच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढल्याचे दिसून आले आहे. उमेदवारांचे भवितव्य मतदारपेटीत बंद झाले आहे. या निवडणुकीचा निकाल आता 23 नोव्हेंबर रोजी लागणार असून संपूर्ण देशाचे या निकालाकडे लक्ष लागले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता कोणाला कौल देते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.