मुंबई : राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात बुधवारी, 20 नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीची केंद्रीय निवडणूक आयोगाकडून घोषणा झाल्यापासून राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांनी विविध कारवाईत तब्बल 660 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. 15 ऑक्टोबरपासून विविध अंमलबजावणी यंत्रणांनी बेकायदा पैसे, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान धातू आदींच्या विरोधात कारवाई केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, 2019 च्या निवडणुकीत 122 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. पण यंदा त्याच्या पाचपट रक्कम जप्त करण्यात आली आहे. (Maharashtra Election 2024 Property worth Rs 660 crore seized)
मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाकडून निवडणूक काळात नागरिकांना तक्रार करता यावी, यासाठी सी-व्हिजिल अॅप तयार करण्यात आले होते. या अॅपवर एकूण 08 हजार 678 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी 08 हजार 668 तक्रारी आयोगाकडून निकाली काढण्यात आलेल्या आहेत. तसेच, आतापर्यंत अंमलबजावणी पथकाकडून 153 कोटी रुपयांची रोख रक्कम, 68 कोटी 63 लाख रुपये किमतीच 68 लाख 51 हजार 364 लिटर दारू, 72 कोटी रुपयांचे 01 कोटी 01 लाख 42 हजार 452 ग्रॅम अंमली पदार्थ, 282 कोटी 49 लाख किमतीचे 01 कोटी 64 लाख 72 हजार 596 ग्रॅम मौल्यवान धातू, 03 कोटी 78 लाख रुपयांच्या मोफत वाटपासाठी आणलेल्या 75 हजार 949 वस्तू आणि इतर साहित्यामध्ये 13 लाख 73 हजार 775 इतक्या 75 कोटी 60 लाखांच्या वस्तू जप्त करण्यात आल्या.
हेही वाचा… Assembly Polls 2024 : प्रचाराच्या तोफा थंडावल्या; पुढील 36 तास ‘अर्थ’पूर्ण घडामोडींचे
तसेच, आतापर्यंत पोलिसांकडून तसेच विविध अंमलबजावणी पथकांकडून वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातील निंबा फाटा येथे कार्यान्वित स्थिर सर्वेक्षण पथकाने सोमवारी (ता. 18 नोव्हेंबर) कारमधून एक लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. सोलापूर येथे मतदारांना पैसे वाटप करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला असून 80 हजारांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. तर, मतदान प्रक्रियेच्या काही तास आधी जुन्नरमध्ये महामार्गावर कुकर नेणारा ट्रॅक पकडण्यात आला असून एसएसटी पथकाकडून 01 हजार 361 कुकर जप्त करण्यात आले आहेत. ज्यामुळे यंदाच्या निवडणुकीत राज्यामध्ये पैशांचा पाऊस पडल्याचे बोलले जात आहे.