(Maharashtra Election Results 2024) मुंबई : राज्यामध्ये 2019पासून सातत्याने राजकीय समीकरणे बदलत आहेत. अशातच 20 नोव्हेंबरला झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल शनिवारी (23 नोव्हेंबर) जाहीर झाले. त्याची आकडेवारी लक्षात घेता मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत नोटाचा (None of the above) फोलपणा लोकांच्या लक्षात आला आहे, असे दिसते. (Voters prefer candidates instead of NOTA in two elections)
लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक फटका भाजपाला बसला. 2014 आणि 2019 अशा सलग दोनवेळा एकहाती सत्ता मिळविणाऱ्या भाजपाला 2024मध्ये मित्रपक्षांच्या मदतीने सरकार स्थापन करावे लागले. असे असले तरी, 2019च्या तुलनेत मतदारांनी लोकसभा निवडणुकीत नोटाऐवजी (NOTA) उमेदवारांना जास्त पसंती दिल्याचे चित्र पाहायला मिळाले. 2019मध्ये नोटाला महाराष्ट्रात 4 लाख 88 हजार 766 मते पडली होती. तर, 2024मध्ये 4 लाख 12 हजार 815 मते नोटाला मिळाली.
हेही वाचा – Maharashtra Election Results 2024 : मोदींना घराणेशाहीची यादी हवी असेल तर…, ठाकरे गटाची खोचक टीका
राज्यात सत्ताकारणासाठी दोन प्रमुख पक्षांमध्ये पडलेली फूट, भ्रष्टाचाराची एका पाठोपाठ एक समोर येणारी प्रकरणे, नेत्यांची बेलगाम वक्तव्ये असे चित्र राज्यात पाहायला मिळत आहे. तरीही, नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात 66.05 टक्के असे गेल्या 30 वर्षांतील जास्त मतदान नोंदवले गेले. शिवाय, पुन्हा एकदा नोटाकडे दुर्लक्ष करण्याचा ट्रेण्ड कायम ठेवत मतदारांनी उमेदवारांनाच जास्त पसंती कायम ठेवल्याचेही स्पष्ट झाले. 2019मध्ये 7 लाख 42 हजार 135 मतदारांनी नोटाची निवड केली होती. त्यावेळी हे प्रमाण 1.35 टक्के होते. तर, यावेळी मात्र 4 लाख 61 हजार 886 मते नोटाला पडली. मतदान वाढूनही हे प्रमाण 0.72 टक्का आहे, हे उल्लेखनीय.
सप्टेंबर 2013मध्ये एका याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला ईव्हीएमवर (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) नकाराधिकाराचा पर्याय देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांपैकी कोणताही उमेदवार पसंत नसल्यास ईव्हीएममध्ये NOTAचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला. नोटाला मत देऊन मतदार आपला असंतोष व्यक्त करत असले तरी, या मतांचा थेट निवडणूक निकालांवर परिणाम होत नाही.
या मतदारसंघांत नोटाला पसंती
- अहेरी – 5825
- डहाणू – 5120
- अक्कलकुवा – 5071
- चिंचवड – 4316
- अणुशक्तिनगर – 3884
- बोरीवली – 3637
- बोईसर – 3613
- डोंबिवली – 2745
- भोर – 2720
- भोसरी – 2685
- भिवंडी ग्रामीण – 2571
(Maharashtra Election Results 2024 : Voters prefer candidates instead of NOTA in two elections)
हेही वाचा – Maharashtra Election Results 2024 : भाजपाच्या कमळावर 132 जागा, तर मित्रपक्षांच्या चिन्हांवर 9 विजयी