मुंबई : मुंबईत विधानसभेच्या निवडणुकीत काही सर्वपक्षीय माजी नगरसेवक पहिल्यांदा तर कोणी दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा विद्यमान आमदारांसमोर निवडणूक रिंगणात उतरून आपले नशीब आजमावत आहेत. शनिवारी (23 नोव्हेंबर) मतमोजणी होणार आहे. नगरसेवक पदावर असताना फक्त एकाच वॉर्डात काम करणे, आणि आमदारकीसाठी निवडणूक रिंगणात उतरून लढणे आणि तेही विद्यमान, मातब्बर आमदारांसमोर सोपे नाही. पण, तरीही या निवडणुकीमध्ये हे माजी नगरसेवक विद्यमान आमदारांना चितपट करून मैदान मारून पहिल्यांदाच आमदार होतील का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (Maharashtra Election 2024 ex corporators contesting election for first time)
हेही वाचा : Maharashtra Election 2024 : पाठिंबा हवा असेल तर…; जानकरांनी ठेवल्या या अटी
या माजी नगरसेवकांमध्ये, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी महापौर आणि माजी नगरसेविका श्रद्धा जाधव, समीर देसाई, मनोज जामसुतकर, प्रविणा मोरजकर, माजी सुधार समिती अध्यक्ष अनंत (बाळा) नर, वर्सोवामधून हरुन खान, संदिप नाईक, संजय भालेराव यांना विधानसभेसाठी संधी देण्यात आली आहे. तसेच, मनसेकडून माजी नगरसेवक आणि गटनेते संदीप देशपांडे, स्नेहल सुधीर जाधव यांना संधी देण्यात आली आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे माजी नगरसेविका आणि गटनेत्या राखी जाधव यांना संधी देण्यात आली आहे. तर, काँग्रेसकडून आश्रफ आजमी हे आपले नशीब आजमावत आहेत.
तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून पूर्व उपनगरातील विक्रोळीमधील माजी नगरसेविका सुवर्णा करंजे, सुरेश पाटील (बुलेट पाटील), भाजपचे नाना आंबुळे, तसेच मुरजी पटेल (शिवसेना शिंदे गटाकडून) यांचा समावेश आहे. या माजी नगरसेवकांपैकी कोणीही विजयी झाले आणि आमदार झाले तर तेसुद्धा नगरसेवक म्हणून निवडणूक लढवून आमदार बनलेले आमदार सुनील प्रभू, राजहंस सिंह, रईस शेख, रमेश कोरगावकर, योगेश सागर, पराग आळवणी, अस्लम शेख, अमीन पटेल, सदा सरवणकर, यामिनी जाधव, अशोक पाटील इत्यादींच्या पक्तीत जाऊन बसणार आहेत.