Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रMaharashtra Election 2024 : भाजपाची रणनिती, अपक्ष-बंडखोरांना गळाला लावण्यासाठी सहा नेते मैदानात

Maharashtra Election 2024 : भाजपाची रणनिती, अपक्ष-बंडखोरांना गळाला लावण्यासाठी सहा नेते मैदानात

Subscribe

विधानसभा निवडणुकीची मतमोजणी शनिवारी (ता. 23 नोव्हेंबर) पार पडणार आहे. त्यामुळे याकरिता आता महाविकास आघाडी आणि महायुतीने अपक्ष उमेदवारांना आपल्या बाजूने खेचण्यास सुरुवात केली आहे.

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी शनिवारी (ता. 23 नोव्हेंबर) पार पडणार आहे. यासाठी निवडणूक आयोगाची यंत्रणा आपल्या अधिकाऱ्यांसहित सज्ज आहे. परंतु, दुसरीकडे राजकीय पक्षही सज्ज झाले असून आपला आमदार फुटू नये किंवा कोणताही विचित्र प्रकार घडू नये, याकरिता सर्वच पक्ष नेते कामाला लागले आहेत. पण यंदाच्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांसमोर आव्हान आहे, ते अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांचे. त्यामुळे आज शुक्रवारी (ता. 22 नोव्हेंबर) सकाळपासूनच महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो… यांच्यातील प्रमुख नेत्यांनी अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांना फोन करण्यास सुरुवात केल्याची माहिती समोर आली आहे. पण भाजपाने तर या बंडखोर आणि अपक्ष उमेदवारांसाठी विशेष रणनिती आखली आहे. (Maharashtra Election 2024 BJP strategy, six leaders in field to strangle the independent-rebels)

जे अपक्ष उमेदवार विजयी होतील त्यांना गळाला लावण्यासाठी भाजपाने सहा नेत्यांची निवड केली आहे. या सहा नेत्यांकडून अपक्ष उमेदवारांशी संवाद साधून त्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. भाजपाच्या प्रमुख नेत्यांची दुपारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर बैठक पार पडली. या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, मंत्री रवींद्र चव्हाण, भाजप नेते प्रवीण दरेकर, संजय कुटे, मोहित कंबोज, नितेश राणे आणि निरंजन डावखरे यांच्याकडे अपक्ष उमेदवारांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे आता अपक्ष आणि बंडखोरांसाठी भाजप आणि महायुतीकडून फिल्डिंग लावली जात असतानाच या सहा नेत्यांपैकी कोणाला सर्वाधिक यश मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा… BJP : महायुतीला अपक्षांची गरज लागणार नाही; रावसाहेब दानवेंचे बंडखोरांबद्दल मोठे वक्तव्य, म्हणाले…

भाजपाकडून बंडखोर आणि अपक्ष उमेदवारांवर करडी नजर ठेवण्यात आली आहे. महायुतीप्रमाणेच महाविकास आघाडीचे नेतेमंडळीही अपक्ष आणि बंडखोरांवर लक्ष ठेवून आहेत. ज्यामुळे अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांना गळाला लावण्याचे मोठे आव्हान महाविकास आघाडी समोर सुद्धा आहे. पण हे सर्व असतानाच आता अपक्ष उमेदवारांना अधिक महत्त्व मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण आलेल्या सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार, महायुतीला 150 पर्यंत जागा मिळण्याचा अंदाज आहे. भाजपला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीला एक्झिट पोलमध्ये 110 ते 120 च्या दरम्यान जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दोन्हीकडील नेत्यांनी अपक्ष उमेदवारांना गळाला लावण्याचे प्रयत्न निकालाआधीच सुरू केले आहे.


Edited By Poonam Khadtale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -