मुंबई (प्रेमानंद बचाव) : पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी राज्यात पर्यटन पोलीस नेमण्यात येणार असून नाशिक येथील राम- काल पथ विकास आणि मालवण (जि. सिंधुदुर्ग) येथील समुद्रातील पर्यटन हे प्रकल्प वॉररूमशी जोडण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, सोमवारी (13 जानेवारी) दिली. केंद्र आणि राज्य सरकारकडून राबविण्यात येणारे पर्यटन प्रकल्प गतीने पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे. तसेच राज्य लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत पर्यटन विभागाच्या 14 सेवा ‘आपले सरकार’ संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात याव्या, असे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. (Maharashtra government decides to appoint tourism police in the state for the safety of tourists)
देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत आगामी 100 दिवसात पर्यटन विभागाने करावयाच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी फडणवीस म्हणाले, सरकारकडून अनुदानित प्रकल्पामध्ये नाशिक येथील राम-काल पथ विकास, सिंधुदुर्गातील मालवण येथील पाण्याखालील सागरी पर्यटनाचा अनुभव, स्वदेश दर्शन अंतर्गत आंबेगाव पुणे येथे पुरंदर शिवसृष्टी ऐतिहासिक थीम पार्क उभारणे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकास, अजंठा वेरूळ पर्यटन विकास ही कामे सुरू करून त्याला गती देण्यात येणार आहे.
स्वदेश दर्शन 2.0 अंतर्गत अहिल्यानगर येथे किल्ल्यावरील पर्यटन आकर्षणासाठी उपक्रम राबविण्यासंदर्भातील कामे तातडीने पूर्ण करावी. राज्याच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत अमृत सांस्कृतिक वारसा पालघर येथील आदिवासी विकास पर्यटनाला चालना देणे, शिवसृष्टी थीम पार्क राज्यातील पाच ठिकाणी उभारणे, पंढरपूर येथे सभा मंडप स्कायवॉक या सर्व कामांसाठी सल्लागार नेमून ही कामे तत्काळ सुरू करण्यात यावीत, असे निर्देश फडणवीस यांनी दिले.
हेही वाचा – विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकांची वैधता तपासणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती
पर्यटन विभागाने 31 मार्चपूर्वी उद्योग प्रमाणपत्र, कृषी पर्यटन युनिट नोंदणी प्रमाणपत्र, साहसी पर्यटन युनिट नोंदणी प्रमाणपत्र, कॅराव्हॅन पर्यटन नोंदणी प्रमाणपत्र, आई, महिला उद्योजकता विकास कार्यक्रमांतर्गत नोंदणी, पर्यटन व्हिलाची नोंदणी, पर्यटन अपार्टमेंटची नोंदणी प्रमाणपत्र, होम स्टे नोंदणी प्रमाणपत्र, व्यवसायिक गृहाची पर्यटन नोंदणी प्रमाणपत्र या नवीन सेवा लवकरात लवकर सुरू कराव्यात, असेही फडणवीस यांनी सांगितले.
राज्यातील पर्यटन आंतरराष्ट्रीय पातळीवर
दरम्यान, आंतरराष्ट्रीय पातळीवर राज्यातील पर्यटन पोहोचवण्यासाठी विविध फेस्टिवल तसेच ‘रोड शो’ आयोजनाबाबत महाराष्ट्र शासन सहभागी होणार आहे. माद्रिद येथे होणारा फितूर आंतरराष्ट्रीय ट्रेड फेअर, नाशिक येथील ग्लंम्पिंग फेस्टिवल, दिल्ली येथे होणारा भारत पर्व, पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील हिंदवी स्वराज्य महोत्सव, बर्लिन येथे आयटीबी अंतर्गत, महाबळेश्वर येथे होणारे टुरिझम कॉन्क्लेवमध्ये पर्यटन विभाग सहभागी होणार आहे. याबाबत पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे यांनी सादरीकरण केले.
हेही वाचा – शिवसेनेत लवकरच संघटनात्मक फेरबदल, 23 जानेवारीला मेळाव्याचे आयोजन
बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे
- पर्यटन विकासासाठी मूलभूत सोयी सुविधा निर्माण करणे. पर्यटन धोरण 2025 अंतर्गत पात्र पर्यटन प्रकल्पांना निधी उपलब्ध करून देणे.
- पर्यटन विभागाच्या कामकाजासाठी ई – ऑफिसचा वापर करावा. पर्यटन विभागाचे संकेतस्थळ अद्ययावत करावे.
- कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने पर्यटन विभागातील उपक्रम यांना प्रसिद्धी देणे. चॅटबॉट, ऑनलाइन भाषांतर, प्रवासाची माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून देणे.