(Maharashtra Election Results 2024) मुंबई : राज्यातील सरकारविरोधात प्रचंड असंतोष धुमसत होता. मऱ्हाठी जनता भाजपा आणि त्यांनी पोसलेल्या गद्दारांविरुद्ध धुसफुसत होती. सर्व बेइमानांना गाडायचेच अशा निर्धाराने महाराष्ट्राची जनता मतदानाला उतरली असताना एका झटक्यात सर्व बेइमान विजयी होतात आणि बेइमानांच्या जयजयकाराच्या विजयी मिरवणुका निघतात, हा प्रकार महाराष्ट्राच्या स्वाभिमानी प्रतिमेला धक्का देणारा आहे, अशा शब्दांत ठाकरे गटाने संताप व्यक्त केला आहे. (Thackeray group targets Adani over the victory of Mahayuti)
विधानसभेचे निकाल लागले. निकाल लागले, पण हा जनतेचा कौल नाही. लोकसभेत महाराष्ट्राने आपला स्वाभिमानी बाणा दाखवून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मराठीद्वेष्ट्या राजकारणाचा पराभव केला. मोदी यांचे लोकसभेतील बहुमत रोखण्याचा पुरुषार्थ ज्या महाराष्ट्राने चार महिन्यांपूर्वी दाखवला त्याच महाराष्ट्रात पुढील चार महिन्यांत विधानसभेचा हा निकाल लागला आणि महाराष्ट्रातील ‘महा’पणाची कुंडले गळून पडली. महाराष्ट्राचे तेजच जणू संपले, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.
हेही वाचा – Maharashtra Election Results 2024 : शिंदे गटासाठी मनसे ठरली डोकेदुखी! ठाकरे गटालाही फटका
महाराष्ट्राच्या ऐक्याला सुरुंग लावून ‘महायुती’ नावाचा राक्षस विजयाचे विकट हास्य करीत आहे. या विजयामागे ‘अदानी राष्ट्रा’चे भयंकर कारस्थान आहे. दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्या अटकेचे वॉरंट अमेरिकेत निघते आणि अदानीच्या भ्रष्टाचाराची पाठराखण करण्यासाठी संपूर्ण भाजपा उभा राहतो. त्याच अदानीच्या घशात मुंबईसह महाराष्ट्राची सार्वजनिक संपत्ती घालण्याचा डाव ज्या मोदी, शहा, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी रचला. त्या अदानीला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठीच महाराष्ट्राचा पूर्ण ‘निकाल’ लावला गेला, असा दावा ठाकरे गटाने केला आहे.
महाराष्ट्र आज मेले. त्यामुळे राष्ट्रही मेले. अदानी राष्ट्राच्या उदयाचा जय आणि जल्लोष सुरू झाला. हा जय त्यांचा त्यांनाच लखलाभ ठरो. महाराष्ट्राच्या छाताडावर पाय रोवून ‘अदानी राष्ट्र’ उभे राहताना दिसत आहे. हा विजय खरा नाही, अशी जहरी टीका सामना दैनिकातील अग्रलेखातून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने केली आहे.
जातीयवादाचे एक अगम्य प्रकरण महाराष्ट्राच्या मातीत पसरले. ‘बटेंगे तो कटेंगे’सारखे विखारी प्रचार निर्लज्जपणे झाले आणि त्याबद्दल निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला नाही. पैशांचा पाऊस गडगडाटासारखा पडला. आता पैशांवरच निवडणुका लढायच्या आणि जिंकायच्या असतील तर लोकशाहीला टाळेच लावायला हवे तसेच गावोगावच्या अदानीचा पक्षच निवडणुका लढवू शकेल. सामान्य माणसाचे मोलाचे मत हे पैशाच्या तागडीत तोलले गेले आणि त्याबरहुकूम आता विजयाचे नाद घुमले, असा हल्लाबोलही ठाकरे गटाने केला आहे. (Maharashtra Election Results 2024 : Thackeray group targets Adani over the victory of Mahayuti)
हेही वाचा – Maharashtra Election Results 2024 : वंचित आघाडीचा फटका कोणाला अन् फायदा कोणाला?