कोकण : आज जाहीर झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळाले आहे. तब्बल 228 जागा जिंकून महायुतीने या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये इतिहास रचला आहे. यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सर्वत्र चर्चेला उधाण आल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला केवळ 47 जागांवर समाधान मानावे लागले आहे. आजच्या या निकालामुळे महायुतीच्या रणनीतीची ताकद पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. या विजयाचे श्रेय महायुतीतील नेत्यांच्या समन्वयाला दिले जात असले तरी उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व आणि त्यांची रणनीती या विजयामध्ये निर्णायक ठरल्याचे मानले जात आहे. तसेच राज्यातील बहुतांश भागात महायुतीला घवघवीत यश मिळाले असून, ठाकरेंचा बालेकिल्ला असणाऱ्या कोकणात देखील महायुतीने जोरदार आघाडी घेतल्याचे दिसून आले आहे. (The Mahayuti government won in Konkan.)
सिंधुदुर्गामध्ये कणकवली भाजपाचे उमेदवार नितेश राणे यांचा बहुमतांनी विजय झाला आहे. त्यांच्या विरोधात शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार संदेश पारकर यांनी लढा दिला होता. मात्र संदेश पारकर यांचा 58007 मतांनी पराभव झाला आहे. तर कुडाळमध्ये शिवसेना शिंदे गटाचे निलेश राणे यांना 81659 मते मिळाली आहेत. त्यांच्या विरोधात वैभव नाईकांचा पराभव झाला आहे. तर सावंतवाडीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे दीपक केसरकर यांना 81008 मते मिळाली असून त्यांच्या विरोधातील उबाठा गटाचे राजन तेली यांचा पराभव झाला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणेंच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कारण दोन सख्ये भाऊ निवडणुकीच्या मैदानात उभे होते. मात्र आता या दोघांचाही विजय झाला आहे.
हेही वाचा : Maharashtra Election Result 2024 : सुलभा खोडके पडल्या काँग्रेस उमेदवारावर भारी; 5 हजार मतांनी केला पराभव
रत्नागिरीमध्ये एकूण पाच मतदारसंघ आहेत. त्यामध्ये गुहागर मतदारसंघातील शिवसेना उबाठा गटाचे भास्कर जाधव यांना 71241 मते मिळाली आहेत. तर त्यांच्या विरोधात शिवसेनेचे रामचंद्र बेंडाळ यांचा पराभव झाला आहे. तसेच रत्नागिरीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे उदय सांमत यांना एकूण 111335 मते मिळाली आहेत. त्यांच्या समोर शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार बाळ माने यांनी लढत दिली होती. तर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किरण सांमत यांना राजापूरमधून 80256 मते मिळाली आहेत. तसेच चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शेखर निकम यांना 96555 मते मिळाली आहेत. तसेच यंदा विधानसभेत कोकणातील दोन सख्खे भाऊ म्हणजे राणे बंधू आणि सांमत बंधू आपल्याला एकत्र दिसणार आहेत.
Edited By komal Pawar Govalkar