मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पहिल्या दोन तासांचे कल हाती आले असून निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइटनुसार भाजपा हा मोठा पक्ष असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण साधारणतः 9.30 वाजेपर्यंत भाजपाचे 75 उमेदवार आघाडीवर आहेत. तर शिवसेना शिंदे गटाचे 42 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 28 उमेदवार आघाडीवर आहेत. त्यामुळे सध्या महायुती एकूण 145 जागांवर म्हणजेच बहुमतासाठी आवश्यक असलेल्या जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे महायुतीची ही आघाडी शेवटच्या क्षणापर्यंत कायम राहणार की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष मिळून केवळ 55 जागांवर आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. (Maharashtra Election Results 2024 BJP leading in first two hours of counting Mahayuti towards majority)
पंधराव्या विधानसभा निवडणुकीसाठी 288 मतदारसंघात 20 नोव्हेंबरला राज्यात एकाच टप्प्यात मतदान झाले. तब्बल 30 वर्षानंतर राज्यात विधानसभेसाठी सर्वाधिक म्हणजे 66 टक्के मतदान झाले आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी पाच टक्के मतदान जास्त झाले आहे. या जादा मतदानाचा फायदा नेमका कुणाला होणार याविषयी उत्सुकता आहे. जादा मतदान आपल्याच पारड्यात झाल्याचा दावा महायुती आणि महाविकास आघाडीने केला आहे. विविध संस्थांनी जाहीर केलेल्या मतदानोत्तर चाचण्यांच्या निष्कर्षांतील गोंधळामुळे निकालाविषयी अनिश्चितता आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी निकालानंतर निर्माण होणाऱ्या संभाव्य परिस्थितीनुसार आपले प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी तयार ठेवले आहेत.
हेही वाचा… Ladki Bahin : वेड्या बहिणीची वेडी माया, महायुतीसाठी लाडकी बहीण योजना ठरली गेमचेंजर
निवडणूक आयोगाकडून सातत्याने त्यांच्या साइटवर अपडेट देण्यात येत आहे. त्यानुसार भाजपा हा सध्या तरी मोठा पक्ष ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे तिन्ही पक्ष मिळून विजयाच्या उंबरठ्यावर पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता महायुतीच्या सर्व कार्यालयांमध्ये विजयाचा गुलाल उधळण्यास सुरुवात झाली आहे. कारण महायुतीच्या विजयापुढे महाविकास आघाडी ही तीन संख्यांचा आकडा सुद्धा गाठू शकेल की नाही, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. मात्र, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हा निकाल मान्य करण्यास नकार दिलेला आहे.