Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रMaharashtra Election Result 2024 : मुंबईत महायुतीचा डंका, मविआला जोरदार धक्का

Maharashtra Election Result 2024 : मुंबईत महायुतीचा डंका, मविआला जोरदार धक्का

Subscribe

मुंबईत भाजपाला मोठा विजय मिळाला असून एकूण 15 जागांवर भाजपाच्या उमेदवारांना विजय मिळाला आहे. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे 06 आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या एका उमेदवाराचा विजय झाला आहे.

मुंबई : राज्यात लागलेल्या विधानसभा निवडणुकीच्या धक्कादायक निकालामुळे महायुतीमध्ये आनंदाचे वातावरण आहे, तर महाविकास आघाडीचे तोंडचे पाणी पळाले आहे. राज्यात महायुतीमधील भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मुंबईत भाजपाला मोठा विजय मिळाला असून एकूण 15 जागांवर भाजपाच्या उमेदवारांना विजय मिळाला आहे. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे 06 आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या एका उमेदवाराचा विजय झाला आहे. त्यामुळे मुंबईतील 36 विधानसभांपैकी 22 जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आले आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे 14 उमेदवार विजयी झाले असून यामध्ये समाजवादी पक्षाच्या अबू आझमी यांचा समावेश आहे. (Maharashtra Election Result 2024 Mahayuti sting in Mumbai, MVA a big blow)

माहिममध्ये ‘राज’पुत्राचा दारुण पराभव

मुंबईमध्ये विधानसभा निवडणुकीत माहिम मतदारसंघात अनेक नाट्यमय घडामडी पाहायला मिळाल्या. ज्यानंतर आता या विधानसभेत अखेर उद्धव ठाकरेंचा शिलेदार महेश सावंत यांना विजय मिळवता आला आहे. त्यांच्या या विजयामुळे मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरेंचा दारुण पराभव झाला आहे. त्याशिवाय, दोन टर्म आमदार राहिलेले सदा सरवणकर यांनाही पराभवाचा फटका बसला आहे. त्यामुळे या मतदारसंघात दोघांमध्ये तिसऱ्याचाच लाभ झाला आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.

- Advertisement -

आदित्य ठाकरेंनी वरळीचा गड राखला

मुंबईतील वरळी मतदारसंघाने कायमच शहराच्या आणि राज्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मुंबई शहरातील प्रमुख भागांना जोडणाऱ्या या भागामुळे हा मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे या मतदारसंघावर सर्वांचाच डोळा असताना शिवसेना ठाकरे गटाचे युवानेते आदित्य ठाकरे यांना त्यांचा हा गड राखण्यात यश मिळाले आहे. त्यांच्याविरोधात शिवसेना शिंदे गटाने माजी खासदार मिलिंद देवरा आणि मनसेने संदीप देशपांडे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. पण या दोघांनाही बाजूला सारत 2019 पेक्षा अत्यंत कमी मतांच्या फरकाने आदित्य ठाकरे यांना विजय मिळवता आला आहे. कारण 2019 मध्ये सोप्या लढाईत आदित्य ठाकरे यांनी 89 हजार 248 मतं घेत विजय मिळवला होता.

…अन् खासदार वायकरांच्या पत्नीचा पराभव

लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांचा निसटता विजय पाहायला मिळाला. कारण त्यांनी मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात अवघ्या 48 मतांनी विजय मिळवला. त्यानंतर आता विधानसभेत त्यांची पत्नी मनीषा वायकर यांना जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. मतमोजणीवेळी मिसेस वायकर या अनेक फेऱ्यांमध्ये पुढे होत्या. पण शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये मनीषा वायकर यांचा शिवसेना ठाकरे गटाचे अनंत (बाळा) नर यांनी पराभव केला आहे.

- Advertisement -

सिद्दीकींना सरदेसाईंकडून पराभवाचा धक्का

विधानसभा निवडणुकीत मुंबईतील वांद्रे पूर्व हा मतदारसंघ सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरला. कारण या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दिवंगत नेते बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी देण्यात आली होती. निवडणुकीच्या काही दिवस आधीच बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यामुळे मतदार भावनिक होऊन झिशान सिद्दीकी यांना मत देण्याची शक्यता होती. परंतु, आता या मतदारसंघातील चित्र बदलले असून पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या वरुण सरदेसाई यांना मतदारांनी विधानसभेत पाठवले आहे.

मुंबईतील विद्यमान आमदारांची चलती…

मुंबईमध्ये अनेक उमेदवार आहेत, जे विद्यमान आमदार होते आणि त्यांना मतदारांनी पुन्हा एकदा निवडून देत आणखी एक संधी दिली. यामध्ये भाजपाच्या सर्वाधिक आमदारांचा समावेश आहे. मनिषा चौधरी, अतुल भातखळकर, पराग अळवणी, पराग शाह, कालिदास कोळंबकर, मंगलप्रभात लोढा, राहुल नार्वेकर, मिहिर कोटेचा, योगेश सागर, विद्या ठाकूर, अमित साटम, राम कदम, कॅप्टन तमिल सेल्वन, आशिष शेलार या आमदारांचा समावेश आहे. त्याशिवाय, शिवसेना शिंदे गटाचे मंगेश कुडाळकर, प्रकाश सुर्वे, दिलीप लांडे या आमदारांचा समावेश आहे.
महायुतीप्रमाणेच महाविकास आघाडीतीलही काही विद्यमान आमदार पुन्हा विधिमंडळात गेले आहेत. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या सुनील राऊत, आदित्य ठाकरे, अजय चौधरी, सुनील प्रभू, संजय पोतनीस यांचा समावेश असून काँग्रेसमधील अस्लम शेख आणि अमिन पटेल या आमदारांनीही आपला गड राखला आहे. तर मविआला पाठिंबा देणाऱ्या सपाचे अबू आझमी हे सुद्धा पुन्हा निवडणुकीत विजयी झाले आहेत.

मुंबईतील दिग्गजांना मतदारांनी बसवले घरी…

मुंबईतील भायखळा विधानसभेत शिवसेना शिंदे गटाच्या विद्यमान आमदार यामिनी जाधव यांचा पराभव झाला असून या मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे मनोज जामसूतकर विजयी झाले आहेत. त्याशिवाय शिवडी विधानसभेत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांचा अजय चौधरी यांनी पराभव केला असून ते तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. वर्सोवा विधानसभेतून दोन टर्म म्हणजेच तब्बल 10 वर्ष आमदार राहिलेल्या भारती लव्हेकर यांना पराभवाचा धक्का बसला असून शिवसेना ठाकरे गटाचे हारून खान या मतदारसंघातून विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांना सुद्धा पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. मानखूर्द शिवाजीनगर या मतदारसंघातील सपाचे विद्यमान आमदार अबू आझमी यांनी आपला गड राखत मलिकांचा दारुण पराभव केला आहे.


Edited By Poonam Khadtale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -