मुंबई : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला आश्चर्यकारक असे यश मिळाल्याने आणि महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाल्याने याची संपूर्ण देशात चर्चा रंगली आहे. विरोधकांनी आता संपूर्ण राज्यात मतांच्याबाबतीत उडालेल्या गोंधळावरून प्रश्न उपस्थित केले आहेत. आता तर मतांमध्ये तफावत जाणवणाऱ्या अनेक पोस्ट विरोधातील नेतेमंडळी आणि नेटकऱ्यांकडून सोशल मीडियावर पोस्ट करण्यात येत आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुंब्रा-कळवा विधानसभेचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कन्नड विधानसभा मतदारसंघातील एका मतदान केंद्रावरील मतमोजणीची आकडेवारी पोस्ट केली आहे. यामुळे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. (Maharashtra Election Results 2024 Jitendra Awhad posted staggering statistics)
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी X या सोशल मीडिया साइटवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी कन्नड विधानसभा मतदारसंघातील एका मतदान केंद्रावरील मतमोजणीची आकडेवारी दिली आहे. या मतदारसंघातील तळनेर नावाच्या गावात एकूण मतदार 396 आहेत आणि गावात 312 जणांनी मतदान केले होते. मात्र उमेदवारांना पडलेली मते दुप्पट असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तर ही पोस्ट करत आव्हाडांनी EVM वर शंका नसल्याचे म्हटले आहे, पण या प्रश्नाचे उत्तर कोण देणार? असा सवाल आव्हाडांकडून उपस्थित करण्यात आला आहे. तसेच, याबाबतचे सत्य लवकरच उघडकीस आणू, असेही पोस्टच्या माध्यमातून आव्हाडांनी सांगितले आहे.
काय आहे जितेंद्र आव्हाडांची पोस्ट?
“कन्नड विधानसभा क्रमांक – 105
तळनेर या गावात एकूण मतदार – 396
झालेले मतदान – 312
शिवसेना (UBT) – 194
शिवसेना (शिंदे) – 326
अपक्ष (हर्षवर्धन जाधव) – 104
मतांची बेरीज – 194 + 326 + 104 –> ६२४
EVM वर मुळीच शंका नाही पण या प्रश्नाचे उत्तर कोण देणार? लवकरच हे उघडकीस आणू!” अशी आकडेवारीची पोस्ट आमदार आव्हाडांकडून करण्यात आलेली आहे.
कन्नड विधानसभा क्रमांक १०५
तळनेर या गावात एकूण मतदार – ३९६
झालेले मतदान – ३१२
शिवसेना (UBT) – १९४
शिवसेना (शिंदे) – ३२६
अपक्ष (हर्षवर्धन जाधव) – १०४मतांची बेरीज – १९४ + ३२६ + १०४ –> ६२४
EVM वर मुळीच शंका नाही पण या प्रश्नाचे उत्तर कोण देणार?
लवकरच हे उघडकीस आणू!
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 26, 2024
तर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत जामखेड विधानसभेचे आमदार रोहित पवार यांनी सुद्धा उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामधील विधानसभा मतदारसंघाची आकडेवारी पोस्ट केली आहे. या जिल्ह्यामधील विजयी उमेदवारांना मिळालेली मते जवळपास सारखीच कशी? असा प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केला आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपाच्या विजयी उमेदवारांचा समावेश आहे. आमदार रोहित पवारांनी आपल्या पोस्टमध्ये एकूण 12 उमेदवारांची नावे पोस्ट केली असून या विजयी आमदारांची मते 01 लाख ते 1 लाख 50 हजारांच्या मधे असल्याचे त्यांनी सांगितले आहे.