(Maharashtra Election Results 2024) मुंबई : राज्य विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्व एक्झिट पोल खोटे ठरवणारा ठरला. मतदारांनी महायुतीला ‘मनसे’ कौल दिला असला तरी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिंदे गटासाठी डोकेदुखी ठरल्याचे समोर आले आहे. त्यात ठाकरे गटालाही काहीसा फटका बसला आहे. विशेषत: मुंबईमध्ये मनसेचा प्रभाव दिसला. (Loss of Thackeray group and Shinde group due to MNS)
माहिम मतदारसंघातून मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणूक रिंगणात उतरल्याने ही लढत प्रतिष्ठेची बनली होती. येथे 50 हजार 213 मते मिळवून ठाकरे गटाचे महेश सावंत विजयी झाले. तर, शिंदे गटाचे सदा सरवणकर (48,897) यांना अवघ्या 1 हजार 316 मतांनी पराभव पत्करावा लागला. अमित ठाकरे यांना तब्बल 33 हजार 62 मते मिळाली. त्याचबरोबर वरळीमधील लढतही प्रतिष्ठेची झाली होती. येथे ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे (63,324) विरुद्ध शिंदे गटाचे मिलिंद देवरा (54,523) अशी लढत होती. आदित्य ठाकरे यांनी देवरा यांचा 8 हजार 801 मतांनी पराभव केला. त्यांच्याबरोबर निवडणूक रिंगणात असलेल्या मनसेच्या संदीप देशपांडे यांना 19 हजार 367 मते मिळाली.
हेही वाचा – Maharashtra Election Result 2024 : मुंबईत महायुतीचा डंका, मविआला जोरदार धक्का
दिंडोशीमध्ये ठाकरे गटाचे सुनील प्रभू यांना 76,437 मते मिळाली. त्यांनी 70,255 मते मिळविणाऱ्या शिंदे गटाच्या संजय निरुपम यांचा 6 हजार 182 मतांनी पराभव केला. तर, मनसेच्या भास्कर परब यांना 20 हजार 309 मते मिळाली. विक्रोळीमध्ये 66 हजार 93 मते घेणाऱ्या सुनील राऊत यांनी शिंदे गटाच्या सुवर्णा करंजे (50,567) यांचा 15 हजार 526 मतांनी पराभव केला. मनसेच्या विश्वजीत ढोलम यांना 16 हजार 813 मते पडली.
भांडुप पश्चिममध्ये 77 हजार 754 मते घेणारे शिंदे गटाचे अशोक पाटील विजयी झाले. त्यांनी ठाकरे गटाच्या रमेश कोरगावकर (70,990) यांचा 6 हजार 764 मतांनी पराभव केला. तर, मनसेच्या शिरीष सावंत यांना 23 हजार 335 मते पडली. घाटकोपर पश्चिममध्येही भाजपाचे राम कदम (73,171) विजयी झाले. त्यांनी ठाकरे गटाच्या संजय भालेराव (60,200) यांचा तब्बल 12 हजार 971 मतांनी पराभव केला. मनसेच्या गणेश चुक्कल यांना त्यापेक्षा जवळपास दुप्पट 25 हजार 862 मते मिळाली.
सर्वांचे लक्ष जोगेश्वरी पूर्वमधील लढतीकडे लागले होते. येथे ठाकरे गटाचे बाळ नर (77,044) यांचा अवघ्या 1 हजार 541 मतांनी विजयी झाले. त्यांनी मनीषा वायकर (75,503) यांचा पराभव झाला. मनसेचे भालचंद्र अम्बुरे यांना 12 हजार 805 मते पडली, हे उल्लेखनीय. गुहागरमध्येही मनसेने शिंदे गटाला धक्का दिला. 71,241 मते मिळवून ठाकरे गटाचे भास्कर जाधव हे 2 हजार 830 मतांनी विजयी झाले. शिंदे गटाच्या राजेंद्र बेंडल यांना 68 हजार 411 मते तर, मनसेच्या प्रमोद गांधी यांना 6 हजार 712 मते मिळाली.
हेही वाचा – Maharashtra Election Results 2024 : मुंबईत विद्यमान आमदारांचीच चलती, भाजपाचा प्रभाव कायम
कलिनामध्ये ठाकरे गटाचे संजय पोतनीस (59,820) यांनी भाजपाच्या अमरजीत सिंह (54,812) यांचा 5 हजार 8 मतांनी पराभव केला. तर, मनसेच्या संदीप हुटगी यांना 6 हजार 62 मते मिळाली. वणी येथे ठाकरे गटाच्या संजय देरकर यांनी भाजपाच्या संजीवरेड्डी बोडकुरवार यांचा 15 हजार 560 मतांनी पराभव केला. या दोघांना अनुक्रमे 94 हजार 618 आणि 79 हजार 58 मते मिळाली. तर, मनसेच्या राजू उंबरकर यांना 21 हजार 977 मते पडली.
अणुशक्तिनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सना मलिक (49,341) यांनी 3 हजार 378 मतांनी विजय मिळविला. त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP SP) फहाद अहमद यांना 45 हजार 963 मते मिळाली. तर, वंचित बहुजन आघाडीच्या नवीन आचार्य यांना 28 हजार 362 मते मिळाली. वांद्रे पूर्वमध्ये ठाकरे गटाच्या वरुण सरदेसाई यांचा 11 हजार 365 मतांनी विजय झाला. त्यांना 57 हजार 708 मते पडली. तर, त्यांच्यासमोरील राष्ट्रवादी काँग्रेसचे झीशान सिद्दिकी यांना 46 हजार 343 मते आणि मनसेच्या तृप्ती सावंत यांना 16 हजार 74 मते मिळाली.
हेही वाचा – Maharashtra Election Results 2024 : राहुल गांधींच्या भाषणांची जादू चालेना… सात ठिकाणी झाल्या होत्या सभा