(Maharashtra Election Results 2024) मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज, शनिवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीचा कल पाहता, महायुती आघाडीवर दिसत आहे. त्यातही भाजपाने सर्वाधिक जागांवर मुसंडी मारली आहे. अगदी अटीतटीची ही लढत सुरू असली तरी, दुसरीकडे एक लाखांहून अधिक मतदारांनी सर्वच उमेदवारांना नाकारल्याचे पहिल्या सुमारे तीन तासांच्या मतमोजणीत समोर आले आहे.
सप्टेंबर 2013मध्ये एका याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला ईव्हीएमवर (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) नकाराधिकाराचा पर्याय देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांपैकी कोणताही उमेदवार पसंत नसल्यास ईव्हीएममध्ये NOTAचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला. भारतातील मतदान प्रक्रियेत 2013मध्ये पहिल्यांदा नोटा (NOTA) अर्थात ‘नन ऑफ दी अबव्ह’चा वापर करण्यात आला.
राज्यामध्ये 2019मध्ये सातत्याने बदलणारी राजकीय समीकरणे लक्षात घेता कोणत्या पक्षावर तसेच नेत्यावर विश्वास ठेवायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. पाच वर्षांच्या कालावधीत तीन वेळा झालेला सत्ताबदल तसेच दोन पक्ष फुटणे अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे अनेकांच्या पदरी निराशा आली. परिणामी राज्यात सकाळी अकरा वाजेपर्यंत 1 लाख 8 हजार 344 मतदारांनी ‘नोटा’ची निवड केली.
पंधराव्या विधानसभा निवडणुकीसाठी 288 मतदारसंघात 20 नोव्हेंबरला राज्यात एकाच टप्प्यात मतदान झाले. तब्बल 30 वर्षानंतर राज्यात विधानसभेसाठी सर्वाधिक म्हणजे 66 टक्के मतदान झाले आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी पाच टक्के मतदान जास्त झाले आहे. या जादा मतदानाचा फायदा नेमका कुणाला होणार याविषयी उत्सुकता आहे. जादा मतदान आपल्याच पारड्यात झाल्याचा दावा महायुती आणि महाविकास आघाडीने केला आहे. विविध संस्थांनी जाहीर केलेल्या मतदानोत्तर चाचण्यांच्या निष्कर्षांतील गोंधळामुळे निकालाविषयी अनिश्चितता आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी निकालानंतर निर्माण होणाऱ्या संभाव्य परिस्थितीनुसार आपले प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी तयार ठेवले आहेत.
हेही वाचा – Maharashtra Election Results 2024 : निवडून येणारे सर्व शुद्ध असतील, ठाकरे गटाचा दावा