मुंबई : मुंबईत विधानसभेच्या 36 जागांसाठी बुधवारी, 20 नोव्हेंबर रोजी सुरळीतपणे मतदान पार पडले, मात्र मतदानाची अंतिम टक्केवारी येण्यास बराच उशीर झाला. मुंबईतील 36 मतदार संघातील मतपेट्यांमध्ये सर्वपक्षीय 420 उमेदवारांचे नशीब ‘लॉक ’ झाले आहे. शनिवारी, 23 नोव्हेंबरपासून सकाळी 8 वाजल्यापासून मतपेट्या खोलून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने चोख नियोजन केले आहे. तब्बल 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवला आहे, तर 2,700 हून अधिक अधिकारी, कर्मचारी यांचा मतमोजणी प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. यासंदर्भातील माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली आहे. (Maharashtra Election 2024 BMC is ready for 23 November for Vote counting day)
हेही वाचा : Western Railway : गर्दी टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेवर नवी एसी लोकल दाखल; आठवड्याभरात टेस्टिंग
केंद्रीय निवडणूक आयोग यांच्या निर्देशांनुसार, प्रथमच मुंबई उपनगर जिल्हा आणि मुंबई शहर जिल्हा या दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हा निवडणूक अधिकारीपदाची संयुक्तपणे जबाबदारी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. विधानसभा निवडणूक 2024 अंतर्गत मुंबई उपनगर जिल्हा आणि मुंबई शहर जिल्ह्यातील एकूण 36 मतदारसंघांसाठी विधानसभा मतदारसंघांमध्ये बुधवारी 20 नोव्हेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. मतदानानंतर सर्व ईव्हीएम व व्हिव्हीपॅट संयंत्रे संबंधित मतदारसंघांच्या स्ट्राँग रुममध्ये अतिशय कडेकोट बंदोबस्तात सुरक्षित ठेवण्यात आले आहेत. एकूण 36 स्ट्राँग रुमच्या सुरक्षेसाठी केंद्रीय राखीव सुरक्षा दल (सीआरपीएफ), केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (सीएपीएफ) यांच्यासह राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ) तसेच पोलिस तैनात आहेत. हे सर्व स्ट्राँग रुम सीसीटीव्ही निगराणीखाली आहेत.
शनिवारी प्रशासनाने मतमोजणी आणि निकाल घोषित करण्यासाठी पूर्वतयारी केली आहे. मुंबई शहर जिल्हा आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील एकूण 36 मतदारसंघांसाठी 36 केंद्रांवर शनिवारी सकाळी 8 वाजता मतमोजणीची प्रक्रिया सुरू होईल. प्रारंभी, टपाली मतदानांची मतमोजणी होईल आणि त्यानंतर ईव्हीएममधील मतदानाची गणना केली जाईल. प्रत्यक्ष मतमोजणी करण्यासाठी प्रत्येक मतदारसंघानुसार, निवडणूक निर्णय अधिकारी, पर्यवेक्षक, मतमोजणी सहायक, सूक्ष्म निरीक्षक, सहायक कर्मचारी आदी मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर मतमोजणी प्रक्रियेदरम्यान सुरक्षेसाठी पोलिस दलासोबत अन्य यंत्रणांचेही मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहेत. मुंबई शहर जिल्हा आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील 36 मतदारसंघांच्या एकूण 36 मतमोजणी केंद्रांवर मिळून सुमारे 2 हजार 700 हून अधिक कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, पोलिस आणि केंद्रीय सुरक्षा दलाचे मिळून एकूण 10 हजार पोलिस अधिकारी, कर्मचारी मतमोजणी केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान, मतमोजणी प्रक्रियेत सहभागी कर्मचार्यांसाठी विविध प्रकारच्या सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.
कर्मचार्यांना दोनदा प्रशिक्षण
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्यक्ष मतमोजणी पारदर्शकपणे आणि सुलभरित्या व्हावी, या अनुषंगाने मतमोजणी प्रक्रियेत सहभागी असलेल्या अधिकारी, कर्मचार्यांना दोनवेळा प्रशिक्षण देण्यात येत आहे. 15 नोव्हेंबर रोजी यासाठी पहिल्यांदाचा प्रशिक्षण देण्यात आले, तर शुक्रवार 22 नोव्हेंबर रोजी पुन्हा प्रशिक्षण देण्यात येणार आहे.