Maharashtra Election : राज्यातील निवडणुका कधी होणार?, सुप्रीम कोर्ट १७ मे रोजी देणार निर्णय

Maharashtra Election : राज्यातील निवडणुका कधी होणार?, सुप्रीम कोर्ट १७ मे रोजी देणार निर्णय

महाराष्ट्रातील निवडणुका कधी होणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. २ आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात यावा असे आदेश राज्य निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. तर निवडणुका सप्टेंबरमध्ये घ्याव्यात अशी याचिका राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यालयात केली आहे. या याचिकेवर १७ मे रोजी सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर निवडणुका कधी होणार हे स्पष्ट होणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या अर्जावर सुप्रीम कोर्टात मंगळवार 17 मे रोजी सुनावणी होणार आहे. महापालिका नगरपंचायत सप्टेंबरमध्ये आणि जिल्हा परिषद ग्रामपंचायतीच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये घ्यावी अशी विनंती राज्यनिवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. पावसाळा असल्यामुळे निवडणुका घेण्यास अडचणी येऊ शकतात. गेल्या अनेक दिवसांपासून काही महानगरपालिकांवर प्रशासक असल्यामुळे तात्काळ निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या मागणीनुसार निवडणुका सप्टेंबरमध्ये होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सर्वोच्च न्यायालयात राज्य निवडणूक आयोगाने सप्टेंबर आणि ॲाक्टोबर 2022 महिन्यात निवडणुका घेण्याची विनंती करणारा अर्ज 2 दिवसापूर्वी दाखल केला आहे. या अर्जावर १७ मे रोजी निर्णय देण्यात येणार आहे.

पावसाळ्यात निवडणुका घेण्यात अडचणी

राज्यातील महानगरपालिका १५, जिल्हा परिषद २५, नगरपंचायत २१० आणि ग्रामपंचायतीच्या १९०० जागांवर निवडणूक होणार आहे. या निवडणुका एका टप्प्यात घेता येणार नाही. २ ते ३ टप्प्यात घेतल्यास याला ६ आठवड्यांचा काळ लागेल. तसेच राज्यात पावसाळ्यादरम्यान अनेक भागात पूरस्थिती असते. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पर्जन्यवृष्टी असते. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये निवडणूक घेणे शक्य होणार नाही. ओबीसी आरक्षण, वॉर्ड रचना अशा अनेक प्रश्नांमुळे निवडणूक घेण्यात अडचणी येऊ शकतात.


हेही वाचा : नवाब मलिकांना न्यायालयाचा दिलासा, खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी परवानगी