Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रMaharashtra Election Results 2024 : मतदारांच्या लाडक्या महिला प्रतिनिधी, यंदा 22 जणी...

Maharashtra Election Results 2024 : मतदारांच्या लाडक्या महिला प्रतिनिधी, यंदा 22 जणी विधानसभेत

Subscribe

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत 288 पैकी 22 जागांवर महिलांचा विजय झाला आहे. यामधील 20 महिला आमदार या महायुतीच्या असून केवळ 01 महिला आमदार ही महाविकास आघाडी आणि त्यातही काँग्रेस पक्षाची आहे.

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक – 2024 मध्ये महायुतीचा महाविजय झाला आहे. महाविकास आघाडीला चारीमुंड्या चीत करत महायुतीने 288 पैकी 230 मतदारसंघामध्ये दणदणीत विजय मिळवलेला आहे. पण यंदाच्या वेळेस 288 पैकी 22 जागांवर महिलांचा विजय झाला आहे. यामधील 20 महिला आमदार या महायुतीच्या असून केवळ 01 महिला आमदार ही महाविकास आघाडी आणि त्यातही काँग्रेस पक्षाची आहे. त्यामुळे राज्याच्या इतर समीकरणांसोबतच महिला उमेदवारांच्या समीकरणातही महायुती मविआपेक्षा अव्वल ठरली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत एकूण 24 महिला आमदार म्हणून विधिमंडळात गेल्या होत्या. त्यामुळे यंदाच्या वर्षी मात्र, यामध्ये घट झाली आहे. (Maharashtra Election Results 2024 22 women MLAs win in assembly elections)

महत्त्वाची बाब म्हणजे, 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी महिला उमेदवारांच्या संख्येत वाढ झाली होती. त्यातही अपक्ष महिला उमेदवार 2019 पेक्षा दुपटीने यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत 360 महिला उमेदवार रिंगणात होत्या. त्यातील 236 जणींनी अपक्ष अर्ज दाखल करून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता. पण केवळ 22 चं महिला उमेदवारांना विजय मिळवता आला आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेप्रमाणेच कोणत्या मतदारसंघातील जनतेने आपल्या लाडक्या महिला उमेदवाराला विजयी करून विधानसभेत पाठवले, पाहूयात…

- Advertisement -

ज्या 21 महिला उमेदवार विजयी झालेल्या आहेत, त्यामध्ये महायुतीतील भाजपाच्या 15 महिला उमेदवारांचा समावेश आहे. त्यानंतर शिवसेनेच्या 02 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 04 महिला उमेदवारांचा समावेश आहे. तर महाविकास आघाडीतून काँग्रेसच्या ज्योती एकनाथ गायकवाड या केवळ एक महिला उमेदवार विजयी झाल्या. मुंबईतील 36 विधानसभांपैकी एकूण चार मतदारसंघातून महिला उमेदवार विधानसभेत गेल्या आहेत. यामध्ये दहिसर विधानसभेच्या भाजपा आमदार मनीषा चौधरी, गोरेगावच्या भाजपा आमदार विद्या ठाकूर, बेलापूर विधानभेतून मंदा म्हात्रे, धारावीतून काँग्रेसच्या ज्योती गायकवाड आणि अणुशक्तीनगर विधानसभेतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) सना मलिक यांना विजय मिळाला आहे.

या महिला आमदार पुन्हा विधानसभेत…

1) मंजुळा गावित (शिवसेना-शिंदे गट) : साक्री विधानसभेतून विजयी झालेल्या मंजुळा गावित या दुसऱ्यांदा विधानसभेत गेल्या आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मंजुळा गावित यांना तेव्हाच्या शिवसेनेने म्हणजेच उद्धव ठाकरेंनी उमेदवारी न दिल्याने त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. पण एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर गावित यांनी शिंदे गटात प्रवेश केला. ज्यानंतर आता 2024 च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने शिवसेना पक्षातून त्यांना उमेदवारी जाहीर केली. मंजुळा गावित यांनी काँग्रेस पक्षाचे प्रवीण (गोटू) बापू चौरे यांचा 5584 मतांनी पराभव करत आपला गड कायम राखला.

- Advertisement -

2) श्वेता महाले (भाजपा) : बुलढाणा जिल्ह्यातील चिखली विधानसभेत काँग्रेस आणि भाजपा यांच्यात यंदा थेट मुकाबला झाला. 2019 मध्ये भाजपाच्या श्वेता महाले यांनी काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांचा पराभव केला होता, परंतु आता या मतदारसंघातील स्थिती पूर्णपणे वेगळी होती. यावेळी भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पसरलेला होता, कारण काही वरिष्ठ कार्यकर्त्यांना वगळून बाहेरच्या नेत्यांना संधी दिली जात असल्याचे आरोप झाले. त्यामुळे यंदा निवडणूक अधिक रंगतदार झाली. ज्या चिखली विधानसभेती अटीतटीच्या सामन्यात श्वेता महाले 3201 मतांनी विजयी झाल्या. त्यांना 109212 मते मिळाली. तर काँग्रेसचे राहुल बोंद्रे यांनी देखील टक्कर दिली. महत्त्वाची बाब म्हणजे काँग्रेसच्या राहुल बोंद्रे यांचा दुसऱ्यांदा पराभव करत श्वेता महाले दुसऱ्यांदा विधीमंडळाची पायरी चढल्या आहेत.

3) सुलभा खोडके (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट) : 2019 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून अमरावती विधानसभा निवडणूक लढलेल्या सुलभा खोडके आता दुसऱ्यांदा विधीमंडळाची पायरी चढणार आहे. मात्र, यावेळी त्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून विजयी झालेल्या आहेत. यंदाच्या निवडणुकीत सुलभा खोडके यांच्यासमोर काँग्रेसच्या डॉ. सुनील पंजाबराव देशमुख यांचे आव्हान होते. त्यामुळे या अटीतटीच्या लढतीत 5413 मतांच्या फरकाने खोडके दुसऱ्यांदा विजयी झालेल्या आहेत.

4) मेघना बोर्डीकर (भाजपा) : परभणी जिल्ह्यातील जिंतूर विधानसभेतून आमदार मेघना बोर्डीकर या पुन्हा विजयी झालेल्या आहेत. महायुतीकडून भाजपाने त्यांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. त्यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार विजय भांबळे आणि वंचित बहुजन आघाडीचे सुरेश नागरे यांचे आव्हान होते. पण मेघना बोर्डीकर यांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे यांचा 4516 मतांनी पराभव करत दुसऱ्यांदा गड कायम राखला आहे. त्यांनी यंदा 1 लाख 13 हजार 432 मते घेतली आहेत.

5) देवयानी फरांदे (भाजपा) : नाशिक मध्य मतदारसंघातून भाजपाच्या देवयानी फरांदे यांनी तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. महायुतीतर्फे भाजपाच्या प्रा. देवयानी फरांदे व महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे वसंत गिते यांच्यामध्ये सरळ लढत झालेली पाहायला मिळाली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत वसंत गितेंनी माघार घेतल्याने या मतदारसंघात देवयानी फरांदे विरुद्ध हेमलता पाटील अशी लढत होती. त्यावेळी फरांदेंनी पाटील यांचा 28387 मतांनी पराभव केला होता. 2014 व 2019 च्या निवडणूकीनंतर यंदाही फरांदेंनी विजयाची हॅटट्रिक मारली आहे. त्यांनी सेना ठाकरे गटाच्या वसंत गीतेंचा 17 हजार 856 मतांनी पराभव केला आहे.

6) सरोज अहिरे (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट) : देवळाली विधानसभा मतदारसंघातून महायुतीतील राष्ट्रवादी (अजित पवार गट) काँग्रेसच्या विद्यमान आमदार सरोज अहिरे यांनी 81 हजार 683 मते मिळवून महायुतीतीलच शिवसेना शिंदे गटाच्या डॉ. राजश्री अहिरराव आणि महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचे योगेश घोलप यांना धोबीपछाड देत तिरंगी सामन्यात एकहाती विजय मिळवला आहे. आमदार अहिरे यांनी 40 हजार 679 चे मताधिक्य घेत सलग दुसऱ्यांदा विजयश्री खेचून आणली. त्यांच्या विजयानंतर महायुतीतीच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा गुलाल उधळून जल्लोष साजरा केला.

7) मनीषा चौधरी (भाजपा) : दहिसर विधानसभेतून भाजपाच्या मनीषा चौधरी यांनी दुसऱ्यांदा निवडणूक लढवली होती. या चुरशीच्या लढतीत मनीषा चौधरी हॅटट्रिक करत विधानसभेत विजयी झाल्या आहेत. त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे विनोद घोसाळकर यांचा तब्बल 44 हजार 329 मतांनी पराभव केला. तर 2014 च्या निवडणुकीतही मनीषा चौधरी यांनी घोसाळकरांचाच पराभव केला होता. ज्यामुळे 10 वर्षानंतर या विजयाची पुनरावृत्ती झाली आहे. तर मनीषा चौधरी तिसऱ्यांदा आपला गड राखण्यात यशस्वी झालेल्या आहेत.

8) विद्या ठाकूर (भाजपा) : गोरेगाव विधानसभेतून भाजपाने आमदार विद्या ठाकूर यांना तिसऱ्यांदा संधी दिली. पण महायुतीकडून त्यांना उमेदवारी मिळाल्याने शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. ज्यामुळे ठाकूर यांचा पराभव होतो की काय असा प्रश्न निर्माण झाला होता. पण आता विद्या ठाकूर यांनी विजयाची हॅटट्रिक करत आपला गड राखला आहे. त्यांच्यासमोर शिवसेना ठाकरे गटाचे समीर देसाई आणि मनसेचे वीरेंद्र जाधव यांचे आव्हान होते. पण त्यांनी तब्बल 23600 मतांनी ठाकरे गटाचे देसाई यांचा पराभव केला. विद्या ठाकूर यांनी 2019 मध्ये काँग्रेसचे युवराज मोहिते तर 2014 मध्ये शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचा पराभव केला होता.

9) अदिती तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट) : कोकणातील महत्त्वाचा मतदारसंघ असणाऱ्या श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादीने दणदणीत विजय मिळवला आहे. राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे यांनी राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार गट) अनिल नवगणे यांचा 82 हजार 798 मतांनी दणदणीत पराभव केला. अदिती यांनी मिळवलेला हा मोठा विजय आहे. अदिती यांनी श्रीवर्धनमध्ये सलग दुसऱ्यांदा विजय मिळवत राष्ट्रवादीचा कोकणातील हा गड राखला आहे.

10) माधुरी मिसाळ (भाजपा) : पर्वती मतदारसंघावर पुन्हा एकदा भाजपाने निर्विवाद वर्चस्व मिळविले असून, भाजपाच्या माधुरी मिसाळ या येथून सलग चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांच्याविरोधात यावेळी राष्ट्रवादी (शरद पवार गट) अश्विनी कदम यांनी आव्हान होते. येथे महायुती विरोधात महाविकास आघाडी असा थेट सामना होण्याऐवजी काँग्रेसचे आबा बागुल यांनी बंडखोरी केल्याने तिरंगी लढत झाली. मात्र, मिसाळ यांनी तब्बल 50 हजारांहून अधिक मताधिक्याने विजय मिळविला.

11) मोनिका राजळे (भाजपा) : शेवगाव विधानसभेतून भाजपाच्या मोनिका राजळे यांनी तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रतापराव ढाकणे यांचा 19 हजार 43 मतांनी पराभव केला आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीतही मोनिका राजळे आणि प्रतापराव ढाकणे यांच्यात लढत झाली होती. तर, 2014 च्या निवडणुकीत त्यांनी चंद्रशेखर घुले यांचा पराभव केला होता. महत्त्वाची बाब म्हणजे 2014 च्या मोदी लाटेत त्यांनी घुले यांच्याकडून विजय खेचून आणला होता. त्यानंतर हा मतदारसंघ गेल्या 10 वर्षांपासून भाजपाच्या मोनिका राजळे यांच्याच ताब्यात आहे.

12) नमिता मुंदडा (भाजपा) : केज विधानसभा निवडणुकीत महायुतीने भाजपाच्या नमिता मुंदडा यांना तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार पृथ्वीराज साठे उमेदवारी दिली होती. पण अखेरीस या मतदारसंघातून नमिता मुंदडा यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला आहे. त्यांच्या विरोधात असलेले शरद पवार गटाचे उमेदवार पृथ्वीराज साठे पराभूत झाले आहेत. आमदार नमिता मुंदडा यांचा विकासाच्या मुद्यावर प्रचाक करत होत्या. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पृथ्वीराज साठे यांनी अडीच वर्षे आमदार असताना केलेल्या कामाच्या बळावर प्रचार केला. भाजपाच्या आमदार नमिता मुंदडा यांच्यासोबत मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते प्रचारात दिसले नव्हते. त्यामुळे भाजपा कार्यकर्ते विकास कामाच्या बळावरच त्यांनी प्रचार केला.

13) सीमा हिरे (भाजपा) : नाशकात सर्वाधिक मतदारसंख्या असणाऱ्या नाशिक पश्चिम मतदारसंघात पुन्हा भाजपाचा विजय झाला आहे. भाजपाच्या सीमा हिरे यांनी 01 लाख 41 हजार 725 मते मिळवत विजयाची हॅटट्रिक साधली. येथे 15 उमेदवारांमध्ये आमदार हिरे या एकमेव महिला उमेदवार होत्या. त्यांनी उर्वरित 14 उमेदवारांना पराभूत केल्याने ‘एक नारी, सबपे भारी’ असा नारा देत त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. सीमा हिरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुधाकर बडगुजर यांचा पराभव केला आहे.

14) मंदा म्हात्रे (भाजपा) : महाराष्ट्रातील हाय होल्टेज लढतींपैकी एक असणाऱ्या बेलापूर विधानसभा मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत तिरंगी लढत पाहायला मिळाली. या तिरंगी लढतीत आमदार मंदा म्हात्रे यांना तिसऱ्यांदा आपला गड कायम राखण्यात यश आले आहे. बेलापूर हा भाजपाचा बालेकिल्ला मानला जातो. गेल्या दोन निवडणुकीत मंदा म्हात्रे यांनी येथून विजय मिळवला. त्यामुळेच ‘जायंट किलर’ मानल्या जाणाऱ्या मंदा म्हात्रे यांना भाजपाने तिसऱ्यांदा संधी दिली आणि त्यांनी या संधीचे सोने केले आहे. बेलापूर या मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून नवी मुंबईचे शहराध्यक्ष गजानन काळे यांना उमेदवारी देण्यात आली होती, तर नुकतेच शरद पवार गटात प्रवेश केलेले संदीप नाईक यांचेही आव्हान मंदा म्हात्रे यांच्यासमोर होते. या मतदारसंघामध्ये नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. संदीप नाईक यांच्यापेक्षा केवळ 377 मताधिक्याने मंदा म्हात्रे यांचा मतदारसंघात निसटता विजय पाहायला मिळाला आहे.

आठ महिला पहिल्यांदाच विधानसभेत…

महाराष्ट्र विधानसभा 2024 च्या निवडणुकीत एकूण 14 महिला या पुन्हा विधीमंडळात गेलेल्या आहेत. पण 08 महिला अशा आहेत. ज्या पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या आहेत. यामध्ये भाजपाच्या 05 महिला आमदार, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या 01 महिला आमदाराचा समावेश आहे.

भाजपा –

1) कारंजा – सई डहाके
2) भोकर – श्रीजय चव्हाण
3) फुलंब्री – अनुराधा चव्हाण
4) वसई – स्नेहा दुबे
5) कल्याण पूर्व – सुलभा गायकवाड

शिवसेना (शिंदे गट) –

1) कन्नड – संजना जाधव

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) –

1) अणुशक्ती नगर – सना मलिक

काँग्रेस –

1) धारावी – ज्योती गायकवाड


Edited By Poonam Khadtale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -