(Maharashtra Election Results 2024) मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा सामना महायुतीने एकहाती जिंकला. महाविकास आघाडीला चारीमुंड्या चीत करत महायुतीने पुन्हा सत्ता तर काबिज केली आहे, पण मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार, याची चर्चा आता रंगली आहे. अर्थातच, भाजपाने राज्यात न भूतो न भविष्यती असा विजय मिळवला असल्याने या पदावर त्यांचाच दावा असू शकतो. त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव चर्चेत असले, तरीही त्यासाठी वेगळा प्रयोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Instead of Fadnavis, BJP will give chance to another leader for the post of Chief Minister)
साधारणपणे पाच महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये महायुतीचा दारुण पराभव झाला. त्यावेळी निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, भाजपाच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गट आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीने तब्बल 230 जागा जिंकत नवा राजकीय इतिहास रचला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीने राबविलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कमालीची गेमचेंजर ठरली.
महायुतीच्या महालाटेत महाविकास आघाडीचा अक्षरशः धुव्वा उडवला. महाविकास आघाडीला केवळ 46 जागा मिळाल्या. तर, महायुतीत एकट्या भाजपाने 132 जागा जिंकल्या. 1990नंतर विधानसभा निवडणुकीत सार्वधिक जागा जिंकणारा भाजपा हा पहिला पक्ष ठरला आहे. भाजपाने 2014पासून सलग तिसऱ्यांदा शतकी मजल मारली आहे. आता ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या भाजपाकडून मुख्यमंत्रिपदावर दावा केला जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे.
असे असले तरी, मुख्यमंत्रिपदाचा निर्णय दिल्लीतून घेतला जाणार हे निश्चित. अशा परिस्थितीत मुख्यमंत्रिपदासाठी नाव जाहीर करताना भाजपा पक्षश्रेष्ठी सर्वांना धक्का देतात का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. कारण, साधारणपणे वर्षभरापूर्वी असा प्रयोग त्यांनी मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये केला आहे. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये या राज्यांमध्ये निवडणूक झाल्यावर प्रस्थापितांना धक्का देत भाजपाने चर्चेत नसलेल्यांची नावे मुख्यमंत्री म्हणून जाहीर केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या.
हेही वाचा – Maharashtra Election Results 2024 : शिंदे गटासाठी मनसे ठरली डोकेदुखी! ठाकरे गटालाही फटका
मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी शिवराज सिंह चौहान यांना पुन्हा संधी मिळण्याची चर्चा असताना भाजपाने डॉ. मोहन यादव यांचे नाव जाहीर केले. राजस्थानमध्येही भजनलाल शर्मा यांना मुख्यमंत्री करण्यात आले. विशेष म्हणजे, या पदासाठी ज्यांच्या नावाची प्रामुख्याने चर्चा होती, त्याच ज्येष्ठ नेत्या वसुंधरा राजे यांनी भजनलाल शर्मा यांच्या नावाची घोषणा केली होती. तर, छत्तीसगडमध्ये रमण सिंह, ओपी चौधरी, राम विचार नेता अशा काही नेत्यांची नावे मुख्यमंत्रिपदासाठी आघाडीवर होती. पण भाजपाने त्या सर्वांना धक्का देत विष्णू देव साय यांचे नाव घोषित केले.
महाराष्ट्रात महायुतीने दणदणीत विजय मिळवल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांनीही मुख्यमंत्रिपदाची इच्छा व्यक्त केली आहे. शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी, पुन्हा एकदा एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होणार, असे विधान केले आहे. तर, अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत, ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे, असे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे यांनी म्हटले आहे. तर, भाजपाच्या काही नेत्यांनीही देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होतील, असा विश्वास वाटत आहे. मात्र, भाजपाश्रेष्ठी महाराष्ट्रातही धक्कातंत्र अवलंबतात का, याकडे सर्वांचेच लक्ष आहे. एकूणच महाराष्ट्राचा विचार करता मुख्यमंत्रिपद हा कळीचा मुद्दाच राहिला आहे. (Maharashtra Election Results 2024: Instead of Fadnavis, BJP will give chance to another leader for the post of Chief Minister)
हेही वाचा – Maharashtra Election Results 2024 : वंचित आघाडीचा फटका कोणाला अन् फायदा कोणाला?