मुंबई : राज्यात 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये एकाच टप्प्यात मतदान होत आहे. अनेक नेतेमंडळींनी आणि सेलिब्रिटीजनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. मात्र, मतदारांमध्ये फारसा उत्साह पाहायला मिळाला नसून यामुळे मतदानाची वेळ संपायला काही तास शिल्लक असतानाही मतदानाची आकडेवारी मात्र अपेक्षेप्रमाणे वाढलेली नाही. मतदारांनी मोठ्या संख्येने मतदानासाठी घराच्या बाहेर पडावे, याकरिता अनेकांकडून आवाहन करण्यात आले. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांच्या माध्यमातून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. इतकेच नाही तर “फेक नरेटिव्ह नव्हे, तर पॉझिटिव्ह कामच जनता निवडणार…” असा विश्वासही मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. (Maharashtra Election 2024 CM Eknath Shinde expressed confidence of winning saying that people will choose positive work)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी X या सोशल मीडिया साइटवर याबाबतची पोस्ट केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून मतदारांना लोकशाही बळकट करण्यासाठी हाकभार लावा, असे आवाहन केले आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “लोकशाहीमध्ये मतदान हा अधिकार आणि जबाबदारीही. लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवाचा आजचा दिवस. महाराष्ट्राचे उज्ज्वल भविष्य घडवण्याची संधी देण्यासाठी आज प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. त्यामुळे मतदान करा आणि लोकशाही बळकट करण्यासाठी हातभार लावा, असे आवाहन मी मतदारांना करतो. गेल्या पाच वर्षांतील राज्य कारभार जनतेने पाहिला आहे. 2019मध्ये याच मतदारांनी बहुमत कुणाला दिले आणि कुणाचे सरकार आले, हे मतदारराजा विसरलेला नाही.” असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
हेही वाचा… Maharashtra Election 2024 : दिखेंगे तो पिटेंगे…. विनोद तावडे प्रकरणावरून हितेंद्र ठाकूरांचा इशारा
तसेच, “पहिल्या अडीच वर्षांत झालेले आणि नंतरच्या अडीच वर्षांतील काम लोकांनी पाहिले आहे. विकासाचे मारेकरी कोण आणि विकासाचे वारकरी कोण, हे त्यांना माहीत आहे. राज्याची दशा करणारे आणि विकासाला दिशा देणारे नेमके कोण आहेत, हे मतदारराजाला माहीत आहे. राज्यातील जनता सूज्ञ आहे. आपल्या आयुष्यात सुख, समाधान आणणाऱ्यांना आणि राज्याचा विकास करणाऱ्यांनाच ते निवडतील. राज्याला गतिमान आणि भक्कम सरकार देतील. फेक नरेटिव्ह नव्हे, तर पॉझिटिव्ह कामच जनता निवडणार….” असा विश्वासच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला असून 23 नोव्हेंबरच्या निर्णयात पुन्हा महायुतीचे सरकार येणार असल्याचे सूचक वक्तव्य मुख्यमंत्री शिंदे यांनी केले आहे.