(Maharashtra Election Results 2024) मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वांसाठीच अनपेक्षित होता. भाजपाने सर्वाधिक जागा जिंकत इतिहास रचला. भाजपाला 132 जागा मिळाल्या असतल्या तरी, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील नऊ आमदार भाजपाशी एकनिष्ठ आहेत. कारण ते मूळचे भाजपाचे असून निवडणुकीच्या तडजोडीतून मित्रपक्षांच्या चिन्हांवर रिंगणात उतरले होते. (BJP’s strength increased due to nine MLAs who fought on the symbols of allied parties)
भाजपाने 151 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. यापैकी तीन भाजपा पुरस्कृत उमेदवार होते आणि त्यातील एक उमेदवार विजयी झाला. तर, भाजपाच्याच अन्य 16 नेत्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविली. त्यापैकी 12 जण शिवसेनेतर्फे तर 4 जण राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते. एकूण 16 उमेदवारांपैकी 9 जण विजयी झाले. तर, 7 जण पराभूत झाले. त्यात शिवसेनेचे पाच तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन उमेदवारांचा समावेश आहे.
हेही वाचा – Maharashtra Election Reuslts 2024 : निकाल संशयास्पद आहेत, तरीही.., ठाकरे गट काय म्हणाला?
शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढविणारे निलेश राणे (कुडाळ), संजना जाधव (कन्नड), राजेंद्र गावित (पालघर), विलास तरे (बोईसर), मुरजी पटेल (अंधेरी पूर्व) अमोल खताळ (संगमनेर) आणि विठ्ठल लंघे (नेवासे) हे सात जण विजयी झाले. यामध्ये विलास तरे 44 हजार 455 मताधिक्क्याने जिंकले आणि विठ्ठल लंघे यांचा केवळ 4 हजार 21 मतांनी विजय झाला. तर, संतोष शेट्टी (भिवंडी पूर्व), अजित पिंगळे (उस्मानाबाद), शायना एनसी (मुंबादेवी), दिग्विजय बागल (करमाळा) आणि बळीराम सिरस्कार (बाळापूर) यांना पराभव पत्करावा लागला. त्यात संतोष शेट्टी आणि दिग्विजय बागल हे 50 हजारांहून अधिक मतांनी पराभूत झाले. विशेष म्हणजे, दिग्विजय बागल तिसऱ्या क्रमांकावर असून दुसऱ्या क्रमांकावर अपक्ष आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून चार जागा लढविणाऱ्यांपैकी दोघांचा विजय झाला. राजकुमार बडोले (अर्जुनी मोरगाव) हे 16 हजार 415 मतांनी आणि प्रतापराव पाटील चिखलीकर (लोहा) हे 10 हजार 973 मतांनी जिंकले. तर, संजयकाका पाटील (तासगाव -कवठे महाकाळ) हे 27 हजार 644 मतांनी आणि निशिकांत पाटील (इस्लामपूर) हे 13 हजार 27 मतांनी पराभूत झाले. एकूणच, भाजपाकडे 132 आमदारांचे संख्याबळ असले तरी, त्याबरोबर निवडणूक लढविण्यासाठी मित्रपक्षांमध्ये गेलेले 9 आमदारांचे पाठबळ त्यांना आहे, हे उल्लेखनीय. (Maharashtra Election Results 2024 : BJP’s strength increased due to nine MLAs who fought on the symbols of allied parties)
हेही वाचा – Maharashtra Election Results 2024 : मोदींना घराणेशाहीची यादी हवी असेल तर…, ठाकरे गटाची खोचक टीका