मुंबई : महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. सोमवारी (18 नोव्हेंबर) संध्याकाळी 6 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्या. निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगला होत्या. यानंतर प्रचार संघांसाठी देण्यात आलेला वेळ संपला असून आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत ते मतदानाच्या दिवसाकडे. पण आता याच पार्श्वभूमीवर राज्यात तब्बल 4 दिवस मद्यविक्री बंद राहणार आहे. (Maharashtra Election 2024 dry day declared due to elections in Maharashtra)
हेही वाचा : BEST Bus : मतदानादिवशी पहाटे 4 पासून धावणार बेस्ट; आयुक्तांनी दिले हे आदेश
महाराष्ट्रातील विधानसभेच्या एकूण 288 जागांसाठी 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. यासाठी 22 ऑक्टोबर रोजी निवडणूक अधिसूचना जारी झाली आहे. 20 नोव्हेंबरला मतदान झाल्यानंतर 3 दिवसांनंतरच 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. 25 नोव्हेंबर रोजी राज्यातील निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल, असं निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमामध्ये सांगितले आहे.
दरम्यान, 18 नोव्हेंबरला प्रचार संपल्यानंतर मद्यविक्रीवर बंदी असणार आहे. तर, 19 आणि 20 नोव्हेंबर रोजी संपूर्ण दिवस मद्यविक्री न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतर 23 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार असल्याने यादिवशीही ठराविक वेळेपर्यंत ड्राय डेची घोषणा केली आहे. दरम्यान, याचे पालन न करणार्यांवर कठोर कारवाईचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
या दिवशी मद्यविक्री बंद
18 नोव्हेंबर : संध्याकाळी 6 वाजल्यापासून मद्यविक्री बंद
19 नोव्हेंबर : मतदानाच्या आधीचा दिवस म्हणून संपूर्ण दिवस मद्यविक्री बंद राहणार
20 नोव्हेंबर : निवडणुकीचा दिवस असल्याने मद्यविक्री दिवसभर बंद राहणार
23 नोव्हेंबर : मध्यरात्री 12 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत निवडणूक आयोग निकालाची घोषणा करत नाही तोपर्यंत मद्यविक्री बंद राहणार