मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल हा अविश्वसनीय आहे. महाराष्ट्रात अनेक समस्या असताना केवळ लाडकी बहीण योजनेमुळे समस्या संपल्या आहेत का? असा प्रश्न उपस्थित करत महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी रेमश चेन्नीथला यांनी निकालाबाबत संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा अनपेक्षित असा निकाल लागला असून या निकालामुळे महाविकास आघाडीच्या तोंडचे पाणी पळाले आहे. तर महायुतीकडून जोरदार जल्लोष केला जात आहे. महायुतीने राज्यातील सत्ता कायम ठेवत क्लीन स्विप मिळवला आहे. महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींमुळे हे शक्य झाल्याचे मत महायुतीच्या नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. पण काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या पराभवामुळे पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी चेन्नीथला यांनी संताप व्यक्त केला आहे. (Maharashtra Election Result 2024 Ramesh Chennith got angry due to Maharashtra Assembly result 2024)
महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी निकालाच्या काही तासांनंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, लोकसभेत महाविकास आघाडीला मोठा विजय मिळालेला असताना पाच महिन्यात इतका मोठा पराभव होणे अशक्य आहे. त्यामुळे हा निकाल अविश्वसनीय असून या निकालावर विश्वास ठेवणे कठीण आहे. कारण जनतेची भावना, जनतेचा कौल हा महायुतीच्या विरोधात होता. आम्ही सर्वांशी याबाबत चर्चा केली होती, पण कोणाकडूनही अशा निकालाची चर्चा करण्यात आली नाही किंवा माहितीही देण्यात आली नाही. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अटीतटीची लढत नक्कीच होती. एक्झिट पोलमधूनही निकाल दाखविण्यात आला होता. पण आता हा जो काही निकाल आला आहे, त्यावर आम्ही विश्वास कसा ठेवावा? असा प्रश्न चेन्नीथला यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा… Hitendra Thakur : पराभूत झाल्यानंतर कोणीही फोन करत नाही; ठाकूर यांची पहिली प्रतिक्रिया…
लोकसभेच्या निकालाच पाच महिन्यांपूर्वी जो निकाल आला होता तो निकाल आणि आता आलेला निकाल यामध्ये मोठा फरक आहे. त्यामुळे पाच महिन्यांमध्ये निकालात इतका मोठा बदल होणे शक्य आहे का? शेतकऱ्यांच्या समस्या, बेरोजगारी, महायुती सरकारचा भ्रष्टाचार अशा अनेक गोष्टी महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आहेत. पण केवळ लाडकी बहीण योजनेमुळे या सर्व समस्या संपतात का? असा प्रश्नच रमेश चेन्नीथला यांनी उपस्थित केला आहे. आमचे अनेक ज्येष्ठ नेते हरले. आठ वेळा जिंकणारे आमचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या नेत्यांचा पराभव झाला. आमचे विरोधी पक्षनेते हरता हरता जिंकले. 100 टक्के जिंकणारे उमेदवार हरल्याने आम्हाला निश्चित धक्का बसला आहे. निकालात नेमके काय झाले, याचा आम्ही अभ्यास करू, जनतेत जाऊन त्यांनाही विश्वासात घेऊ, असेही चेन्नीथला म्हणाले.