Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रकोकणMaharashtra Election 2024 : खोडा घालणाऱ्यांना जोडे दाखवा; सावंतवाडीत शिंदेंची मविआवर टीका

Maharashtra Election 2024 : खोडा घालणाऱ्यांना जोडे दाखवा; सावंतवाडीत शिंदेंची मविआवर टीका

Subscribe

सावंतवाडी : “कोकणी माणूस काटेरी असला, तरी गोड गऱ्यासारखा आहे. कोकण आणि बाळासाहेब ठाकरे यांचे एक समीकरण आहे. कोकणी माणसावर त्यांनी भरभरून प्रेम केले. नारायण राणेंनी त्या काळात बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घराघरात पोहचवले. पण बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांना कोकणी माणसाने नाकारले. लोकसभेत इथल्या लोकांनी नारायण राणेंना भरघोस मतांनी निवडून दिले. केसरकर आणि राणे एकत्र आले हा विजयाचा शुभशकून आहे. दीपक केसरकर यांच्या हातात पुन्हा धनुष्यबाण आला आहे. या वेळेला ते विजयाचा चौकार मारून सावंतवाडीचा कप ते निश्चितच जिंकतील,” असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावंतवाडी येथील प्रचार सभेत बोलताना व्यक्त केला. (Maharashtra Election 2024 CM Eknath shinde criticized Mahavikas aaghadi in Sawantwadi)

हेही वाचा : Raigad Politics : पनवेल मतदारसंघात तिरंगी लढतीची शक्यता, मविआमधील फूट प्रशांत ठाकूर यांना किती फायदेशीर 

- Advertisement -

सावंतवाडी येथे महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार सभेत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. “बाळासाहेबांच्या विचारांशी बेइमानी करणाऱ्यांशी अनैसर्गिक आघाडी करून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले. धनुष्यबाण काँग्रेसच्या दावणीला बांधला. त्यावेळी मी उठाव केला आणि सत्तेचा त्याग केला. केसरकर यांनी त्यावेळी मला खांद्याला खांदा लावून साथ दिली. दिलेली जबाबदारी त्यांनी पूर्ण केली. माझ्यासाठी ते फायर फायटरसारखे आहेत. सावंतवाडीच्या जनतेचे त्यांच्यावर प्रेम आहे. चक्रव्यूह कसा भेदायचा? हे त्यांना ठाऊक आहे. त्यांचा अभिमन्यू होणार नाही आणि ते निश्चितच चक्रव्यूह भेदतील,” असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.

“लाडक्या बहि‍णींना वंचित ठेवणार नाही, सरकार आल्यानंतर लगेचच सगळ्या लाडक्या बहि‍णींना योजनेचा लाभ मिळेल. आमचे सरकार देणारे आहे, लेना बँक प्रकार आमचा नाही. हप्ते घेणारे, जेलमध्ये जाणारे हे सरकार नाही. विरोधक सावत्र भाऊ बनून आडवे येतील म्हणून नोव्हेंबरचा निधी ऑक्टोबरलाच दिला. दिलेला शब्द पाळणारी आम्ही लोक आहोत. बाळासाहेब आणि दीघेसाहेबांचे आम्ही शिलेदार आहोत. त्यामुळे जो शब्द देतो तो पाळतो त्यामुळे आमचे सरकार आल्यानंतर ज्या ज्या योजना सुरू केल्या आहेत त्या सर्व सुरूच ठेवणार, अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.

- Advertisement -

हेही वाचा : Kalyan : शिळफाटा येथे वाहनातून 5 कोटी जप्त 

“कोल्हापूरमधील महालक्ष्मीला साक्षी ठेवून आम्ही महायुतीचा वचननामा सादर केला. लाडक्या बहिणींना 2100 रूपये, शेतकऱ्यांना कर्जमाफी, 50 हजार महिलांची पोलीस भरती आम्ही करत आहोत. ज्येष्ठ तसेच विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय आम्ही घेतले आहेत. 4 लाख लोकांना जर्मनीमध्ये नोकऱ्या देण्यात दीपक केसरकर यांचा मोठा वाटा आहे. अनेक धोरणात्मक निर्णय आम्ही घेतले आहेत. शेतकऱ्यांचे वीजबिल माफ, घरगुती बिलात 30 टक्के मुभा दिली आहे. आम्ही अडीच वर्षांत सगळे सुरू केले आणि स्थगिती उठवली. महाविकास आघाडीने फक्त बंद करण्याचे काम केले. लाडकी बहिणीची चौकशी लागू असे म्हणाले. त्यामुळे अशा सावत्र भावांना तुम्ही साथ देणार नाही हा मला विश्वास आहे,” असे ते म्हणाले.

“हा एकनाथ शिंदे संघर्षातून पुढे आला आहे. जेलमध्ये टाकायच्या धमक्या मला देऊ नका. मला हलक्यात घेऊ नका हलक्यात घेतलात म्हणून तुमचा टांगा पलटी करून सर्वसामान्य माणसांच्या मनातले सरकार आम्ही आणले. हिताच्या योजना सुरू केल्या. आमचे सरकार आल नसते तर या योजना सुरू झाल्या नसत्या. पैशात लोळणाऱ्यांना गरिबीची झळ कळणार नाही. लाडक्या बहिणींच्या योजनेत खोडा घालणाऱ्या सावत्र भावांना जोडा दाखवल्याशिवाय राहू नका,” असे आवाहन त्यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाचा सर्वांगीण विकास केला, केंद्रात आपले सरकार आहे. त्यामुळे माझी लाडकी बहीण, शेतकरी, ज्येष्ठ आणि बंधू महायुतीचे उमेदवार विजयी करतील, असा विश्वास व्यक्त करत निवडणुका झाल्यानंतर गळ्यात कॅमेरा अडकवून ठाकरेंना जंगलात पाठवा,” असा टोला त्यांनी लगावला.

“दीपक केसरकर यांनी कोट्यवधीची विधायक कामे केली. पर्यटनाला आपण चालना देत आहोत. कोकण एक्सप्रेस, महामार्गाला चालना देत आहोत. कोकणातील बॅकलॉग भरून काढण्यासाठी कोकण विकास प्राधिकरण आपण निर्माण केले आहे. त्यामुळे कोकणातील सर्व आमदार हे महायुतीचे असतील,” असा विश्वास व्यक्त केला. “पावसानेदेखील आशीर्वाद दिल्याने आपला विजय पक्का आहे. कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी नितेश राणे, निलेश राणे आणि दीपक केसरकर यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा,” असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यानी केले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे, माजी खासदार तथा कुडाळचे महायुतीचे उमेदवार निलेश राणे, शिवसेनेचे उपनेते संजय आग्रे, केरळ राज्याचे प्रमुख ऍड. हरी कुमार, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, इत्यादींसह पदाधिकारी उपस्थित होते.

Maharashtra Election 2024 : खोडा घालणाऱ्यांना जोडे दाखवा; सावंतवाडीत शिंदेंची मविआवर टीका
Tejaswi Kalsekarhttps://www.mymahanagar.com/author/tejaswi-kalsekar/
तेजस्वी काळसेकर या प्रसारमाध्यम क्षेत्रात गेल्या ५ वर्षांपासून कार्यरत आहे. राजकीय सामाजिक विषयांवर लिखाण करतात.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -