मुंबई : राज्यात नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकांचा निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर झाला असून राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार बहुमतांनी विजयी झाले आहे. तसेच काही मतदारसंघात मोठ्या मताधिक्याने उमेदवारांचा विजय झाल्याचे पाहायला मिळाले आहे. या निवडणुकीत महायुतीतील सुमारे 15 नवनियुक्त आमदारांना 1 लाखांपेक्षा अधिकची मताधिक्य मिळाले आहे. यात प्रामुख्याने राज्यातील शिरपूरचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार काशिराम पावरा यांना सर्वाधिक 1 लाख 45 हजार 944 मतांचे मताधिक्य मिळाले आहे. शिरपूर आदिवासीसाठी राखीव असून, यापूर्वी पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते आणि सध्या भाजपात असलेले माजी शिक्षणमंत्री अमरीश पटेल यांनी या मतदारसंघाचे विधिमंडळात प्रतिनिधीत्व केले आहे. परीसीमन झाल्यानंतर हा मतदारसंघ आदिवासींसाठी राखीव झाला. अमरीश पटेल यांनी या मतदारसंघात केलेली कामे आणि निवडणुकीदरम्यान दिलेली मदत याच्या जोरावर पावरा यांनी हे यश मिळविले. (Maharashtra vidhan sabha election candidates who won by the highest margin.)
सर्वात जास्त मताधिक्य असलेले उमेदवार काशिराम पावरा हे शिरपूर विधानसभा मतदारसंघात 1 लाख 45 हजार 944 मताधिक्याने विजयी ठरले आहेत. त्यांनी डॉ. जितेंद्र ठाकूर यांचा दारूण पराभव केला आहे. जितेंद्र ठाकूर यांना 32 हजार 129 मते मिळाली आहेत. राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूक निकालांची अधिकृत माहिती रविवारी निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. या निकालामध्ये महायुतीला सर्वाधिक जागा मिळाल्या असून आता राज्यात नवे सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. तर दुसरीकडे या निकालामध्ये सर्वाधिक मताधिक्य मिळालेले उमेदवार भारतीय जनता पक्षाचे उमेदवार काशिराम पावरा ठरले आहेत. या निवडणुकीमध्ये राज्यात एकूण 15 उमेदवारांना 1 लाखांहून अधिक मताधिक्य मिळाले आहे. त्यामध्ये भाजपाच्या आठ शिवसेनेच्या तीन तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार जणांचा समावेश आहे. तसेच यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील तीन उमेदवारांचे मताधिक्य हे 1 लाखांहून जास्त आहे. त्यामध्ये स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच दादा भुसे आणि प्रताप सरनाईक यांचा समावेश आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना 1 लाख 20 हजार 717 मताधिक्य आहे, प्रताप सरनाीक यांना 1 लाख 8 हजार 158 मताधिक्य तर दादा भुसे यांना 1 लाख 6 हजार 606 मताधिक्य मिळाले आहे.
हेही वाचा : Election Commission : ईव्हीएम मशिनच्या बॅटरीबाबत निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निकालानुसार भारतीय जनता पक्षाच्या एकूण आठ जणांना 1 लाखांहून अधिकचे मताधिक्य आहे. त्यामध्ये शिरपूर मतदारसंघातील काशीराम पावरा यांना 1 लाख 45 हजार 944 मतांचे मताधिक्य आहे. तर, मेळघाट मतदारसंघाचे कवळराम काळे यांना 1 लाख 6 हजार 859 मतांचे मताधिक्य, नागपूर पूर्व मतदारसंघातून कृष्णा खोपडे यांना 1 लाख 15 हजार 288 मतांचे मताधिक्य, बेळगाव मतदारसंघाचे दिलीप बोरसे यांना 1 लाख 29 हजार 297 मताधिक्य, बोरिवली मतदारसंघातून संजय उपाध्याय यांना 1 लाख 257 मताधिक्य, चिंचवड मतदारसंघातून शंकर जगताप यांना 1 लाख 3 हजार 865 मतांचे मताधिक्य, कोथरुड मतदारसंघातून चंद्रकांत पाटील 1 लाख 12 हजार 041 मतांचे मताधिक्य, सातारा मतदारसंघातून 1 लाख 42 हजार 124 मतांचे मताधिक्य मिळाले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील चार उमेदवारांना 1 लाखांहून अधिकचे मताधिक्य मिळाले आहे. त्यामध्ये अजित पवारांचा देखील समावेश आहे. अजित पवारांना 1 लाख 899 मताधिक्य मिळाले आहे. तर मावळमधून सुनील शेळके यांना 1 लाख 8 हजार 565 मताधिक्य, तर कोपरगाव मतदारसंघाचे आशुतोष काळे यांना 1 लाख 24 हजार 624 आणि परळी मतदारसंघातून धनंजय मुंडेंना 1 लाख 40 हजार 224 मताधिक्य मिळाले आहे. अशाप्रकारे यंदाच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे शिरपूर मतदारसंघाचे काशिराम पावरा यांना सर्वाधिक मताधिक्य मिळाले असून त्यांच्या व्यतिरिक्त महायुतीतील इतर 14 उमेदवारांना 1 लाखांपेक्षा अधिकचे मताधिक्य मिळाले आहे.
Edited By Komal Pawar Govalkar