मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतमोजणी शनिवारी सुरू झाली आणि आता जवळपास सगळा निकाल समोर आला आहे. सुरुवातीच्या कलानुसार महायुतीला स्पष्ट बहुमत मिळेल, असे चित्र होते आणि आता समोर आलेले निकालही तेच सांगत आहेत. या विजयानंतर भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी हे यश अभूतपूर्व असल्याचे सांगत महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले आहेत.
पंधराव्या विधानसभा निवडणुकीसाठी 288 मतदारसंघात 20 नोव्हेंबरला राज्यात एकाच टप्प्यात मतदान झाले. या निवडणुकीत राज्यात विधानसभेसाठी सर्वाधिक म्हणजे 66 टक्के मतदान झाले आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी पाच टक्के मतदान जास्त झाले आहे. हे जादा मतदान आपल्याच पारड्यात झाल्याचा दावा महायुती आणि महाविकास आघाडीने केला आहे. मात्र, आता हे जास्तीचे मतदान महायुतीच्या पारड्यात गेल्याचे निश्चित झाले आहे. या मोठ्या विजयानंतर भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले आहेत.
महाराष्ट्रातला विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील आरपीआय या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे मिळाल्याचे तावडे म्हणाले.
अप्रत्यक्ष लाभ आणि लाभाचं राजकारण यामुळे हे यश मिळाल्याचे विनोद तावडे यांनी सांगितले. पायाभूत सुविधा, रस्ते, पाणी, वीज अशा अप्रत्यक्ष लाभाच्या राजकारणाची मदत झाली आहे. तर लाडकी बहीण, शेतकरी सन्मान निधी, विद्यार्थ्यांची सोय अशा प्रत्यक्ष लाभांमुळे मतदारांचा आमच्यावर विश्वास बसला आणि त्यांनी आम्हाला मत दिले, असे तावडे म्हणाले.
यासोबतच भाजपा आणि शिवसेना यांची जी नैसर्गिक युती 2019 मध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी तोडली होती, त्याचा रागही लोकांच्या मनात होता. आणि तोच आता निवडणूक निकालातून व्यक्त झाल्याचे तावडे यांनी सांगितले.
रोज सकाळी राज्याचं राजकारण निश्चित करणारं वक्तव्य भांडुपमधून केलं जायचं. त्याउलट एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत येत काम करून बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विचार जपला, त्यामुळेच हा विजय झाल्याचेही ते म्हणाले. मुख्यमंत्री कोण होईल, याबाबत ते म्हणाले की, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे केंद्रीय नेतृत्व मिळून हा निर्णय घेतील.
Edited by : Ashwini A. Bhatavdekar