Maharashtra Election Results 2024 मुंबई – महाराष्ट्र विधानसभेचा ऐतिहासिक निवडणुकीचा ऐतिहासिक निकाल आला आहे. राज्यात महायुतीची त्सुनामी आली आहे. भारतीय जनता पक्षाला 132, शिवसेना शिंदे गटाला 57 आणि अजित दादांच्या राष्ट्रवादीला 41 जागा मिळाल्या आहेत. राज्यात विरोधीपक्ष नेता निवडीचा अधिकारही जनतेने ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसला दिला नाही. मनसेपासून वंचित, बविआ, तिसरी आघाडी यांचा सुपडा साफ झाला. या ऐतिहासिक निकालानंतर आता पुढे काय, अशी चर्चा राज्यात सुरु झाली आहे.
महायुती 2.0 च्या दिल्ली वाऱ्या वाढणार…
महायुतीचा मुख्यमंत्री होणार हे निश्चित आहे. एकनाथ शिंदे हे महायुतीचे पहिले मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या नेतृत्वात निवडणूक लढली गेली आणि ऐतिहासिक विजय मिळाला. महायुती 2.0 साठी मात्र मुख्यमंत्रीपदावरुन महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच आहे. त्यानंतर मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लावायची, कोणाला कोणते खाते द्यायचे, तिन्ही पक्षांमध्ये खाते वाटप कसे असणार, यासाठी दिल्ली वाऱ्या होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. मात्र मंत्रिमंडळाचा निर्णय घेण्यासाठी त्यांना दिल्लीच्या मान्यतेची आवश्यकता असणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे निकालानंतर या नेत्यांच्या दिल्ली वाऱ्या वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान शिंदेंना शिवसेनेचा गटनेता पदासाठी मुंबईत आज बैठक बोलावण्यात आली आहे. तर अजित पवारांची गटनेतेपदी निवड झाली आहे. त्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी मुंबईत खलबतं सुरु झाली आहेत.
मुख्यमंत्रीपदाचा निर्णय दिल्लीत
महायुती 2.0 मध्ये मुख्यमंत्री कोण होणार याबद्दल जोरदार चर्चा सुरु आहे. मुंबईत देवेंद्र फडणवीस यांचे सागर हे शासकीय निवासस्थान भाजपच्या घडामोडींचे केंद्र बनले आहे. भाजप नेत्यांच्या तिथे बैठका सुरु आहेत. भाजपच्या राज्यातील नेत्यांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा आग्रह धरला जात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडूनही त्यांच्याच नावाला पसंती असल्याचे बोलले जात आहे. मात्र मुख्यमंत्रीपदाचा निर्णय हा केंद्रीय नेत्यांसोबतच्या बैठकीतच होणार असे सांगितले जात आहे. तिन्ही पक्षांच्या एकत्रित बैठकीत हा निर्णय होणार आहे.
शरद पवारांच्या पक्षात शांतता
महायुतीच्या सुनामीने महाविकास आघाडी पाचोळ्यासारखी उडून गेली आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि काँग्रेसने निकालाबद्दल आश्चर्य व्यक्त केले. प्रचारादरम्यान महाराष्ट्रात फिरत असताना जनतेच्या मनात महायुती सरकारबद्दल असंतोष दिसत होता. मात्र निकाल त्याच्या उलट आला आहे, असे शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. जणू काही लाटेपेक्षा त्सुनामी आल्यासारखे वातावरण आहे. निकाल पाहिल्यानंतर त्यांना विरोधीपक्ष शिल्लकच ठेवायचे नाहीत असे दिसते. असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. तर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी हा निकाल अविश्वसनीय असल्याचे म्हटले आहे. कार्यकर्ते, पत्रकार यांच्याशी संवाद साधला होता, यापैकी कोणीही असे निकाल येतील असे म्हटले नव्हते, असे ते म्हणाले. महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात निकालानंतर दुसऱ्या दिवशीही शांतता आहे. शरद पवार गटाकडून या निकालावर अजून प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे त्यांची पुढची भूमिका काय असणार, याबद्दल तर्क-वितर्क लावले जात आहेत. त्यांच्या पक्षात असलेली शांतता ही पराभवानंतच्या धक्क्याची आहे, की नव्या रणनीतीआधीची आहे, याबद्दल उलटसुटल चर्चा सुरु आहे.
हेही वाचा : Maharashtra Election Results 2024 : निकाल स्वीकार करण्यासारखा नाही, ठाकरे गटाची तीव्र नाराजी
Edited by – Unmesh Khandale