विरार : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला काही तास शिल्लक असतानाच राज्यातील विविध भागांमध्ये पैसे वाटप होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. अशातच आता विरारमध्ये भाजपाकडून पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्याकडूनच पैसे वाटप करण्यात येत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे बविआच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांना विरार पूर्वेतील विवांत हॉटेलमध्ये पैसे वाटप करताना पकडले असून याचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर विनोद तावडे यांना थेट बविआच्या कार्यकर्त्यांनी तुम्ही आमच्या मतदारसंघात नेमके का आलात? असा जाब विचारत राडा घातला आहे. (Maharashtra Election 2024 Distribution of money from BJP national leader Vinod Tawde in Virar Serious allegation of Hitendra Thakur)
पालघर जिल्ह्यातील स्थानिक पक्ष असलेल्या बहुजन विकास आघाडीकडून भाजपाचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे यांच्यावर गंभीर आरोप करत म्हटले की, विनोद तावडे विवांता हॉटेलमध्ये 5 कोटी रुपये घेऊन आले होते. पोलीस हॉटेलमध्ये पोहोचले तेव्हा दोन डायऱ्याही सापडल्या. विनोद तावडे सांगतात की, तिकडे बैठक सुरू होती. पण मतदानापूर्वी 48 तास आधी बाहेरच्या नेत्यांनी मतदारसंघ सोडायचे असतात, हे भाजपाच्या राष्ट्रीय नेत्याला माहिती नाही का, एवढी अक्कल तावडेंना नाही का? विनोद तावडे यांनी याठिकाणी वाटण्यासाठी पाच कोटी रुपये आणले होते. आता पोलीस याप्रकरणात काय करणार, हे बघायचे आहे. सरकार त्यांचंच आहे, त्यामुळे पुढे काही होणार नाही, असेही हितेंद्र ठाकूर यांनी म्हटले आहे.
हेही वाचा… Sanjay Raut : राज ठाकरेंना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, राऊतांचा पलटवार
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये नालासोपाऱ्याचे आमदार क्षितीज ठाकूर यांच्या हातामध्ये एक लाल रंगाची डायरी पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये कोणाला किती पैसे द्यायचे आहेत, हे नमूद केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच व्हिडीओमध्ये बविआचे कार्यकर्ते हे भाजपा नेते विनोद तावडे यांच्याकडून काळ्या रंगाची बॅग खेचत असल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी विवांता हॉटेलमध्ये वबिआच्या कार्यकर्त्यांनी जोरदार राडा करत विनोद तावडे यांना घेराव घातला. ज्यानंतर तावडेंनी त्या ठिकाणाहून निघून जाण्याचाही प्रयत्न केला, मात्र बविआच्या कार्यकर्त्यांनीही त्यांना तिथून जाऊ न देता तुम्ही इथे नेमके कशाला आलात? हा तुमचा मतदारसंघ नाही आणि बाहेरच्या नेत्यांनी मतदानाच्या एक दिवस आधी मतदारसंघात यायचे नसते, हे नियम माहीत नाही का? असा प्रश्न बविआच्या कार्यकर्त्यांकडून पोलिसांसमोर उपस्थित करण्यात आला. तसेच, या राड्यावेळी बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पैशांची पाकिटे फाडत 500 रुपयांच्या नोटाही दाखवल्या.