घरमहाराष्ट्रप्रचंड बर्फवृष्टीत गिरिप्रेमीची ‘अन्नपूर्णा-१’ शिखरावर यशस्वी चढाई

प्रचंड बर्फवृष्टीत गिरिप्रेमीची ‘अन्नपूर्णा-१’ शिखरावर यशस्वी चढाई

Subscribe

१४ पैकी ८ अष्टहजारी शिखरांवर यशस्वी चढाई करणारी पहिली भारतीय नागरी गिर्यारोहण संस्था

गिरिप्रेमी या पुण्यातील अग्रणी गिर्यारोहण संस्थेचे गिर्यारोहक भूषण हर्षे, डॉ. सुमित मांदळे व जितेंद्र गवारे यांनी जगातील दहावे उंच शिखर माऊंट अन्नपूर्णा-१ (८०९१ मीटर्स उंच) वर यशस्वी चढाई केली. उमेश झिरपे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली पार पडलेली ही गिरिप्रेमीची आठवी अष्टहजारी मोहीम असून अशी कामगिरी करणारी गिरिप्रेमी ही भारतातील पहिली नागरी गिर्यारोहण संस्था आहे. गुरुवारी मध्यरात्री उशिरा कॅम्प ४ हून अंतिम शिखर चढाई सुरू झाली. कॅम्प ४ वर झालेल्या प्रचंड बर्फवृष्टीमुळे अंतिम शिखर चढाई सुरू करण्यास उशीर झाला त्यात पहाटेच्या सुमारास वार्याच्या वेग वाढल्याने चढाईची गती मंदावली. दुपारी १२ च्या सुमारास रूट ओपनिंग करणार्या शेर्पा संघाने यशस्वी चढाई केली, त्या मागोमाग गिरिप्रेमीच्या सदस्यांनी शिखरमाथा गाठला.

या विषयी अधिक माहिती देताना मोहिमेचे नेते उमेश झिरपे म्हणाले, १५ एप्रिल रोजी रूट ओपनिंग करणार्या शेर्पा संघाचे ‘समिट’ व आज १६ तारखेला गिरिप्रेमीच्या संघाचे ‘समिट’ असे नियोजन होते. मात्र, रूट ओपनिंग करणार्या संघाला ८०० मीटर दोर कमी पडल्यामुळे तातडीने हेलिकॉप्टरच्या मदतीने काठमांडूहून १००० मीटर दोर मागवावा लागला व तो कॅम्प ४ पर्यंत पोहचवावा लागला. त्यामुळे रूट ओपनिंग करणार्या शेर्पा संघाचे समिट एक दिवस लांबले. हवामानाचा अंदाज बघता रूट ओपनिंग संघाच्या मागोमाग गिरिप्रेमीच्या संघाने गुरुवारी रात्री १२ च्या सुमारास अंतिम शिखर चढाई सुरू केली. संपूर्ण रात्रभर चढाई दरम्यान संघाला जोर्याच्या वार्याच्या व हाडे गोठवणार्या थंडीचा सामना करावा लागला. याच दरम्यान सकाळच्या सुमारास ढगाळ वातावरणात वाढ झाल्याने चढाईची गती कमी करावी लागली. शिखरमाथ्याच्या काही मीटर खाली असलेल्या घळीमधून चढाई करताना गिर्यारोहकांचा कस लागला. या सर्व अडचणींवर मात करत भूषण, सुमित व जितेंद्र यांनी १४ तासांच्या अथक व अविरत चढाई नंतर दुपारी २.१५ च्या सुमारास शिखरमाथा गाठला.

- Advertisement -

‘माऊंट अन्नपूर्णा-१’ ही गिरिप्रेमीची आठवी अष्टहजारी मोहीम असून याआधी २०१२ साली माऊंट एव्हरेस्ट, २०१३ साली माऊंट ल्होत्से (चौथे उंच शिखर), २०१४ साली माऊंट मकालू (पाचवे उंच शिखर), २०१६ साली माऊंट च्यो ओयू (सहावे उंच शिखर) व माऊंट धौलागिरी (सातवे उंच शिखर), २०१७ साली माऊंट मनास्लू (आठवे उंच शिखर) तर २०१९ साली माऊंट कांचनजुंगा (तिसरे उंच शिखर) अशा सात अष्टहजारी शिखरांवर यशस्वी चढाई केली आहे.

माऊंट अन्नपूर्णा १ हे शिखर नेपाळ हिमालयाच्या अन्नपूर्णा हिमाल पर्वतरांगेमध्ये स्थित आहे. या पर्वतरांगेमध्ये अनेक अतिउंच शिखरे असून अन्नपूर्णा पर्वत शिखर समूह विशेष प्रसिद्ध आहे. या पर्वतरांगेत १६ शिखरे ही ६ हजार मीटरपेक्षा उंच आहेत, १३ शिखरे ही ७ हजार मीटरपेक्षा उंच आहेत तर अन्नपूर्णा-१ हे एकमेव अष्टहजारी शिखर आहे. एकूण ५५ किलोमीटर लांबीचा अन्नपूर्णा शिखर समूह हा गंडकी व मार्श्यंगदी नद्यांच्या हिमनद्यांनी वेढलेला आहे. अन्नपूर्णा पर्वत समुहामध्ये शिखर चढाई करणे, हे अत्यंत अवघड मानले जाते. सततचे होणारे हिमप्रपात, अतिशय तीव्र धारांचा चढाई मार्ग यांमुळे अन्नपूर्णा I या शिखरावर चढाई करणे, हे अत्यंत धोक्याचे आहे. आत्तापर्यंत केवळ २५० च्या आसपास गिर्यारोहकांनी माऊंट अन्नपूर्णा-१ शिखरावर यशस्वी चढाई केली आहे. त्यामुळे गिरिप्रेमीच्या या यशस्वी चढाईचे महत्व अधोरेखित होते. गिरिप्रेमीच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

- Advertisement -

गिरिप्रेमीचा संघ

मोहीम नेता:

उमेश झिरपे (जेष्ठ गिर्यारोहक व श्री शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित )
जेष्ठ गिर्यारोहक, ४० हून अधिक वर्षांचा गिर्यारोहणाचा अनुभव. ‘गिरिप्रेमी’च्या सर्व आठ अष्टहजारी शिखर मोहिमांचे यशस्वी नेतृत्व. 40 हून अधिक हिमालयन मोहिमांचे नेतृत्व करण्याचा प्रदीर्घ अनुभव. त्यांच्या गिर्यारोहणातील विशेष कामगिरीसाठी महाराष्ट्र शासनाच्या ‘श्री शिवछत्रपती पुरस्काराने सन्मान.

संघ सदस्य:

भूषण हर्षे (एव्हरेस्ट शिखरवीर)

भूषण हर्षे यांनी २०१३ साली जगातील सर्वात उंच शिखर ‘माउंट एव्हरेस्ट’वर यशस्वी चढाई केली, तर २०१९ मध्ये जगातील तिसरे उंच शिखर असलेल्या ‘माऊंट कांचनजुंगा’वर यशस्वी चढाई केली. भूषण हे उत्तम प्रस्तरारोहक आहेत. त्यांची आंतरराष्ट्रीय रॉक क्लायम्बिंग प्रशिक्षणासाठी निवड झाली होती. सध्या ते ‘गार्डियन गिरिप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटनियरिंग’ या गिर्यारोहण प्रशिक्षण संस्थेमध्ये वरिष्ठ प्रशिक्षक असून ते सध्या गिर्यारोहण क्षेत्रामध्ये पूर्णवेळ काम करतात.

डॉ. सुमित मांदळे (कांचनजुंगा शिखरवीर)

डॉ. सुमित मांदळे याने २०१६ साली जगातील सहावे उंच शिखर ‘माउंट च्यो ओयु’वर तर २०१९ साली जगातील तिसरे उंच शिखर ‘माऊंट कांचनजुंगा’ शिखरांवर यशस्वी चढाई केली आहे. व्यवसायाने आयुर्वेदिक डॉक्टर असलेला सुमित हा कसलेला प्रस्तरारोहक (रॉक क्लायंबर) आहे. तसेच सध्या तो ‘गार्डियन गिरिप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटनियरिंग’मध्ये वरिष्ठ प्रशिक्षक म्हणून देखील काम करतो.

जितेंद्र गवारे (कांचनजुंगा शिखरवीर)

जितेंद्र यांनी २०१७ मध्ये माउंट नून या ७ हजार मीटरहून उंच असणार्या तांत्रिकदृष्ट्या कठीण शिखरावर यशस्वी चढाई केली तर २०१८ मध्ये बडा शिगरी ग्लेशियरस्थित ‘माउंट कॅथेड्रल’ शिखरावर यशस्वी चढाई केली. २०१९ मध्ये मे महिन्यात जितेंद्र यांनी माऊंट कांचनजुंगा या जगातील तिसर्या उंच शिखरावर चढाई केली तर ऑक्टोबर महिन्यात अमा दब्लम या शिखराला गवसणी घातली.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -