(Maharashtra Election Results 2024) मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. महायुतीने 200हून जागा जिंकत निर्वावादपणे पुन्हा सत्ता काबिज केली आहे. आज, शनिवारी जाहीर झालेले अनेक निकाल धक्कादायक ठरले. यात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचा परिणामही दिसत आहे. (Which candidates were hit by Vanchit Bahujan Aghadi?)
वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचा फटका 2019च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सर्वाधिक बसला होता. त्या निवडणुकीत दोन्ही काँग्रेसच्या सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण यांच्यासह 15 बड्या नेत्यांना वंचित आघाडीमुळे विजयापासून वंचित राहावे लागले होते. तर, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीच्या प्रत्येकी चार उमेदवारांना वंचित बहुजन आघाडीमुळे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे फटका बसला होता.
हेही वाचा – Maharashtra Election Results 2024 : शिंदे गटासाठी मनसे ठरली डोकेदुखी! ठाकरे गटालाही फटका
आता झालेल्या विधानसभा निवडणुकीतही वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमुळे अकोला पूर्व, अकोट, बुलडाणा, गंगाखेड, गंगापूर, हिंगोली, जिंतूर, लातूर शहर, लातूर ग्रामीण, मूर्तिझापूर, नांदेड दक्षिण, परांडा, उमरगा आणि वडगाव शेरी अशा 14 जागांवर प्रामुख्याने महायुती किंवा महाविकास आघाडीला पराभव पत्कारावा लागला. अकोला पूर्व येथे भाजपाच्या रणधीर सावरकर (1,08,619) यांनी ठाकरे गटाच्या गोपाल दातकर (58,006) यांचा 50 हजार 613 मतांनी पराभव केला. तर, तिसऱ्या क्रमांकावर असलेले वंचितच्या ज्ञानेश्वर सुलताने यांना 50 हजार 681 मते पडली. गंगाखेडमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या रत्नाकर गुट्टे यांनी 1,41,544 मते मिळवून विजय मिळविला. 1,15,252 मते मिळविणाऱ्या ठाकरे गटाच्या विशाल कदम यांचा 26 हजार 292 मतांनी पराभव झाला. वंचित आघाडीच्या सीताराम घनदाट यांना 43 हजार 26 मते मिळाली.
हिंगोलीमध्येही वंचित आघाडीच्या प्रकाश थोरात यांना 23 हजार 944 मते मिळाली. ठाकरे गटाच्या रुपाली पाटील (63,658) यांचा भाजपाच्या तान्हाजी मुटकुळे (74,584) यांनी 10 हजार 926 मतांनी पराभव केला, हे उल्लेखनीय. बुलडाण्यात 91 हजार 660 मते मिळविणारे शिंदे गटाचे संजय गायकवाड अवघ्या 841 मतांनी विजयी झाले. या मतदारसंघात ठाकरे गटाच्या जयश्री शेळके यांना 90 हजार 819 मते तर वंचित आघाडीच्या प्रशांत वाघोडे यांना 7 हजार 146 मते मिळाली.
अकोटची जागाही भाजपालाच मिळाली. प्रकाश भारसाकळे हे 93 हजार 338 मते मिळवून विजयी झाले. तर, काँग्रेसचे महेश गंगणे (74,487) हे 18 हजार 851 मतांनी पराभूत झाले. वंचितच्या दीपक बोडखे यांना 34 हजार 135 मते मिळाली. लातूर ग्रामीणमध्येही काँग्रेसला फटका बसल्याचे दिसते. भाजपाच्या रमेश कराड यांनी 1,12,051 मते मिळवत काँग्रेसच्या धीरज देशमुख (1,05,456) यांचा 6 हजार 595 मतांनी पराभव केला. तर, वंचितच्या डॉ. विजय अजनिकर यांना 8 हजार 824 मते मिळाली. नांदेड दक्षिणमध्ये शिंदे गटाचे आनंद तिडके 2 हजार 132 मतांनी विजयी झाले. त्यांना 60 हजार 445 मते मिळाली. त्यांनी काँग्रेसच्या मोहनराव हंबर्डे (58,313) यांचा पराभव केला. वंचित आघाडीच्या फारुक अहमद यांना 33 हजार 841 मते पडली.
हेही वाचा – Maharashtra Election Result 2024 : केवळ लाडकी बहीणमुळे समस्या संपतात का? निकालामुळे चेन्नीथला संतापले
गंगापूरमध्ये 1,25,555 मते मिळविणाऱ्या भाजपाच्या प्रशांत बंब यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सतीश चव्हाण (1,20,540) यांचा 5 हजार 015 मतांनी पराभव केला. वंचितच्या अनिल चंडालिया यांना 8 हजार 839 मते मिळाली. जिंतूर मतदारसंघात भाजपाच्या मेघना बोर्डिकर यांनी 1,13,432 मते मिळवत शरद पवार गटाच्या विजय भांबळे (1,08,916) यांचा 4 हजार 516 मतांनी पराभव केला. वंचित आघाडीच्या सुरेश नागरे यांना 56 हजार 474 मते मिळाली, हे विशेष. मूर्तिजापूरमध्ये भाजपाचे हरिश पिंपळे 91 हजार 820 मते मिळवून विजय मिळविला. त्यांनी एनसीपी शरद पवार गटाचे सम्राट डोंगरदिवे (55,956) यांचा 35 हजार 864 मतांनी पराभव केला. तर वंचितच्या सुगत वाघमारे यांना 49 हजार 608 मते मिळाली. परांडामध्येही शरद पवार गटाला वंचितच्या उमेदवाराचा फटका बसल्याचे दिसते. शिंदे गटाचे तानाजी सावंत (1,03,254) यांनी एनसीपी एसपीच्या राहुल मोटे (1,01,745) यांचा केवळ 1 हजार 509 मतांनी पराभव केला. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या वंचितच्या प्रवीण रानबागुल यांना 12 हजार 698 मते मिळाली.
लातूर शहरात वंचित आघाडीच्या विनोद खटके यांना 26 हजार 616 मते मिळाली. ते पराभूत झाले. तर, काँग्रेसच्या अमित देशमुख (1,14,110) यांनी भाजपाच्या डॉ. अर्चना पाटील चाकूरकर (1,06,712) यांचा 7 हजार 398 मतांनी पराभव केला. उमरगामध्ये शिंदे गटालाही वंचित आघाडीचे उमेदवार राम गायकवाड यांचा फटका बसला. त्यांना अवघी 4 हजार 87 मते मिळाली असली तरी, शिंदे गटाच्या ज्ञानराज चौगुले (92,241) यांना 3 हजार 965 मतांनी पराभव पत्करावा लागला, हे विशेष. या मतदारसंघात ठाकरे गटाचे प्रवीण स्वामी 96 हजार 206 मते मिळवून विजयी झाले. अशीच परिस्थिती वडगाव शेरीमध्ये पाहायला मिळते. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील टिंगरे (1,28,979) यांचा 4 हजार 710 मतांनी पराभव झाला. दुसरीकडे, विवेक लोंढे या वंचित आघाडीच्या उमेदवाराला 5 हजार 488 मते मिळाली. एनसीपी शरद पवार गटाचे बापू पठारे (1,33,689) विजयी झाले. (Maharashtra Election Results 2024 : Which candidates were hit by Vanchit Bahujan Aghadi?)
हेही वाचा – Maharashtra Election Results 2024 : निकाल स्वीकार करण्यासारखा नाही, ठाकरे गटाची तीव्र नाराजी