मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यापासून सत्ताधारी पक्षांकडून मोठ्या प्रमाणावर सत्ता आणि पैशाचा गैरवापर सुरू आहे. आदर्श आचारसंहिता आणि नियम डावलून मतदारांना पैशांचे वाटप सुरू आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांवर प्राणघातक हल्ले केले जात आहेत. मंगळवारी (ता. 19 नोव्हेंबर) भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस व राज्याचे माजी मंत्री विनोद तावडे यांना मतदारांना पैसे वाटताना रंगेहाथ लोकांनी पकडले आहे. भ्रष्टाचारातून कमावलेल्या पैशांचा वापर करून भाजपा आणि सत्ताधारी मते विकत घेऊन लोकशाहीला काळीमा फासण्याचे काम करत आहेत. निवडणूक आयोगाने भाजपा आणि विनोद तावडेंवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. (Maharashtra Election 2024 Balasaheb Thorat demanded that Election Commission take strict action against Vinod Tawde)
विरारमध्ये घडलेल्या पैसे वाटपाच्या राजकीय नाट्याविषयी बोलताना थोरात म्हणाले की, निःपक्ष व पारदर्शक पद्धतीने निवडणुका झाल्या पाहिजेत, त्यासाठी निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू केली आहे. पण राज्यात सत्ताधारी पक्षांकडून दररोज आचारसंहितेचे उल्लंघन केल्याच्या घटना घडत आहे. आज वसई विरार परिसरातील विवांता हॉटेलमध्ये भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस व माजी मंत्री विनोद तावडे हे मतदारांना पैसे वाटत असताना नागरिकांनी त्यांना रंगेहाथ पकडले. या संपूर्ण घटनेचे व्हिडिओ वृत्तवाहिन्यांवरून संपूर्ण देशाने पाहिले आहेत. घटनास्थळी पोलीस आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा… Maharashtra Election 2024 : विरारमध्ये विरोधात जाणाऱ्या बविआला भाजपाचा डहाणूत धक्का
तसेच, जवळपास 10 लाख रुपयांची रोकड जप्तही केली आहे. पण कोणालाही अटक केली नाही. निवडणूक प्रचार संपल्यानंतर मतदारसंघाबाहेरील नेत्यांनी व स्टारप्रचारकांनी मतदारसंघात थांबण्यास कायद्याने मनाई असतानाही तावडे वसई विरार मध्ये काय करत होते? निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी व पोलिसांनी त्यांना का रोखले नाही? पैसे वाटताना रंगेहाथ पकडूनही त्यांना अटक का केली नाही? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. कालच नाशिक शहरात एका हॉटेलमध्ये मोठी रक्कम सापडली होती. त्यापूर्वीही पुणे परिसरात सत्ताधारी पक्षाशी संबंधित एका गाडीतून पाच कोटी रुपयांची रक्कम सापडली होती. राज्याच्या विविध भागात दररोज मोठ्या प्रमाणात कोट्यवधी रुपये मिळत आहेत. पण दुर्दैवाने काहीच कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे निःपक्ष व पारदर्शक निवडणुका पार पाडण्यासाठी भाजपा आणि विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी थोरात यांनी केली आहे.